औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद जिल्ह्यातील टेकड्यांवर कास पठाराच्या धर्तीवर बीजारोपणासंदर्भातील 'टेंडरनामा'च्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. निलेश गटाणे यांनी या प्रकरणात चौकशी करून जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून अहवाल मागविला आहे. त्यामुळे कास पठारावरील टेकड्यांचे बीजारोपण प्रकरण आता चौकशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी या आठ टेकड्यांवर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कास पठाराच्या धर्तीवर पुष्पांचे बीजारोपण कोणत्या आधारे, कशा पद्धतीने केले, त्यासाठी किती खर्च केला गेला, याबाबत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ गटाणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.
'टेंडरनामा'ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा परिषदेच्या निधीतून ५० लाख रुपये खर्च करत औरंगाबाद जिल्ह्यातील कास पठाराच्या टेकड्यांवर बियांची उधळण करत केवळ निधी लाटण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. हे बीजारोपण करताना कोणत्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले, याबाबत सीईओंनी माहिती मागविली आहे. यात जिल्हा प्रशासनातील कृषी, महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
चौकशीअंती हे मुद्दे समोर येणार
तत्कालीन सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी कशासाठी हा उपक्रम राबवला होता, यात बीजारोपण करताना नेमके काय आदेश दिले होते, त्यानुसार टेकड्यांवर बीजारोपण झाले की नाही, ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवला त्या टेकड्या वन विभागाच्या पट्ट्यात आहेत की नाही, हे कोणी पाहिले. स्थळपाहणी कोणी केली. विकास आराखडा कोणी केला. बीजारोपण करण्यापूर्वी खरोखर भौगोलिक वातावरण, शुध्द हवा, पाणी आणि माती तपासणी करून बीजारोपणासाठी सर्व्हे झाला होता का? बीजारोपण ज्या ठिकाणी केले गेले त्याची मार्किंग कोणी केली, कृषी आणि उप मुख्याधिकाऱ्यांनी कसे काम केले, याची माहिती चौकशीअंती येणाऱ्या काळात समोर येऊ शकणार आहे.