छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व सरकारी कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम मंजुरी न मिळाल्यामुळे रखडले आहे. परिणामी गेल्या कित्येक वर्षांपासून निजामकालीन मोडकळीस आलेल्या उपविभागीय व तहसिलदार तसेच अप्पर तहसिलदार कार्यालयातील गैरसोईसुविधांमुळे येथील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागेच असलेल्या उपविभागीय तथा तालुका दंडाधिकारी व तहसिलदार शहर विभाग व अप्पर तहसिलदार (ग्रामीण) तसेच निवडणूक विभाग, नोंदणी विभाग व अन्यधान्य वितरण विभागाची कार्यालये आहेत. यापैकी तहसील व एसडीएम कार्यालयाच्या इमारती ब्रिटीशांच्या काळातील असल्याने मोडकळीस आल्या आहेत. अशा परिस्थितीत काम करणेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिकिरीचे झाले आहे. या कार्यालयाव्यतिरिक्त इतर कार्यालयांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे येथील जुन्या इमारती जमीनदोस्त करून नवीन इमारत उभारणे गरजेचे असल्याची दबक्या आवाजात अधिकारी व कर्मचारी चर्चा करताना दिसत आहेत.
सद्य: स्थितीत तहसिल अप्पर तहसिल व एसडीएम कार्यालये वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यासंबंधित कोशागार, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, रेकॉर्ड, स्ट्रागॅरुम देखील विरूद्ध दिशेला आहेत. येथील मोडकळीस आलेल्या इमारती पाडून नव्याने उभारणी करून सर्व कार्यालये एकाच छताखाली आणल्यास अधिकाऱ्यांना काम करणे सोपे होईल, नागरिकांची पायपीट वाचेल व अधिकाऱ्यांना देखील कमी वेळात जनहितार्थ कामे पार पाडता येतील. परंतु, सरकार विविध तांत्रिक अडचणी आणि निधीची कमतरता, अशी कारणे दाखवत अद्यापही या इमारतीःकडे डोळेझाक करत आहे.
मोडकळीस आलेली तहसिल, एसडीएमओ (उप विभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी) तसेच अभिलेख कक्षाची इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्याही जिवालाही धोका कायम आहे. यासंदर्भात महसूल विभागाकडे प्रतिनिधीने विचारपूस केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करण्यात येऊनही त्याबाबत कारवाई झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह येथे येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारा, खासरापत्र व इतर महत्वाचे कागदपत्र जतन व संवर्धन करणारा अभिलेख कक्ष कोसळल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील आवारात असलेल्या महसूल विभागाशी संबंधित अभिलेख कक्ष आणि तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालये समोरासमोर आहेत. दुसरीकडे टेकाड्यावर तहसिलदार, अप्पर तहसिलदार आणि एसडीएमओ कार्यालये आहेत. चारशे वर्ष जुन्या या निजामकालीन इमारतींची गेली कित्येक वर्षांपासून डागडुजी केलेली नाही. त्यामुळे या इमारतीच मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतीच्या भिंत व छत कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता येथील कर्मचारी व्यक्त करत आहेत. या सर्व कार्यालयात शेकडो कर्मचारी आहेत. तालुक्यातील हजारो खेड्यांचे महसूलाचे कामकाज कार्यालयातून केले जाते. दररोज हजारो नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. त्यामुळे कार्यालयांचा स्लॅब अथवा भिंत कोसळून दुर्घटना झाल्यास कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही याचा धोका आहे.