छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्पातील अधिकार्यांच्या दुरदृष्टीअभावी पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा या महत्त्वाच्या महामार्गावरील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या पाठोपाठ एमआयटी आणि देवळाई चौकातील उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने अवजड वाहनांची गैरसोय होत आहे.
बीड बायपास महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू आहे. महामार्ग सुरळीत होऊन प्रवाशांची सोय झाली. मात्र, पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा दरम्यान या मार्गावरील जड वाहतूक अडचणीत सापडली आहे. पुलाखालची उंची कमी असल्यामुळे संग्रामनगर पाठोपाठ एमआयटी व देवळाई चौकात अवजड वाहन या पुलाखाली फसत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील महामार्गाच्या अधिकार्यांनी भविष्यात होणारी गैरसोयीकडे दुर्लक्ष किंवा दूरदृष्टी नसल्याने असे प्रसंग वारंवार घडत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. वाहन चालकांना मोठे दिव्य पार पाडून उड्डाणपुला खालून अवजड वाहने बाहेर काढावी लागत आहेत. केवळ महामार्ग अधिकार्यांनी दूरदृष्टी न दाखवल्यानेच याला महामार्गाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा वाहन चालकांनी आरोप केला आहे.