छत्रपती संभाजीनग (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक बेटांच्या व्यवस्थेचा महापालिका प्रशासनाला विसर पडल्यासारखी स्थिती असून, त्यामुळे वाहतूक बेटांच्या सौंदर्याला बाधा येत आहे. वास्तविक बघता शहराच्या सौंदर्यात या वाहतूक बेटांची महत्त्वाची भूमिका असते. पण महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या वाहतूक बेटांचे सौंदर्य लयास गेले आहे.
उल्का नगरी, जयनगर, बन्सीलालनगर, जवाहरनगर चौक, त्रिमुर्ती चौक, एमजीएम चौक, एसएससी बोर्ड, सीबीएसरोड, ज्युबलीपार्क, कामगार चौक, पुंडलिकनगर रोड, सेव्हनहील , आकाशवाणी, मोंढानाका, अमरप्रित चौक, रेल्वे स्टेशन रोड व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक बेटे आहेत. परंतु सध्या या वाहतूक बेटांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
या वाहतूक बेटांच्या व्यवस्थेकडे महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. वाहतूक बेटांवरील शोभेची झाडे सध्या पूर्णपणे सुकून गेली आहेत. तसेच काही झाडे वाहनांच्या धुरामुळे पूर्णपणे काळवंडली आहेत. काही ठिकाणी वाहतूक बेट तर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. त्याचा वापर बऱ्याचदा फलक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झेंडे लावण्यासाठीच करीत असतात.
याशिवाय काही वाहतुक बेटातील मुर्ती फुटलेल्या आहेत. कारंजे बंद आहेत. विद्युत रोषणाई बंद आहे. अनेक वाहतूक बेटांना वाहनाने धडक दिल्याने त्यांचे दगड कोसळले आहेत. महापालिकेने या वाहतूक बेटांच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही वाहतूक बेट कचऱ्यात अडकलेली आहेत.