औरंगाबाद (Aurangabad) : रस्त्यावर पडलेले मोठ-मोठ खड्डे... पॅचिंग केलेल्या रस्त्याची कच उखडलेली... ठिकठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून तयार झालेले तळे आणि त्यातून जाणारी वाहने... हे दृष्य आहे औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जालना रस्त्याचे.
पावसाळ्याच्या तोंडावर तरी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी मनोज बोरा, विशाल पटनाईक, रघुवीर सरदेसाई, निलेश कोंबडे, सुरेंद्र पाटील यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना केली. रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आले आहे.
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जालना रस्त्यावर एक वेळ दुरूस्ती अंतर्गत करण्यात आलेल्या ७३ कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झाले.
सलग दोन दिवस केंब्रिज ते नगरनाका या पंधरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर ही परिस्थिती आढळून आली. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ते केंब्रिज चौक रस्ता चकाचक असला तरी जिल्हा सामान्य रुग्णालय ते धूत हॉस्पिटल या बाराशे मीटर रुंदीच्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला असला तरी काम संथगतीने सुरू आहे.
श्रीराम नगर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी स्मशानभूमीसमोर, सिडको टी पॉइंट, आकाशवाणी, क्रांती चौकात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सिडको, सेव्हनहील, मोंढानाका, क्रांतीचौक आणि महावीर उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचा सरफेस उखडून नाल्या व खड्डे तयार झाल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
आधीचा २० कोटींचा खर्च वाया
२०१३-१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या अखत्यारीत असताना शासनाच्या निधीतून ११ कोटी खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण मस्कट कंन्सट्रक्शन मार्फत करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या चार वर्षांतच रस्त्यावर केलेले डांबरीकरण निघाल्याने आमदार अतुल सावे यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय वाहतूक रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ९ कोटी रुपये मंजूर केल्याने २०१९ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील उत्तर विभागाच्या कामगिरीवर संशय बळावल्याने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र अवघ्या अडीच वर्षातच रस्ता उखडल्याचे दिसते आहे.
उखडलेल्या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर ही कच दुसऱ्या वाहनांवर उडत आहे. याच मार्गावर एमआयडीसी आणि महानगरपालिकेची जलवाहिनी गेल्याने रस्त्यावर खोलगट भागात पाणी साचल्याचे दिसून आले. त्यातून वाहने जात आहेत. सिडको सुमनांजली रूग्णालयासमोर तर खोलगट भागात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेकदा पाण्यात अडकून वाहने नादुरुस्त होत आहेत. क्रांतीचौकात देखील तीन ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामध्ये खड्डे पडले आहेत.
जखम गुडघ्याला, मलम डोक्याला
२०१९ मध्ये या मार्गातील रस्त्याच्या कडेला पेव्हरब्लाॅक, आरसीसी गटार आणि तीन ठिकाणी लोखंडी ओव्हरब्रीज तसेच चिकलठाणा विमाततळासमोर उड्डाणपूल, केंब्रिज स्कूल ते विमानतळ, तसेच महावीर चौक ते नगर नाका रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाने ७४ कोटी ८६ लाख रुपये मंजूर केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मागच्या कामाचा अनुभव पाहता गडकरींच्या आदेशाने ७४ कोटीच्या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवली. २०१९ मध्ये या कामाचे टेंडर काढून हैदराबादच्या सृष्टी कॉन्टेक प्रा. लि. या कंपनीला कमी दराने, ७३ कोटी २० लाख ४९ हजारांत हे काम देण्यात आले.
कोट्यावधीचा चुराडा; परिणाम शून्य
या रस्त्याच्या चुकीच्या दुरुस्तीने ७३ कोटी खर्चूनही परिणाम शून्य झाला. त्यात मुख्य रस्त्याच्या कडेला गटारीची उंची वाढल्याने मोटारी आणि दुचाकी वाहनांची पार्किंग रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी होते आहे. दुसरीकडे दोन ठिकाणी उभारलेले ओव्हरब्रिज पादचाऱ्यांच्या प्रतिक्षेत असून, या ब्रीजवर फुकट्यांच्या चमकोगिरीमुळे विद्रूपीकरणात भर पडली आहे. धक्कादायक म्हणजे विमानतळासमोरील उड्डाणपुलाचे काम रद्द झाल्याने कोट्यवधीचे उंच रस्ते पोखरून नव्याने डांबरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु या कोट्यवधीच्या कामात जालना रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्षच झाले आहे.
अंदाजपत्रकात जालना रस्त्याच्या सरफेस दुरुस्तीच्या कामात समावेश नव्हता. आमच्याकडे रस्ता हस्तांतरणापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. एकदा आम्ही पॅचवर्क केले होते. पुन्हा सर्वेक्षण करून पॅचवर्क करू.
- एम. बी. पाटील, कार्यकारी अभियंता, एनएचएआय