औरंगाबाद (Aurangabad) : चिकलठाण्यातील तब्बल २० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली बहूचर्चित पिटलाईन आता मुख्य रेल्वेस्थानकावर वळवण्यात आल्याने चिकलठाण्यातील ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात चिकलठाण्यातील रमेश दहिहंडे यांना विचारले असता पिटलाईन नेमकी कुठे होणार हा प्रकार आम्हाला माहित नाही. पण चिकलठाण्यावर अन्याय केला तर पुन्हा ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एकीकडे तिथे जागा नसल्याचा दावा भाजपचे मंत्री अतुल सावे करत आहेत. दुसरीकडे चिकलठाण्यात दुसरी पिटलाईन करा अशी मागणी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) रेल्वेमंत्र्यांकडे करत आहेत. एकूणच पिटलाईनबाबत सावळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे रेल्वे बोर्डाने मे २०२२ मध्ये २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये निधी चिकलठाणा पिटलाईनसाठी मंजुर केलेला होता. मात्र पाच महिन्यात सदर कामासाठी कुठलेही टेंडर प्रसिध्द करण्यात आले नाही. अद्याप याकामाची कुठलीही तांत्रिक वा प्रशासकीय मान्यता नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या तिजोरीत रेल्वे बोर्डाकडून अद्याप छदाम देखील पडला नाही. असे असताना अचानक चिकलठाण्यातील पिटलाईन औरंगाबाद मुख्य रेल्वेस्थानकावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या कामाचे सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सहकार राज्यमंत्री म्हणाले जागेची अडचण
यासंदर्भात सहकार राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे विचारणा केली असता चिकलठाण्यात जागेचा अभाव आहे, भूसंपादन केले असते तर पिटलाईनची किंमत वाढली असती, त्याऐवजी मालधक्क्यासाठी दौलताबादला रेल्वेची भरपूर जागा आहे, तिथे औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील मालधक्का हलवण्यात येणार आहे. त्याएवजी औरंगाबाद रेल्वेस्थानकावरच पिटलाईन तयार केली जाणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भूमीपूजनाच्या दिवशीच पुन्हा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना चिकलठाण्यात दुसऱ्या पिटलाईनची मागणी करत या प्रकरणात संभ्रम निर्माण केला आहे.
तज्ज्ञांचे मत
चिकलठाण्यातील प्रस्तावित पिटलाइनचे काम मार्गी लागले असते, तर नव्या रेल्वे गाड्यांसाठी उपयुक्त ठरणार होते. शिवाय लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची यामुळे दुरुस्ती आणि स्वच्छता तिथे झाली असती. तसेच शेंद्रा येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी ती फायदेशीर ठरली असती. शिवाय लागूनच विमानळ, धुळे - सोलापूर हायवे असल्याने कनेक्टिव्हिटी वाढली असती. याऊलट औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील पिटलाईनच्या ऐवजी मालधक्का हटवून तेथे रेल्वे ट्रॅकची व्याप्ती अधिक वाढवता आली असती असे तज्ज्ञांचे मत आहे.
चिकलठाणा पिटलाईनसाठी सुरवातीपासूनच नकारघंटा
रेल्वेची पिटलाईन यापूर्वीच चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. मात्र, पुढे चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी पडत आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पिटलाईन शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी कारणे पुढे केली होती. दरम्यान त्याच वेळी जालन्यातही पिटलाईनसाठी जागेची पाहणी झाली होती.
यातच तब्बल दोन दशकानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक औरंगाबादेत आयोजित केली होती. या बैठकीत चिकलठाणा पिटलाईनकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र दानवे यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत चकार शब्दही देखील काढला नाही. त्यावर खा. इम्तियाज जलील यांनी दानवे यांना मंत्री साहेब, पिटलाइन चिकलठाण्यात की, जालन्याला', असा प्रश्नार्थक टोला मारला होता. त्याच्या अवघ्या चार महिन्यानंतर दानवेंनी चिकलठाण्यातील प्रस्तावित पीटलाईन जालन्याला पळवली आणि कित्येक वर्षापासून पिटलाइनसाठी झगडणाऱ्या अवघ्या जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का दिला.
चिकलठाणा विकासाची आशा मावळली
औरंगाबादच्या विकासात मोलाची साथ देणाऱ्या चिकलठाणावासीयांच्या जमिनी भूसंपादन करून औद्योगिक वसाहत, विमानतळ, जालनारोड रुंदीकरण आणि दक्षिणेला विमानतळ लगत रेल्वेफाटक, रेल्वे रूळ टाकला गेला. मात्र गावाचा विकास झाला नाही. त्यानंतर शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीलगत शेंद्रा, करमाड, कुंभेफळ, सटाणा, सेक्टा या गावाचा विकास झाला. इकडे कंपन्या बंद पडल्या. त्यात पुन्हा विमानतळ विस्तारासाठी चिकलठाण्यातील जमिनी भूसंपादनाच्या नोटिसा बजावने सुरूच आहे. अशा स्थितीत चिकलठाणावासीयांनी दानवेंच्या रुपात मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाल्याने भूषण व्यक्त केले होते.अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या आपल्या चिकलठाण्यातील पिटलाइनचा प्रश्न ‘फास्ट ट्रॅक’वर येईल आणि गावाचा विकास होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता ही पिटलाईन औरंगाबाद स्थानकावर वळवल्याने विकासाची आशाच पार मावळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अनेकांचा पुढाकार अयशस्वी
१ जानेवारी २०२१ रोजी दानवे यांनी पिटलाइन चिकलठाण्याऐवजी जालन्यात अशी घोषणा केल्यानंतर चिकलठाण्यातील ग्रामस्थांनी दानवे यांच्या निषेधार्थ मोठे जन आंदोलन उभारले. त्याबरोबरच मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अनंत बोरकर, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे स्व. ओमप्रकाश वर्मा यांनी चिकलठाण्यातच पिटलाइन व्हावी, असा सूर लाऊन धरला. खा. इम्तियाज जलील यांनी देखील थेट दानवे यांच्या मनमानी कारभारावर लोकसभेत आवाज उठवला होता. विशेष म्हणजे परभणीच्या खासदार फौजिया खान यांनी दहा वर्षांपूर्वीच चिकलठाणा येथे पिटलाइन तयार करण्याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र दिल्याचा मुद्दाही यावेळी समोर आला होता. विशेष म्हणजे २७ डिसेंबर २०२० रोजी रेल्वे स्टेशनवर झालेल्या एका बैठकीत चिकलठाणा येथे पिटलाईन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वे अधिकार्यांना केली होती. माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी देखील दानवे यांच्या पळवापळवीच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. त्याचा काही उपयोग ग्रामस्थांना झाला नाही.
दानवेंना घोषणेचा विसर
दानवे यांनी चिकलठाण्यातील पीटलाइन जालन्याला पळवल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्ह्यात सर्व स्तरावर नाराजीचा सूर उमटला होता. हा प्रकार औरंगाबादच्या भाजप मतपेटीवर परिणाम करणार असल्याचे दिसताच औरंगाबादेत वेळोवेळी झालेल्या बैठकीत खा. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, सहकार राज्यमंत्री अतुल सावे, आ. नारायन कुचे, आ. प्रशांत बंब, तसेच जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी देखील भाजप श्रेष्ठींकडे खंत व्यक्त केली होती. त्यातच दानवे यांनी जालना - जळगाव रेल्वेमार्गाचे काम सहा महिन्यातच फत्ते केल्याने औरंगाबादेतील पिटलाइन कागदावरच अशी टीकेची झोड दानवेंवर उठायला सुरूवात केली. शेवटी दानवेंचा सर्व बाजुंनी कोंडमारा होत असल्याचे पाहून त्यांनी चिकलठाण्यात पिटलाइनबाबत निर्णय घेतला आणि त्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करून ३० कोटी रूपये मंजूर करून घेतले आणि २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या समक्ष चिकलठाण्यात पिटलाइन होणार अशी घोषणा केली होती.
रेल्वेचा दावा
● कोचिंग सुविधांच्या अद्ययावतीकरणाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने अंदाजे ३० कोटी खर्चून नवीन कॅमटेक डिझाइन केलेल्या पिटलाइनचे बांधकाम प्रस्तावित केले आहे.
● औरंगाबाद स्थानकावरील ही नवीन पिटलाईन पॅसेंजर, पार्सल आणि फुल रेट शेड्युल (FTR) गाड्यांची देखभाल दुरुस्ती करेल. सद्य स्थितीत ही सुविधा नांदेड येथून केली जाते.
● या नवीन सुविधेमुळे रोलिंग स्टाॅकच्या देखभालीसाठी सुधारणा होणार. परिणामी गाड्यांचे प्रमाण वाढेल.
अशी असेल पिटलाईन
● कॅमटेक डिझाईन असलेली १६ कोच लांब ४०० मीटर पिटलाइन.
● कॅरेज आणि वॅगन आणि ट्रेन लाइटिंग/ कर्मचाऱ्यांसाठी एसी इमारत.
● डब्यांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह स्वयंचलित कोच वाॅशिंग प्लाॅट.
● पाणी साठवण्यासाठी सिंक्रोनाइज्ड जॅक, हाय प्रेशर कोच क्लीनिंग मशीन, एअर कॉम्प्रेसर तसेच ओव्हरहेड टाकीची सुविधा.
● डब्यांची तपासणी, साफसफाई, चार्जिंग आणि पाणी देण्याची सुविधा