छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका हद्दीतील सिडकोच्या प्रमुख डीपी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने दहा लाखाचा निधी मंजूर केल्याने सिडकोतील अग्रसेन भवन ते सविताराज अपार्टमेंट कॅनाॅट प्लेस ते जालनारोडला जोडणारा या महत्त्वाच्या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. "टेंडरनामा"च्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाने या रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढिगांची विल्हेवाट लाऊन कचरामुक्त रस्ता केला आहे. आता लवकरच टेंडर काढून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यासाठी निधीही मंजूर केला आहे.
रस्त्यांचे जाळे विकासाचे द्योतक मानले जातात. मात्र स्मार्ट सिटीतील वार्ड क्रमांक-६५ प्रभाग क्रमांक-७ मधील सिडकोतील कॅनाॅट प्लेस आणि जालना रस्त्याला जोडणारा महत्वाच्या जोड रस्त्यावर गेल्या दहा वर्षांपासून कचरा पहावयास मिळत होता. याला महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा डंपींग ग्राउंड केले होते. या संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर सर्वत्र कचरा विखुरला होता. कचर्याचे साम्राज्य पहावयास मिळत होते. गत दहा वर्षांपासून वाहणे चालविणे बंद झाले होता. पायी देखील कुणी जात नव्हते. कचऱ्यामुळे आसपासच्या वसाहतीतील नागरिकांच्या व नाईक महाविद्यालयातील विद्यार्थांचा आरोग्याचा प्रश्न कठीण होऊन बसला होता. कॅनाॅट आणि जालना रस्त्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे. रस्ता ९०० मीटर अंतराचा आहे. यापूर्वी वसंतराव नाईक महाविद्यालय तसेच आसपासच्या वसाहतधारकांची या रस्त्यावर नियमित रहदारी असे. रस्त्यावरून आसपासचे नागरिक, कामगार, कॅनाॅट परिसरातील येणारे ग्राहक व विद्यार्थ्यांची सतत ये-जा असायची.
सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर अनेक वर्षांपासून या रस्त्याची साधी दुरूस्ती करण्याचे सौजन्य महापालिकेने दाखविले नाही. लोक प्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्याच्या दिवसात आसपासच्या वसाहतधारकांची डास, माशा आणि चिलटांनी झोप मोड होऊन साथरोगाचा प्रसार होत असे. रस्ताच कचऱ्यात हरवल्याने रस्त्यातुन वाट काढणे कठीण झाले होते. परिणामी रस्त्यावरून ये-जा करणार्यांना इतर रस्त्यांचा वापर करत वेळ आणि इंधनाचा अपव्यय करत जालनारोड गाठावा लागत असे. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी व लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन तत्काळ कचऱ्याचे ढिगारे उचलून किमान डागडूजी करावी, अशी मागणी नागरिकांची मागणी होती. त्याकडे संबंधित प्रभाग अधिकारी, वार्ड अभियंता दुर्लक्ष करीत असत. या रस्त्याबाबत नागरिकांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीकडे कैफियत मांडली होती. "टेंडरनामा" यावर सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून महापालिका प्रशासनाला जागे केले. त्यानंतर महापालिका प्रशासनातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी केली. आठ दिवसात दहा टन कचरा उचलत रस्ता कचरा मुक्त केला. त्यानंतर वार्ड अभियंत्यांनी रस्ता दुरूस्तीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे १० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. "टेंडरनामा"ने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शहर अभियंता , कार्यकारी अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर पाठपुराव्याला यश आले. बांधकाम खात्याने विशेष देखभाल दुरूस्ती अंतर्गत योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.त्यामुळे या प्रमुख रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.