औरंगाबाद (Aurangabad) : कैलासनगर ते लक्ष्मण चावडी हा रस्ता तब्बल १३ वर्षांपासून रखडला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यातील बाधित मालमत्ताधारकांना हर्सुल गट क्रमांक २०१ मध्ये घरे देण्यात आली होती. मात्र, महापालिकेने पुढे ७ वर्ष रस्त्याचे काम न केल्याने ज्यांनी मावेजापोटी घरे घेतली त्यांनी पुढे आहे, त्याच जागेत टीनपत्र्याची शेड उभारून दुकानदारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी १४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार करण्याचे टेंडर मंजुर केले होते. याकामाचा ठेका ए. एस. कन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. मात्र कंपनीने ॲपेक्स हाॅस्पिटल ते एमजीएमपर्यंत बाराशे मीटरचे काम करत निम्मा रस्त्याचे काम केलेच नाही.
जालना रोडला पर्यायी रस्ता म्हणून लक्ष्मण चावडी ते एमजीएमकडे बघितले जाते. महावीर चौक ते सिडको बसस्थानकाकडे जाणार्या वाहनधारकांना जालना रोडवरून ये-जा करायची नसेल, तर वरद गणेश मंदिर ते थेट एमजीएमपर्यंत येता येईल. मात्र हा महत्वाचा रस्ता तब्बल १३ वर्षापासून रखडला आहे.
आधी रूंदीकरणासाठी आडकाठी
अनेक महापौरांनी, आयुक्तांनी रुंदीकरणासाठी जंगजंग पछाडले; पण रुंदीकरण झाले नव्हते. तब्बल २० वर्षानंतर २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंद करून दिला. ज्या मालमत्ताधारकांची रुंदीकरणात जागा गेली त्यांना टीडीआर तर काहींना हर्सुल नयी बस्ती भागात गायरान जमीनीवर घरे देखील बांधून दिली. तर काही धार्मिक स्थळाच्या सभासदांनी न्यायालयात धाव घेतली. आणि महापालिका अधिकार्यांना एवढेच निमित्त सापडले. मागील १३ वर्षांमध्ये महापालिकेने काहीच हालचाली न केल्याने प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला आहे.
माजी महापौरांचे आदेश खड्ड्यात
२ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी वादग्रस्त मालमत्ता सोडून रस्त्याचे काम सुरू करावे, असे निर्देश दिले होते, त्यांच्या घोषणेला पाच वर्ष उलटले तरी महापालिका प्रशासनाने काम सुरू केले नाही.
टेंडर काढले काम अर्धवट
यानंतर माजी उद्योगमंत्री तथा विद्यमान आमदार अतुल सावे यांनी या रस्त्याच्या रखडलेल्या कामावर लक्ष घातले. त्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर,माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी जोरदार प्रयत्न केल्यानंतर महापालिकेने १४ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यात ए. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने ५ टक्के कमी दराने टेंडर दाखल केले होते. त्यावर मुगळीकरांनी त्याला तडकाफडकी अंतिम मंजुरी देखील दिली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कंन्सट्रक्शन कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली होती.
घोडेलेंच्या आश्वासनानंतरही अडले घोडे
सर्व प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी २६ जानेवारी २०१८ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या रस्त्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात केले होते. त्यावर आता या रस्त्याचे काम कुठल्याही अडथळ्याविना शंभर टक्के पुर्ण होणार, असे त्यांनी दिले आश्वासन मात्र हवेत विरले.
मृत्यूनंतरही औरंगाबादकरांचा खडतर प्रवास
औरंगाबादकरांचे जीवन मुलभुत समंस्यांनी खडतर बनले आहे. मृत्युमुळे महापालिकेच्या जाचक त्रासातून काहींची सुटका होते. मात्र याच मार्गाची मृत्युनंतरही ही वाट बिकटच राहिली तर काय करावे? अशीच वेळ औरंगाबादकरांवर सध्या आली आहे. याच मार्गावर असलेल्या लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत अंत्यसंस्कारासाठी कमरेएवढय़ा पाण्यातून त्यांना वाट काढावी लागत आहे. रस्त्यांची दयनीय स्थिती आणि यातच या मार्गावर अतिक्रमणाचा वाढलेला विस्तार यामुळे स्मशानातील प्रवेशद्वारापर्यंत पोहचण्याची वाटच चिंचोळी झाली आहे. जागोजागी खड्डे त्यात पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी खड्डे आणि रस्त्यातच साचत असल्याने अत्यंत कसरतीने मार्ग काढावा लागत आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुने गजबलेले कैलासनगर, संजयनगर आणि बायजीपुरा यातून या रस्त्याचा खडतर प्रवासामुळे विद्यार्थी, नागरिक सारेच वैतागलेले आहेत. महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय शहर विकासाच्या बाता करत कोट्यावधीचे टेंडर काढत आहेत मात्र शहराच्या दळणवळणात महत्वाच्या या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.