छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रेल्वेस्थानकावर मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ नव्या पादचारी पुलाचे (फुट ओव्हर ब्रीच) व पुलाला जोडणाऱ्या रॅम्पचे काम होऊन सहा महिन्याचा काळ लोटला. मात्र अद्याप दक्षिण मध्य रेल्वेला लोकार्पणासाठी मुहूर्त सापडलेला नाही. परिणामी जवळपास अडीच कोटी खर्च करून रेल्वे प्रवाशांसाठी प्लॅटफाॅर्मवर चढ-उतार करण्यासाठी तयार केलेला हा नवाकोरा पुल शोपीस ठरत आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता रूफ प्लाझाची नवीन इमारत तयार होणार असल्याने प्रकल्प विकास आराखड्यात बदल होऊ शकतो, या कारणाने सदर पुलाचे लोकार्पण स्थगित केल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेस्थानकावर एक्सलेटर (सरकते जीने) लिफ्ट आणि इतरही पादचारी पुल (फुट ओव्हर ब्रीज) आहेत. मात्र, दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने प्रवाशांना रेल्वेतून चढ-उतार करताना थेट स्थानकातून प्लॅटफाॅमचा वापर न करता आत-बाहेर पडण्याकरिता हा फुट ओव्हर ब्रीज अत्यंत महत्वाचा असल्याचे मानले जात होते. गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या या ओव्हरब्रीज आणि जीन्यांचे कामावर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच कसेबसे काम पार पडले. मात्र आता काम पूर्ण होऊन सहा महिन्याचा काळ लोटल्यानंतर देखील तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला नाहीए. परिणामी स्थानकातील जुन्या इमारतीचे प्रवेशद्वार गत तीन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एकाच नव्या इमारतीतून स्थानकातून आत - बाहेर करावे लागत असल्याने प्रवाशांना चेंगराचेंरीचा त्रास सोसावा लागतआहे. यामुळे भुरट्या चोरांचे फावत असून स्थानक परिसरात चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सदर फुट ओव्हर ब्रीजचे काम उल्हासनगरच्या पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या ब्रीजच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे जवळपास अडीच कोटी रूपये खर्च केला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवतांना त्रास होऊ नये यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जवळूनच ९० मीटरचा रॅम्प मुख्य ओव्हरब्रीजला जोडला आहे. साडेतीन मीटर उंच सहा मीटर रूंदीचा हा भव्य रॅम्प तयार केला आहे. ओव्हरब्रीज वरून प्लॅपफाॅमवर उतरण्यासाठी तीन जीने तयार झाले आहेत. साडेसहा मीटर रूंदी व ८२ मीटरचा ओव्हरब्रीज देखील तयार झाला आहे. मात्र, आता रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्जानुसर रूफ प्लाझाचा नवा लुक येणार असल्याने स्थानकाचा संपुर्ण विकास आराखडा बदलणार असल्याने या फ्रूट ओव्हरब्रीजचे लोकार्पण लांबनीवर पडले आहे.
मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाजुला रिक्षा स्टॅन्डपासूनच थेट हा रॅम्प तयार झाल्याने प्रवाशांना रिक्षातून उतरताच एक ते चार नंबर प्लॅटफार्मवर इमारतीच्या आतून प्रवेश करत जाण्याची गरज पडू नये या उद्देशाने हा फुट ओव्हर ब्रीज तयार करण्यात आला. प्रवाशांना सामानाची चढ-उतार करताना होणारा त्रास दुर करण्यासाठी खास रॅम्प तयार करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीला लागुनच प्लॅटफार्म क्रमांक एकच्या बाजुने व्हिडीओकाॅन कंपनीच्या जुन्या गोडाऊनचे बांधकाम तोडुन तेथे हा रॅम्प तयार केला आहे. फुट ओव्हरब्रीजच्या कामानंतर रॅम्पचे काँक्रीटीकरण, फरशी आणि फायबर टीनचे देखील काम झाले आहे. मात्र काम पुर्ण होऊन देखील मुख्य प्रशासकीय इमारतीलगत भिंत तोडून या रॅम्पकडून फुट ओव्हरब्रीजकडे जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने रस्ता तयार केला नाही. आधी लोकार्पण सोहळा पार पडण्यासाठी मंत्री महोद्यांची तारीख मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते, आता नव्या इमारतीच्या बांधकामाचे कारण पुढे केले जात आहे. रेल्वेच्या अशा नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.