छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा गावातील पुर्णानदीत दिलेल्या परवान्यापेक्षा जास्तीचा वाळू उपसा झाला आहे. यासंदर्भात विविध पातळीवर तक्रारी केल्यानंतर देखील चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आली. परिणामी वाळूपट्टाधारक सीईओ सय्यद रफिक कंकर व महसुल विभागातील अधिकारी अद्यापही मोकाट आहेत. आमचे कुणीच काही करू शकत नाहीत. या अविर्भावात ते फिरत आहेत. महसुल प्रशासनाची दिरंगाई व मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दबाबामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ होत असल्याची शंका ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दुसरीकडे ढगाळ वातावरण असल्यामुळे मोठा पाऊस झाल्यास पुरावे नष्ट होतील या भीतीने ग्रामस्थांची सहनशीलता संपल्याने अखेर त्यांनी या वाळूघाटाची एका खाजगी संस्थेद्वारे इटीएस (इलेक्ट्राॅनीक टोटल स्टेशन) मशीनद्वारे मोजणी केली. पंचनामा व सद्य: स्थितीचा अहवाल तयार केला. त्या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्रित येत हे काम केले. त्यानंतर अहवालासह ग्रामस्थांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच राज्याचे महसुल व वन विभागाचे अप्पर प्रधान सचिवांसह विरोधी पक्षनेते व संबंधित सर्व मंत्री महोद्यांना पुन्हा अंतिम सुचनापत्र देत चौकशीची मागणी केली आहे.
सिल्लोड मतदार संघाचे आमदार व राज्याचे कृषीमंत्री यांच्या मतदार संघात तसेच तालुक्यासह सिल्लोड नगरपरिषदेत त्यांचीच ऐकाधिकारशाहीचा फायदा उचलत त्यांनी नामानिराळे होत सिल्लोड नगरपरिषदेचे सीईओ सय्यद रफिक कंकर मार्फत नगरपरिषदेअंतर्गत ०९ विकासकामांसाठी वाळूघाट राखीव ठेवण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांच्या आदेशाने सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील पुर्णानदीपात्रात वाळूघाटाचा परवाना मिळवला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अटीशर्तींचा भंग करत कंकरने बेसुमार वाळू उपसा केला. यानंतर ग्रामस्थांनी ८ जून २०२३ रोजी सबळ पुराव्यासह निवेदन सादर केले होते. परंतु सदर प्रकरणात १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील कुठलीही कारवाई झाली नाही. त्याचप्रमाणे संबंधित महसुल प्रशासनाकडून ग्रामस्थांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कोटनांद्रा येथील तक्रारदार संजय माणिकराव निकम यांनी काही जागरूक ग्रामस्थांसह १८ जुन २०२३ रोजी एकत्रित येऊन सरकारी यंत्रणेप्रमाणेच प्रत्यक्ष गट क्रमांक १३७, १४०, १४२, व १४३ मधील वाळूघाटात जाऊन स्थानिक गावकऱ्यांसह पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवान्याची प्रत हातात ठेऊन गावातील प्रतिष्ठीत समाजसेवक महेश शंकरपेल्ली यांनी स्वतः एका खाजगी संस्थेमार्फत इटीएस (इलेक्ट्राॅनिक टोटल स्टेशन) यंत्राद्वारे झालेल्या उत्खननाची मोजणी करून उपस्थित पंचांच्या समक्ष त्यांच्या सहीने सविस्तर पंचनामा तयार केला. त्याचप्रमाणे बेसूमार उत्खनन झालेल्या जागेचे व्हीडीओ चित्रण व फोटो काढून अहवाल तयार केला. याच अहवालासह त्यांनी पुन्हा शुक्रवारी (ता. २३) संबंधित प्रशासनाला अंतिम सुचनापत्र दिले.
ग्रामस्थांचा दावा : सत्ताधारी सत्तारांचे धाबे दणाणले
ग्रामस्थांच्या स्वतः इटीएस यंत्राद्वारे उत्खनन झालेल्या जागेची मोजणी व पंचनामा व अहवाल तयार करण्याची कुणकुण लागताच सत्तारांचे धाबे दणाणले आणि त्यांनी तडकाफडकी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला जुंपले. दोन दिवसात अहोरात्र धावपळ करून शेकडो गाड्या, हायवा, टिप्पर वापरून विविध ठिकाणी साठवलेला वाळूसाठा लंपास करण्याचे काम सुरू केले. त्याचप्रमाणे नदीपात्रात सुध्दा जेसीबीच्या साह्याने वाळू उपसासाठी खोदलेले मोठमोठे भगदाडं बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न मागील दोन दिवसांपासून करण्यात आल्याचा तक्रारदार संजय माणिकराव निकम यांचा दावा आहे. या पंचनाम्यात सीईओ कंकरने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ९१ अटीशर्तींपैकी ३९ अटीशर्तींचा भंग केल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारदार निकम यांनी केला आहे.
काय म्हणतात तक्रारदार
सदर वाळूघाट लिलाव प्रकरणामध्ये कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार झालेला आहे. उत्खनन करताना अनियमितता झालेली आहे. यात सत्तार यांच्यासह त्यांचे समर्थक व परिवाराचा मोठा वाटा आहे. सिल्लोड येथील सर्व्हे नंबर ९०, ९१ व ९२ मधील सत्तार यांचा महत्वाचा प्रकल्प रूग्णालय व मेडीकल काॅलेजच्या बांधकामासाठी एक हाती सत्ता असलेल्या नगरपरिषदेच्या नावावर कोटनांद्रा पुर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आला आहे. सिल्लोड-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सर्व्हे नंबर १३९ मध्ये सत्तार यांचा काँक्रिट हाॅटमिक्सचा मोठा प्लाॅट आहे. येथे हजारो ब्रासचा वाळूसाठा करण्यात आला आहे. याच प्लाॅटवरून सत्तार यांच्या खाजगी कामावर रेडिमिक्स काँक्रिटचा पुरवठा केला जातो. कोटनांद्रयात गट नंबर १४६ मध्ये आजही आठ हजार ब्रास वाळूचा साठा आहे.
तक्रारदारांचे म्हणणे -
सिल्लोड शहरातील सत्तार यांचे समर्थक, नातेनाईक व विविध सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा केला आहे. याची संबंधितांनी शहानिशा करावी.याप्रकरणात महसुल प्रशासन व वरिष्ठ अधिकारी सत्तार यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यानेच कारवाई होत नाही, अशी तक्रारदारांची मागणी आहे.
- सुनिल मिरकर
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोणत्याही क्षणी मोठा पाउस झाला तर नदीपात्रात पुर येईल व खोदकामाचे पुरावे नष्ट होतील, यामुळे तातडीने चौकशी आवश्यक आहे.
- महेश शंकरपेल्ली
सदर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी. कोटनांद्रा ग्रामस्थांनी केलेला पंचनामा व अहवालानुसार त्यामध्ये उच्चस्तरिय चौकशी समिती (SIT) गठित करून ४८ तासात सखोल चौकशी करावी. आम्हाला येथे न्याय न मिळाल्यास आम्ही राष्ट्रीय हदित लवादाकडे दाद मागणार आहोत.
- संजय निकम