औरंगाबाद (Aurangabad) : चिकलठाणा रेल्वे स्थानकावर पाच वर्षांपूर्वी ११ कोटीत पीटलाईप टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. मात्र आता पीटलाईन जालन्यात वळवण्यात आली आहे. नव्याने निश्चित केलेल्या या जागेवर आता पीटलाईनसाठी १०० कोटी रूपये खर्च केले जाणार आहे. अर्थात पाच वर्षात पीटलाईनसाठी वीसपटीने वाढ कोणासाठी करण्यात आली. हा खरा संशोधनाचा विषय आहे. नुकत्याच जाहिर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या घोषणेनंतर ही बाब समोर आली आहे.
नांदेड विभागीय व्यवस्थापकाच्या प्रयत्नांना खिळ
गेल्या अनेक वर्षांपासून चिकलठाणा रेल्वेस्थानकावर पीटलाईन टाकण्याची मागणी केली जात होती. नांदेड विभागीय व्यवस्थापक डाॅ. ए. के. सिन्हा यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या सोबत औरंगाबादमध्ये १० जून २०१७ रोजी झालेल्या बैठकीत पीटलाईनचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी यादव यांच्या सुचनेनंतर जागेची शोधाशाध करत चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसराची जागा निश्चित केली होती. यासंदर्भात सिन्हा यांच्या प्रस्तावाला २७ सप्टेंबर २०१७ रोजी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली होती.
अकरा कोटीची मंजुरी
त्यामुळे लांब पल्ल्याची रेल्वे औरंगाबादहून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी आवश्यक असणारी पीटलाइन टाकण्यासाठी अकरा कोटी रूपये मंजुर करण्यात आले होते. विशेष म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दीड वर्षाच्या कालावधीत पीटलाईन उभारणीची घोषणा कली होती.
औरंगाबादेत जल्लोष
औरंगाबादच्या माॅडर्न रेल्वेस्थानकातील एका बैठकीत यादव यांच्या घोषणेनंतर शहरभर प्रसारमाध्यमांमार्फत ही खुशखबर घराघरात पोहोचली. त्यामुळे औरंगाबादकरांचा आनंद द्विगुणीत झाला होता.
दानवेंच्या घोषणेनंतर आनंदावर विरजन
मात्र तीन दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल १०० कोटी रूपये खर्च करून जालना रेल्वे स्थानकावल पीटलाईन उभारणीची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी करताच आनंदावर विरजन पडले. या घोषणेने औरंगाबादेत संतापाची लाट पसरली आहे.