Sambhajinagar : 40 वर्षांनंतर 'या' रस्त्याचे उजळले भाग्य; नागरिकांना मोठा दिलासा 

Road
RoadTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील हिनानगर ते सावंगी बायपास या १२०० मीटर लांबीच्या रस्त्यासाठी महापालिका फंडातील शंभर कोटी रूपयातून तीन कोटी ७७ लाख ६६ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यातून या कच्च्या रस्त्याचे सिमेंट रस्त्यात रूपांतर होत आहे. या रस्त्याबाबत "टेंडरनामा"ने वाचा फोडली होती. त्याची दखल घेत महापालिकेने शंभर कोटीतील ६३ रस्त्यांच्या यादीत या रस्त्याचा समावेश केला आहे.

Road
Ajit Pawar : वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी पाठपुरावा करणार

महापालिका हद्दीतील चिकलठाणा भागातील पटेलनगर, सावित्रीनगर आणि हिनानगर या किमान दहा हजार लोकवस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरक्ष: चिखलवाट झाली होती. याभागातील रहिवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चिखल तुडवत आणि खड्ड्यात गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती.याभागात कोणाचाही मृत्यू झाला तरी वसाहतधारकांना थरकाप उडत असे. कारण मृतदेहाला चिकलठाणा येथील मोक्षधामाकडे नेताना या भागातील नागरिकांना अक्षरशः नाना नरकयातना सोसाव्या लागत असत. विशेषतः पावसाळ्यात कुणी मरण पावले तर तारेवरची कसरत करत या मंडळींना मोक्षधामाकडे जावे लागत असे. वसाहतीतील गर्भवती स्त्रीला तसेच रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने त्यांना  झोळीद्वारे चिखलवाटेतून प्रवास करून जालनारोड गाठावा लागत असे.या वसाहतीत नळ योजना नसल्याने महानगरपालिकेद्वारे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो मात्र खड्ड्यातून वाहन जातच नसल्याने महिलांना आठवडी बाजारापर्यंत पायपीट करत पाणी न्यावे लागत असे. साधी सायकल जात नसल्याने गॅसच्या टाक्याही डोक्यावरून न्याव्या लागत असतं. जीवनावश्यक वस्तूंची ने - आण करताना तारेवरची कसरत करावी लागत असे. रस्त्याअभावी दळण वळणाचा चक्का जाम झाला होता. मागील ४० वर्षांपासून रस्त्याचा हा प्रश्न कायम होता.परंतु, याकडे निधी अभावी कोणीही लक्ष देत नव्हते.‌ परिणामी या भागातील सामान्य कामगारांना आधीच मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविताना नाकीनऊ येत असताना रस्त्यावर दर चार - सहा महिन्यांनी वस्तीतून लोकवर्गणी जमा करून त्यावर  माती - मुरूम टाकून खड्डे भरावे लागत असत.

Road
Sambhajinagar : नाना, 'या' रस्त्याकडे जरा पहाना! गांधेली रस्ता हरवला खड्ड्यात

चिकलठाण्यातील जालनारोडच्या उत्तरेला वाय झेड फोर्डच्या आलीशान शो रूमच्या पाठीमागून बबनराव ढाकणे विद्यालयाला वळसा घालत सरासरी दिड किलोमीटर पेक्षा जास्त या रस्त्याची लांबी व पाच मीटर रूंदी आहे. तीन वसाहतींसह चिकलठाण्यातील शेतकऱ्यांचा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्ताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय पुढे सावंगी बायपासकडे जाताना देखील याच रस्त्याचा वापर होतो. चिकलठाणा जालनारोड ते सावंगी बायपास अवघ्या १० मिनिटात पार होणाऱ्या रस्त्यावर दीड तास लागत होता.या रस्त्यावर तीन ते चार फुटांचे खोल खड्डे पडले होते. त्यात पावसाळ्यात पाण्याचे तलाव साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत असे. विद्यार्थ्यांना चिखलवाट तुडवत शाळा गाठावी लागत असे.एवढेच नाहीतर, पावसाळ्यात वसाहतीत दुचाकीही जात नसल्याने लोकांनी जालना रोडच्या कडेला बेभरोसे वाहनं सोडून जावे लागत असे.यासंदर्भात नागरिकांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर भर पावसाळ्यात चिखल तुडवीत प्रतिनिधीने रस्त्याचा अनुभव घेत या भागातील नागरिकांची व्यथा मांडली होती. अखेर महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता एस.बी. देशमुख यांच्या दिव्यदृष्टीने या रस्त्याचे काम मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान मांडले आहे. आता थेट पटेलनगर , हिनानगर आणि सावित्रीनगरातील नागरिकांना हक्काचा रस्ता मिळाल्याने जालना रोडवरील कॅम्ब्रीज चौकातील वाहतूक कोंडीला लगाम लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com