औरंगाबाद (Aurangabad) : बीडबायपासवरील सातारा-देवळाईसाठी मुख्य मार्ग असलेल्या आमदार रोडचा विचार न करता काही मोठ्या जमीनदार आणि कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन मनमानी पध्दतीने सदोष डिझाइन केले. संग्रामनगर उड्डाणपुलाची धावपट्टी आणि बीडबायपास रस्त्याचा अर्थाअर्थी संबंध नाही. सदर पुलाचे काम सदोष असुन एकतर पुलाचे बांधकाम तोडुन नव्याने पुल उभारा अन्यथा आमचे रस्ते जैसे थे करून द्या असे संतप्त सवाल करत सातारा - देवळाईकरांनी टेंडरनामाच्या वृत्ताला पाठींबा देत या भागातील शेकडो नागरिकांसह पुलाचे सदोष डिझाइन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी देखील केली आहे.
काय म्हणतात नागरिक -
एवढया दिवसांपासून पुलाचे डिझाइन पहावयाचे होते, ते आज टेंडरनामाने सचित्र प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे पहावयास मिळाले. मूख्यतः सातारा-देवळाई व बीडबायपासकरांची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी दोषमुक्त पुल बनवतील या अपेक्षेला पीडब्लुडीच्या संबंधित जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सदोष डिझाइन केल्याने असून, अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण केली आहे. मुळात या पुलाला आमदार रोड आणि दुसरा संग्रामनगर उड्डाणपूलकडे जाणारे दोन मुख्य रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांची शाहतूक सामावणारा उड्डाणपूल होणे आवश्यक होते, बीड बायपास रोड, रेणुकामाता कमान ते हॉटेल निशांतपार्ककडुन आमदाररोड व संग्रामनगरचौकाकडे येणारा रस्ता सपाट व एका लेव्हलचा होता त्यावर पूल बांधताना त्याची उंची मूळ रस्त्यापासून वर ५.५ असायला असणे गरजेचे होते याठिकाणी अंडरपास करण्याची गरज पडणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी आणि यंत्रणेने घेणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. मुळात आम्ही उड्डाणपुलाच्या सदोष डिझाइनवर केलेली चर्चा हा कुठलाही संभ्रम किंवा अफवा नाहीच, टेंडरनामाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज पुलाच्या डिझाइन सह सत्यस्थिती समोर आणली.
- आबासाहेब देशमुख
पुलाच्या या सदोष कामाला जबाबदार असणारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे. पुलाच्या बांधकामासाठी वापरला जाणारा निधी हा सामान्य, गोरगरिबांपासून उद्योजकांच्या करातून वापरला जाणारा निधी आहे. मुळात शासनाने तीनशे कोटीपेक्षा अधिक निधी रस्ता बांधकामासाठी दिलेला असताना पुलाचे सदोष डिझाइन तयार करून शासनाचा पैसा कोणी वाचवायला सांगितला होता. सदोष डिझाइन बनवल्याने अधिकाऱ्यांनी अडचणीत भर घालणारे काम केले आहे, हे रस्त्यावरून चालणारा बालवर्गातील मुलगा देखील सांगेल.
- तन्मया जोशी
मुळातच हा रस्ता पूर्वा पार जमिनीच्या झिरो लेव्हल पासुन उंच नव्हता. त्यामुळे पुलाचे डिझाईन बनवताना आमदाररोड समोर आणि संग्रामनगर चौकात दोन्ही बाजुने रस्त्यापासून तर पुलाच्या बीमपर्यंत कमीत कमी मोठे वाहन अगदी बिनदिक्कत पुलाखालून सहज जाईल असे बनविणे नितांत गरजेचे होते. परंतु पुलाची उंची कमी केल्याने ठेकेदाराच्या बांधकामाचा खर्च वाचवण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यात कोट्यावधीचा घोळ असल्याची शंका निर्माण होत आहे. लोख॔ड , सिमेंट आणि वाळुबरोबर मनुष्यबळाचा खर्च वाचवत अगदीच कमी खर्चात जमीन पोखरून जमीनस्तरापासून पुलाची उंची साडेपाच मीटर पर्यंत वाढवायची. त्यामुळे हा अतिशय चुकीचा मार्ग बनवण्याचे काम सुरू आहे. आता आयुष्यभर भुयारी घाटाचे भोग भोगावेच लागणार. टेंडरनामासारख्ये निर्भिड पत्रकारीतेला सलामच ठोकावा लागेल. आता ज्या चुकीच्या पद्धतीने अंडरपासचा घाट घातला जात आहे , त्याने हा रोड आणि पुल जटील समस्या घेऊन येणार आहे.
- डी. जी. निकम
पुलाखालुन होत असलेल्या अंडरपास मधून महिला, वयोवृध्द वाहनधारक सहजपणे मार्गक्रमण करुच शकणार नाहीत. टेंडरनामाच्या वृत्तामुळे खरी वस्तुस्थिती समोर आली. बीडबायपासच्या महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. आता ही जबाबदारी नागरिकांची आहे. सर्वांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे
- ॲड. शिवराज कडुपाटील
टेंडरनामा प्रतिनिधीला वस्तुस्थिती दिसते. काम चुकीचेच आहे, हे समस्त सातारा-देवळाईकरांना देखील दिसते. असे असताना आपल्या भागातील लोकप्रतिनिधी काय झोपा काढत आहेत का? त्यांना हा प्रकार माहीत नाही का? की माहिती असुन दुर्लक्ष करत आहेत?
- श्रीकांत हुलयालकर
टेंडरनामामुळे उड्डाणपूलासंदर्भातील अनेक बारीक गोष्टी वाहनधारकांच्या लक्षात आल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये पुलाखालून जाताना कशी कसरत करावी लागणार आहे. पाणी कसे साचणार आहे आणि त्यातून महिला कशा रस्ता काढणार आहेत याचा ट्रेलर गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पाहावयास मिळालाच आहे. या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना टेंडरनामाने मालिका प्रसिध्द केली. त्यातील प्रतिनिधीचे तोंड दाबण्यासाठी अधिकार्यांनी या विषयाला बगल देण्यासाठी काही स्थानिक वर्तमानपत्रातून दिशाभूल करणारे एकतर्फी स्पष्टीकरण देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. रस्त्याचे खोलीकरण करून उंची वाढवण्याचे पाप उघड्या डोळ्याने पाहत आहोत. आता सर्वांनी एकत्र येऊन या सदोष पुलाबाबत आक्षेप घेऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडणे गरजेचे.
- कांता कदम
टेंडरनामाने सर्व सातारा-देवळाई तसेच बीडबायपाससह लाखो वाहनधारकांना या सदोष पुलामुळे येणार्या अडचणींचा पोटतिडकीचा प्रश्न मांडला आहे.त्यांनी अन्यायाला वाचा तर फोडली. पण आता सर्व सातारा - देवळाईकर आणि बीडबायपासवासीयांनी जबाबदारीने एकत्र येऊन रास्ता रोको करून शासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याची खरी गरज आहे. वेळीच या सदोष पुलाचे काम बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, यासाठी मोठे आदोलनशिवाय पर्याय नाही.
- मधुकर पाटील
बीड बायपासवरील पुलाचे काम हे चुकीचेच झाले आहे. ठेकेदाराच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी पुलाची उंची कमी केली आहे, यात कुठलीही शंका नाही. या पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे शहरातून सातारा गावात येणार्या वाहनधारकांना पुलातील खड्ड्यातून जा-ये करावी लागणार आहे. या संग्रामनगर चौकात यापूर्वी शेकडो बळी गेले आहेत, त्यामुळे याठिकाणी पुल व्हावा, अशी नागरिकांची गत दशकापासून मागणी होती. त्यानुसार पुल करण्यात आला. परंतु तो चुकीच्या पद्धतीने बांधला गेला. टेडरनामाने यासदोष पुलाचे बांधकाम वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु ठेकेदार व अधिकार्यांचे साटेलोटे असल्यानेच याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. चुकीच्या पध्दतीने बांधलेला पुल निष्कर्षित करणे. खोदलेल्या कामाचे सपाटीकरण करणे व आधीच्या रस्त्यांपासूनच पुलाची साडेपाच मीटर उंची करणे हाच एकमेव रामबान उपाय आहे. ज्या अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे हे चुकीचे काम झाले. त्यांच्यावर सरकारी पैशाचा अपहार केला म्हणून चौकशी करावी व तातडीने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.
- सोमीनाथराव शिराणे
साताऱ्यातील आमदाररोड हा पोलीसस्टेशनकडे जाणारा आहे. यामार्गावर सातारा-देवळाईची मोठी बाजारपेठ आहे. बीडबायपासकडुन देखील लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी जातात. सातारा भागात मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. सातारा-देवळाईसह अनेक तांडे आणि वाड्या वस्त्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. देशभरात प्रसिध्द असलेले खंडोबा मंदिरात अनेक राज्यातील लोक दर्शनासाठी या मार्गाचा वापर करतात. यात्रा व सनासुदीच्या काळात मोठी गर्दी असते. याचा विचार न करता या मुख्य रस्त्याचा बायपासपासून संपर्क तोडला. आता आमदाररोडकडुन संग्रामनगर पुलाकडे जातांना एका दरी मधून जावे लागत आहे. यामुळे अपघाताचा सामना करावा लागेल. पावसाळ्यात तर हा रस्ता च बंद ठेवावा लागेल. कारण या ठिकाणी तळे साचलेले राहतील.एकतर काही बड्या भुखंडधारकांना फायदा पोहोचावा यासाठी आमदार रस्त्याचे वेटेज कमी करण्यासाठीच सदोष डिझाइन केल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.
- असद पटेल