औरंगाबाद (Aurangabad) : सिडको मुकुंदवाडी येथील सोहम मोटर्स ते एसटी काॅलनी ते हायकोर्टपर्यंतचा जोड रस्ता खड्ड्यांमुळे खूप खराब झाला आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा वेग या खड्ड्यांमुळे कमी होत असून, खड्ड्यांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे काही सुसाट वाहने खड्ड्यातून जाताच पादचारी व इतर वाहनधारकांच्या कपड्यांवर चिखलफेक होत असल्याने या मार्गावर शाब्दीक चकमकी नियमित पाहावयास मिळत आहेत.
औरंगाबाद शहरातील मृत्युचा महामार्ग म्हणुन कुप्रसिध्द असलेल्या जालनारोडवरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी सिडको एन-३ व एन-४ तसेच एन-२ कडे जाणारी अनेक वाहने हायकोर्ट ते सोहम मोटर्स या जोड रस्त्याकडुन जातात. सध्या हा संपुर्ण रस्ता खूपच खराब झालेला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या गाड्यांचा वेग कमी होत आहे. तर काही सुसाट वाहने खड्ड्यातून जाताच लोकांच्या कपड्यांवर घाण पाणी उडत असल्याने खड्डे भांडणाचे मुळ कारण ठरत आहेत.
सोहम मोटर्स ते हायकोर्ट या रस्त्यावर दोन पेट्रोल पंप, दूचाकी - चारचाकी वाहनांचे शोरूम, मोठमोठी रूग्णालये, हाॅटेल्स व बार रेस्टाॅरंट तसेच लाॅजींग बोर्डींग, सरकारी- निमसरकारी कार्यालये व इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठी व्यावसायिक दालनांसह बँका, एटीएम देखील या चिंचोळ्या रस्त्याच्या कडेला असल्याने रस्त्यालगत दुचाकी चारचाकींची मोठी पार्किंग असते. त्यामुळे आधी कमी रूंदीचा रस्ता त्यात वाहनांमुळे रस्त्याचा व्याप कमी झालेला दिसतो. त्यात या खड्ड्यांमुळे सकाळी आठ ते ११ वाजेच्या दरम्यान मुकुंदवाडी ते हायकोर्टकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. शिवाय या मार्गावर कामगार आणि शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस व पेट्रोल भरणार्या वाहनांची संख्या अधिक असल्याने या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा फटका सर्वेच नागरिकांनाही सोसावा लागत आहे.
सोहम मोटर्स ते हायकोर्ट या तीन ते चार किमीच्या रस्त्याचे अंतर हे पाच ते सहा मिनिटांच्या आत पार होणे अपेक्षित आहे. मात्र, हा रस्ता चाळणीदार रस्ता झाल्याने अवघ्या पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पंधरा-वीस मिनिटे लागतात.
खड्यांमुळे अपघाताच्या घटना
या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या अनेक घटना होत आहेत. चार चाकी वाहन एक दुसऱ्यांना धडकण्याच्या घटना होत आहेत. शिवाय दुचाकी वाहने खड्ड्यात अडकून वाहनधारक खाली पडल्याच्याही घटना या रस्त्यांवर घडलेल्या आहेत.
- सुचिता शिंदे , गृहिणी
आम्ही दररोज या रस्त्याने प्रवास करतो. या रस्त्यावर खड्डे खूप झाले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या खड्ड्यांबाबत संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
- विनय कोंडापल्ले , वाहनधारक
खड्डेमय रस्त्यातून दररोज वाहने न्यावी लागत आहे. यामुळे वाहन खराब होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. हा रस्ता तयार करण्याबाबत योग्य ती कारवाई अद्याप झालेली नाही. सर्वसामान्यांना दररोज खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
- अनिकेत मोरे, वाहनधारक