छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर ते जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ सी करमाड येथून डीएमआयसी येथे जाताना करमाड डीएमआयसी चौक अंत्यंत धोकादायक ठरत आहे. चारी दिशांनी येणाऱ्या वाहनांच्या वेगाला अटकाव घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने हा चौक पादचारी आणि वाहनांसाठी धोकादायक झाला आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघाताची भीती नागरिकांसह वाहनचालकांमध्ये कायम आहे.
करमाड येथील या चौकाच्या बाजूलाच मोठी बाजारपेठ पेठ आहे. बाजारपेठसाठी कोणत्याही प्रकारची पार्किंगची जागा उपलब्ध नाही. दुकानदारांनी रस्त्यालगत पानटपर्या, खानावळी, हाॅटेल्स, फळभाजी विकण्यासाठी रस्ताच काबीज केला आहे. त्यात हा चौक सर्वांत वर्दळीचा मानला जातो. त्यात या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक आणि ऑरीक सिटी, डीएमआयसीकडे जालना रस्त्याकडुन उत्तरेकडे मालवाहु ट्रक, कामगार बसेच, दुचाकी वळवताना अतिक्रमणाच्या भाऊगर्दीतून वाट काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागात अनेक उद्योग येण्याच्या वार्ता सुरू आहेत.. त्यामुळे भविष्यात अधिक वर्दळीचा मार्ग आणि चौक म्हणून करमाड डीएमआयसीच्या चौकाची नोंद होणार आहे. इतका महत्त्वाचा चौक असूनही एमआयडीसी, डीएमआयसी व बांधकाम विभागाने याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. यासाठी संबंधित विभागांनी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक विभागाला सोबत घेत सर्कल अथवा इतर उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून वाढू लागली आहे.
डीएमआयसी रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक किंवा सुचनाफलक नाहीत.दिवसेंदिवस हा चौक अपघाताचे केंद्र बनत चालला आहे. त्यातच लाडगाव व करमाड येथील उड्डाणपुलावरील वाहतूक खुली झाल्यामुळे डीएमआयसीतून वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने या चौकात मागील चार महिन्यांत आठ जणांनी जीव गमावला आहे. मागील दहा वर्षात ५६ बळी गेल्याची करमाड पोलिसात नोंद आहे. तरीसुध्दा डीएमआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चौकात कोणतेही सुचनाफलक, रस्त्यावर गतिरोधक, रस्त्यावरील दुभाजकावर रिफ्लेक्टर लाइट लावलेले नाहीत. गत रविवारी अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे सकाळी दहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या व दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला व एक जन गंभीर जखमी झाला. त्यामुळे डीएमआयसी, एमआयडीसी व बांधकाम विभागाला किती बळी हवेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.