औरंगाबाद (Aurangabad) : उठसूठ कोणीही यावे आणि महागड्या प्रोझोन माॅल समोरील रस्त्यावर परवानगी नसतानाही अनधिकृतपणे वाहने उभी करावीत, हा नियमच बनला आहे. प्रोझोन मॉलकडून पार्किंगसाठी करण्यात येणारी शुल्क आकारणीच मुळात बेकायदा आहे. तरीही भरमसाठ पार्किंग शुल्क प्रोझोन मॉलकडून आकारले जाते. मग त्यातून सूट मिळविण्यासाठी म्हणून रस्त्यावर फूकटात वाहने पार्क केली जातात. त्यामुळे येथे रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या 'फूकट बहाद्दरां'वर कारवाईचा दंडुका उगारण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. मागील आठवड्यापासून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.
प्रोझोन मॉलमध्ये खरेदी आणि मौजमजा करणाऱ्या बड्या बड्या फूकट्यांना आता 'ओ, साहेब; ओ, साहेब' करण्याची वेळ आली आहे. पण, पोलिस कोणालाही दाद देत नाहीत. दंड वसूल करूनच जॅमर काढले जात आहे. त्यामुळे येथे रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या फूकट्यांना अनधिकृतपणे पार्किंग करताना १० वेळा विचार करावा लागत आहे. माॅलमध्ये कोणत्याही छोट्या - मोठ्या खरेदीसाठी चारचाकी वाहने आणणे आता एक प्रकारची 'क्रेझ' बनली आहे.
प्रोझोन माॅलकडून बेकायदा वसुली
महागड्या प्रोझोन माॅलमध्ये पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. मात्र न्यायालयाचे आदेश डावलून मॉलकडून पार्किंगसाठी पैसे उकळले जात आहेत. विशेष म्हणजे, याच प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यानंतर देखील प्रोझोन मॉल व्यवस्थापनाकडून ग्राहकांकडून तात्पूरत्या वेळेसाठी दुचाकीसाठी २५ रूपये आणि चारचाकीसाठी ५० रूपये शुल्क आकारले जात आहे.
परिणामी या शुल्कातून बचत करण्यासाठी वाहनधारक माग रस्त्यावर वाहने पार्किंग करून रस्ता अडवतात. आता पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी यावर कायमस्वरूपी दंडात्मक उपचार करण्याचे आदेश दिल्याने सिडको वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी सांगितले.