लातूर (Latur) : मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या येथील मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यातून येत्या सात वर्षांत १२० वंदे भारत रेल्वेंची (Vande Bharat Railway) निर्मिती केली जाणार आहे. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी येथे दिली.
दानवे यांनी रविवारी येथील कारखान्याची पाहणी केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील- निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड, माजी आमदार पाशा पटेल, गोविंद केंद्रे, अरविंद पाटील निलंगेकर आदी उपस्थितीत होते.
मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा बोगी कारखाना महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी येथील ‘एमआयडीसी’त ४१३ एकर जागा घेण्यात आली आहे. यापैकी ३५० एकरवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्यांदा या कारखान्यात वातानुकूलित बोगी तयार होणार होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेत वंदेभारत रेल्वेची घोषणा केली. देशासाठी ४०० वंदेभारत रेल्वे तयार होत आहेत. या पैकी १२० वंदेभारत रेल्वे येथील कारखान्यात तयार होतील, असे दानवे यांनी सांगितले.
या कारखान्यासाठी ६०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. वंदेभारत रेल्वे तयार करण्याचे काम रेल्वे विकास निगम लिमिटेड व रशियाच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जुलै ते ऑगस्टमध्ये या कंपन्या कारखान्याचा ताबा घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करतील. तत्पूर्वी या कंपन्यांना २०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात करार होऊन कामाला सुरवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कारखान्यात टप्प्याटप्प्याने वंदेभारत रेल्वेची निर्मिती होईल. सात वर्षात १२० रेल्वे तयार होतील. आणखी ८० रेल्वे तयार करण्याचे आदेश कशा पद्धतीने देता येतील, याचा विचार होईल. देशात तयार होणाऱ्या एकूण ४०० पैकी २०० वंदेभारत रेल्वे लातूरमध्ये तयार होतील. या कारखान्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या साहित्यासाठी व्हेंडर येथे तयार होतील. यातून रोजगार निर्मितीही होईल. स्थानिक पातळीवर कौशल्य असलेले कामगार मिळाल्यास ते बाहेरून आणण्याची वेळ येणार नाही, असे दानवे म्हणाले.
देखभाल प्रकल्प मिळावा
काझीपेठ येथे रेल्वे देखभालीचा (मेन्टेनन्स) एक प्रकल्प देण्यात आला आहे. त्याला तेथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प लातूरला द्यावा, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.