मकई गेट ते टाऊन हाॅल रस्त्यावरून जाताना प्रवाशांचे हाल; कंत्राटदाराचे सोईस्कर दुर्लक्ष

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : आठ महिन्यांपूर्वी शहरात जी - २० चे (G 20) पथक येणार म्हणून तत्कालीन मनपा प्रशासकांनी कंत्राटदाराला (Contractor) दहा दिवसांत काम पूर्ण करण्याची ताकीद दिली होती. दरम्यान रस्त्यापेक्षा मलनिःसारण वाहिनीचे चेंबर उंच केल्याने वाहनांच्या धडका बसत असल्याचा प्रकार समोर येताच प्रशासकांनी कंत्राटदाराची मस्ती उतरवत चांगलेच कान टोचले होते. 

जी-२० पथक शहरात येऊन आठ महिन्यांचा काळ लोटला. पथक माघारी फिरले. मात्र ज्यांच्यासाठी हा रस्ता तयार करण्याची धडपड तत्कालीन महानगरपालिका प्रशासकांनी केली होती त्या रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने प्रवाशी, पर्यटक, विद्यार्थी आणि चाकरमान्यांसह रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या कामात स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्प अधिकऱ्यांचा वचक आणि महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओंची प्रशासनावर पकड नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

Sambhajinagar
Good News : 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 4 मिनिटांत; कल्याणच्या 'त्या' उन्नत मार्गासाठी 700 कोटींचे टेंडर

गत फेब्रुवारी महिन्यात शहरात जी-२० चे पथक येणार असल्यामुळे तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत मकई गेट ते टाऊन हॉलपर्यंत रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले होते. मात्र मकई गेट ते टाऊन हाॅल रस्त्यावर ज्युली पार्क उड्डाणपुलापर्यंत उतार आहे. याचा विचार न करता   कंत्राटदाराने रस्त्याचे खोदकाम न करता अस्तित्वात असलेल्या जुन्याच रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने स्केरीफ्राय करत रेडीमिक्स काॅंक्रिटचे थर चढविण्याचा इरादा स्पष्ट केला. मात्र येथे एका ऐतिहासिक धार्मिक स्थळात पाणी जाईल, असे म्हणत नागरिकांनी सदर कामाचा विरोध केला.

त्यानंतर ताळ्यावर आलेल्या कंत्राटदाराने रस्ता खोदून काढला. त्या कामात अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबर फोडले व पाण्याची पाइपलाइन देखील फोडून टाकली. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठ्याची पाइपलाइचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन जलवाहिनी व ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी जीव्हीपीआर या कंत्राटदारासह ड्रेनेजलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तीन महिने लावले. हे काम पूर्ण करून पाच महिन्यांचा काळ लोटला तरी रस्त्याच्या कंत्राटदाराकडून अद्याप काम पूर्ण होईना.

सदर रस्त्यासाठी स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या माध्यमातून तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. तेथे रस्त्याच्या मधोमध दुभाजकाचे काम देखील पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून काळजी घेतली जात नाहीत. परिणामी नालीत वाहने अडकून अपघात होत आहेत. सदर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ऐतिहासिक मकई गेट खड्ड्यात गेल्याचा आरोप देखील राज्य पुरातत्त्व विभागाने केला आहे

Sambhajinagar
ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकज ठप्प; 'या' मागणीसाठी सीएससीचे कंत्राटी कर्मचारी संपावर

रस्त्याच्या कामात एका धार्मिक स्थळासह अनेक अतिक्रमणे बाधीत होत असताना महानगरपालिका व स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांत समन्वय नसल्यामुळे हे काम रखडल्याचा दावा कंत्राटदाराकडून केला जात आहे. मात्र कंत्राटदार कंपनी, महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एकीकडे विद्यापीठात ये-जा करणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह 'बीबी का मकबऱ्या'कडे जाणाऱ्या पर्यटकांना जीव धोक्यात घालून त्यांना ये-जा करावी लागत आहे.

दुसरीकडे जयभीमनगर, प्रगती काॅलनी, आदर्शनगर, आसेफीया काॅलनी, हिलाल काॅलनी, जलाल काॅलनी व जसवंतसिंगपुऱ्याकडे जाणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: ज्या ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम आहे तिथे नागरिकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक न लावल्याने अपघात होत आहेत.

याबाबत तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी करत कंत्राटदाराला धारेवर धरत रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सूचना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र आठ महिन्यांपुर्वी दिलेल्या सूचनांचे कोणीही पालन केले नाही. नंतर आलेल्या प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी देखील या रस्त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com