छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-१ चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा एपीआय काॅर्नर ते कलाग्राम या मार्गावरील सायकल ट्रॅकच्या मधोमध बंदीस्त स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेवरिल तीन ढापे नाल्यात पडल्याने महाकाय खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. सायकल ट्रॅकचा वापर करणारे सायकल व दुचाकीवरून तसेच पादचारी यांना हा महाकाय खड्डा चुकवताना तोल जाऊन उघड्या नाल्यात पडण्याचा धोका निर्माण झाला होता. या संदर्भात जागरुक नागरिकांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे कैफियत मांडली. प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाउन स्पाॅट पंचनामा केला. यावेळी सायकल ट्रॅकवर शतपावली करणाऱ्या नागरिकांना मोठा धोका असल्याचे येथे व्यवसाय करणाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने महापालिका प्रशासकांना या महाकाय उघड्या खड्ड्यांचे फोटो पाठविले. त्यांनी संबंधितांची चांगलीच कानउघडणी केल्याने तातडीने कारभाऱ्यांनी नाल्यावर ढापे टाकल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सरकारी अनुदानांतर्गत १५० कोटी योजनेतून एमआयडीसीच्या अखत्यारीत ४० कोटी ९६ लाख ७७५ रूपये मंजुर झाले होते. त्यापैकी एपीआय क्वार्नर ते प्रोझोन माॅल ते कलाग्राम या सिमेंट रस्त्यासाठी ६ कोटी २२ लाख ९८ हजार ८९२ रूपये मंजुर करण्यात आले होते. एक किलोमीटर लांबी आणि १२ मीटर रूंद या गुळगुळीत रस्त्याचे काम जळगावच्या लक्ष्मी कन्सट्रक्शन कंपनी व पुण्याच्या आर. जे. बिल्डकाॅन कंपनीने या रस्त्याचे दर्जेदार काम केले होते. ४ जुलै २०२० रोजी ठेकेदाराला वर्कऑर्डर मिळाल्यानंतर ३ जुलै २०२१ रोजी रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते.
महापालिकेने केले रस्त्याचे वाटोळे
रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर स्मार्ट सिटी कार्पोरेशन मार्फत जवळपास तीन कोटी रूपये खर्च करून सायकल ट्रॅकच्या बाजुने प्लॅस्टीकचे खांब गाडण्यासाठी खिळ्यांचा वापर करण्यात आला. मात्र या खांबामुळे या नव्याकोऱ्या गुळगुळीत रस्त्याचे सद्य:स्थितीत विद्रूपीकरण होताना दिसत आहे. त्यानंतर महापालिकेने जी-२० दरम्यान पथदिव्यांचे खांब लावण्यासाठी खड्डे करून रस्ता छतीग्रस्त केला. आता लावलेले प्लाॅस्टिकचे खांब कापून दुभाजकासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले जात आहे. परिणामी एमआयडीसीने तयार केलेल्या या गुळगुळीत रस्त्याचे महापालिकेने पार वाटोळे केले आहे.
पालिका निर्मित खड्डा
याच गुळगुळीत रस्त्याला लागून महावितरणचे उपअभियंता कार्यालय आहे. कार्यालयाला लागुन असलेल्या सायकल ट्रॅकवरील उघड्या स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेमुळे येथे अपघाताचा धोका वाढला होता. येथील अपघात टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी खड्ड्यात महावितरण कंपनीने वीजतारांना स्पर्श करणाऱ्या छाटलेल्या फांद्या उभ्या केल्याने महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतरही पालिकेने नाल्यांवर ढापे टाकले नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी 'टेंडरनामा'कडे तक्रार दाखल केली होती. प्रतिनिधीने महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांना फोटो पाठवत थेट सवाल करताच शहर अभियंता ए.बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवत फड यांनी जी. श्रीकांत यांच्या आदेशाने नाल्यावर ढापे टाकुन तो बंदीस्त केला. परिणामी जी. श्रीकांत यांनी २४ तासाच्या आत खड्ड्याच्या तक्रारीची दखल घेतल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.