छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव आणि एकेकाळी हर्सूल - सावंगी व आसपासच्या खेड्यांची तहान भागविणारा सावंगी तलाव आकाशचुंबी इमारतींच्या विळख्यात सापडले आहेत. १९९१ मध्ये नगर रचना विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यातील चुका दुरुस्त करताना महानगरपालिका प्रशासनाने हर्सूल, तसेच सावंगी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पिवळा पट्टा तयार केला होता. त्यामुळेच तेथे अधिकृतपणे बांधकामे होत आहेत. जसे हर्सूल तलावाचे चित्र दिसत आहे. तसेच नजीकच्या सावंगी तलावाचेही चित्र आहे.
नगररचना विभागाचे उपसंचालक रजा खान यांनी महानगरपालिकेकडे सादर केलेल्या विकास आराखड्यात दुरुस्तीच्या नावाखाली महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी हर्सूल तलावाच्या पाणलोट क्षेत्रातच बांधकामे कशी होतील, याची पूरेपूर काळजी घेतली. तलावाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या जागेतच शौचालयासाठी (आरक्षण क्रमांक बी-१३) आरक्षण टाकण्यात आले होते. रजा खान यांनी ही जागा हरित पट्ट्यात दाखवली होती. त्याला लागूनच मोठा तुकडा पिवळा म्हणजेच बांधकामायोग्य करण्यात आला होता. तेथे पोलिस ठाणे, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच पब्लिक ॲमिनिटीसाठी जागा ठेवण्यात आली होती.
ही जागा खासगी मालकीची असल्याचे नकाशात नमूद करण्यात आले होते. हर्सूल तलावाला लागून खालील बाजूने स्मृतिवन उद्यान आहे. असे असतानाही वरील बाजूने पुन्हा उद्यान ठेवून आरक्षणे गरजेची असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, रजा खान यांनी सादर केलेल्या नकाशामध्ये सावंगीच्या तलावातून बाहेर पडणाऱ्या नाल्याला व्यवस्थित रुंदी दिली होती; परंतु पदाधिकाऱ्यांनी गट क्रमांक १४ येथे उद्यानाचे आरक्षण टाकले. तसे करताना येथे नाला आहे हे दर्शवण्यात आले नाही. गट क्रमांक मध्ये बी-१९ येथे पुन्हा उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले. आजूबाजूला तेथे चार उद्याने दर्शवण्यात आली होती. याच गट क्रमांकामध्येच हे आरक्षण असून विशेष म्हणजे हा भाग सावंगी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येतो.
या चार आरक्षणांच्या मधोमध पाणलोट क्षेत्रात सर्व्हे क्रमांक ३६ हा पूर्णत: रहिवासी करण्यात आला होता. सर्व्हे क्रमांक ३४ जो थेट पाणलोट क्षेत्रात येतो, त्यातील निम्मा भाग पिवळा करण्यात आला होता. मात्र खान यांनी हा भाग हिरवा दाखवला होता.
१९९१च्या विकास आराखड्यात जळगाव रस्त्यावर असलेल्या सावंगी तलावाच्या बाजूला असलेला सर्व्हे क्रमांक ३४ हा पूर्णत: हिरवा पट्टा होता. सर्व्हे क्रमांक ३६ देखील हिरवाच ठेवण्यात आला होता. कारण ३६ सर्व्हे क्रमांकाचा पार्ट हा सावंगीच्या तलावात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठीच या सर्व्हे क्रमांकाचे भूसंपादन करण्यात आले होते. ३५ सर्व्हे क्रमांक हा पूर्णत: तलावात असल्याचे म्हटले होते.
उपसंचालक रजा खान यांनी जळगाव रस्त्यापासून पिसादेवीच्या सीमेपर्यंत २४ मीटर रस्त्याला सावंगीच्या तलावाची सीमा दिली. थोडक्यात तलावाच्या सीमेवरून हा रस्ता जातो. आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये हरित पट्टा ठेवला होता. म्हणजेच हे पाणलोट क्षेत्र असून, तेथे बांधकामे होणार नाहीत, याची खबरदारी रजा खान यांनी घेतली होती. मात्र पदाधिकाऱ्यांनी आरक्षणात बदल केल्यानेच आज तलावांना बांधकामाचा विळखा पडला आहे. त्यामुळे तलावांचे अस्तीत्वच पदाधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे धोक्यात आले आहे.