Sambhajinagar : 'या' रस्त्यासाठी निधी मंजूर पण मजीप्रा, महावितरण अन् महापालिकेचा खोडा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील महापालिका हद्दीतून जाणाऱ्या व छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- देवळाई - भिंदोन - गाडीवाट - घारदोन - कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५च्या दहा किलोमीटर दुरूस्तीसाठी पीडब्लुडीने मार्च महिन्यात १८ कोटीचे टेंडर काढले. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम मिळाले आहे. पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम रेंगाळल्याने साईटेकडीकडे जाणारे पर्यटक आणि सातारा देवळाई परिसरासह शेकडो पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ही खड्ड्यांची बिकट वाट सर करताना 'माझा मणका माझी जबाबदारी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Sambhajinagar
Shinde, Fadnavis, Pawar : राज्य सरकारचे आता 'रस्ते विस्तार मिशन'; तब्बल 5 हजार कोटींतून...

यासंदर्भात 'टेंडरनामा' प्रतिनिधीने अधिक तपास केला असता महावितरणचे विद्युतपोल, महापालिकेचे पथदिवे हटविण्यासाठी अन् मजीप्राची जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याचे काम अडल्याचे एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले. यासंदर्भात गेल्या पाच महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र 'आधी स्थलांतर शुल्क भरा' तरच आम्ही काम करू असा पवित्रा महावितरण कंपनीने घेतल्याने महावितरण कंपनी, मजीप्रा अन् महापालिकेच्या वादात जनतेला अंगठेफोड सोसावी लागत आहे. शहरातील देवळाई चौक ते देवळाई गावापर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत आहे. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे.महाविकास आघाडी ठाकरे सरकारच्या काळात या १० किमी रस्त्यासाठी आ.संजय शिरसाट यांनी साडेसहा कोटी मंजूर केले होते. परंतु, ठाकरे सरकार कोसळताच शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे देवळाई रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, हा रस्ता तयार करावा, अशी आ.संजय शिरसाट यांची मागणी लक्षात घेऊन शिंदे सरकारने साडेदहा कोटी ऐवजी थेट अठरा कोटी मंजुर केले होते.

Sambhajinagar
Mumbai-Goa Highway होईना अन् कोकणात आणखी एक मेगा एक्स्प्रेसवेची अधिसूचना

उत्तरेला राष्ट्रीय महामार्ग-क्रमांक २११ जुना बीड बायपास अन् दक्षिणेकडील डोंगर महिरिपीतून जाणार्या एनएच - ५२ सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गावर छाेट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघातही हाेतात. तसेच, सततच्या वाहतूक काेंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे शुक्रवार शनिवार, रविवार आणि इतर सणासुदीच्या सुटीच्या दिवशी साई टेकडीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने पर्यटकांनाही माेठा त्रास सहन करावा लागताे. पाणकळ्यात खड्ड्यात पाणी भरल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने फसगत होते.

Sambhajinagar
Sambhajinagar : जीव्हीपीआरने शहरभर केले मृत्यूचे खड्डे

गेल्या चार वर्षांपूर्वी ५०५४-०१०६ जिल्हा व इतर मार्ग या लेखाशिर्षाखाली एक कोटी ९१ लाख ४७ हजार ४१२ रूपयांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. ४ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या चारनिया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यात या संपुर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्ताखाली संपुर्ण काळीमाती असल्याने तसेच महापालिका हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावर कुठेही स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा नसल्याने शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहतीचे सांडपाणी रस्त्यावरच येत असल्याने चार वर्षातच या रस्त्याचे पार वाटोळे झाले. रस्ता उखडल्याने नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता कचनेर येथील जैन मंदिराकडे जातो. त्यामुळे तेथे जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागताे. पाऊसामुळे तर  खड्ड्यांचे  तळ्यात रूपांतर झाले आहे.  त्यामुळे छोटे-मोठे अपघातही हाेतात. या परिसरात सध्या ६० पेक्षा अधिक वसाहतींना आणि शेकडो गावातील ग्रामस्थांना पाठ , मान आणि मनक्याचा त्रास सोसावा लागत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : तब्बल 40 वर्षानंतर 'या' उद्यानातील रस्त्यांचे उजळले भाग्य

या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला ६० पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. या रस्त्यावर रॉयल ऑक्स इंग्लिश स्कूलसह छोट्या-मोठ्या १५ पेक्षा अधिक शाळा, एमजीएम कृषी विद्यापीठ, साई टेकडी, साई मंदिर, कचनेर जैन मंदिर आहे. तसेच, सोलापूर हायवेसुद्धा या रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे बीड बायपासकडून सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या माेठी आहे. या रस्त्याचा सखल भाग आणि आजुबाजुला दाट वसाहती आणि स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेचा अभाव त्यामुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी देवळाई चौक ते गावापर्यंत तीन किमीचा रस्ता काॅक्रीटचा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांसह शहरी हद्दीतील नागरिकांना या पक्क्या रस्त्यामुळे कायमची गैरसोय दुर होणार आहे.

महापालिका , महावितरण अन् मजीप्राचा खोडा

मात्र उद्घाटन होऊन चार महिन्यांचा काळ लोटला अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही. यासंदर्भात प्रतिनिधीने संबंधित विभागाकडे विचारणा केली असता रस्त्याच्या मधोमध महावितरणचे विद्युत खांब आणि महावितरणचे पथदिव्यांचे खांब रस्ता कामात अडथळा निर्माण करत आहेत. महापालिका विद्युत विभागाने पथदिव्यांचे खांब हटविण्यास सहमती दर्शवली. मात्र महावितरण कंपनीने सदर काम हे महापालिका क्षेत्रात असल्याने महापालिकेने विद्युत खांब स्थलांतर करण्यासाठी निधी महावितरणच्या खात्यात जमा करावा, असा तगादा लावला आहे. दुसरीकडे नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या संपुर्ण तीन किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजुने जलवाहिन्यांसाठी मजीप्राने जागेची शोधाशोध सुरू केली आहे. सिमेंट रस्त्यासाठी या रस्त्याचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. मात्र मजीप्राला जलवाहिन्या टाकण्यासाठी एका बाजुला दिड मीटर आणि दुसर्या बाजुला दोन मीटर जागेची आवश्यकता आहे. दोन मीटर जागेत खाली १३०० व्यासाची एक जलवाहिनी व त्यावरच ३५० व्यासाची एक जलवाहिनी टाकली जाणार आहे. दुसर्या बाजुने दिड मीटर जागेत एका खाली एक अशा ३५० व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. महावितरण कंपनीने निधीसाठी अडेलतट्टू धोरण न ठेवता तातडीने उच्च आणि अतिउच्च दाबाच्या व एलटी लाईनचे पोल तसेच भुमिगत केबल हटविल्यास मजीप्राचा जलवाहिनी टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही सर्व कामे पार पाडल्यानंतरच रस्ते कामाला मुहुर्त लागणार आहे. या प्रमुख अडचणी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी देखील महावितरण कंपनीला विनंती केली. मात्र महावितरण कंपनी बधत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. आता आ. संजय शिरसाट शिंदे सरकारकडून काय जोर लावतात यावर शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com