औरंगाबाद (Aurangabad) : २०१९ मध्ये चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाची निर्मिती झाल्यानंतर शहरात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दोनशे खाटांचे महिला व बाल रुग्णालयाचे जालना रोडवरील शासकीय डेअरीच्या जागेवर बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. त्यापाठोपाठ स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट हेल्थ उपक्रमातून शहरात चार ठिकाणी चाळीस कोटींचा मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल उभारण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आता राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) महापालिकेच्या माध्यमातून शहरात येत्या दोन महिन्यांत बारा नवीन आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार आहेत. पण मनुष्यबळाअभावी या रूग्णालयांची अवस्था जिल्हा सामान्य रूग्णालय आणि घाटीतील सुपर स्पेशालिस्ट इमारतीसारखी होऊ नये, अशी माफक अपेक्षा औरंगाबादकर करत आहेत.
घाटी रुग्णालयावरील वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागापाठोपाठ महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने देखील एक मोठे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला घेतला. आंबेडकरनगर, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटरजवळ १० कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. गजानननगरात २ कोटींचे आणखी एक रुग्णालय उभारण्याचा मनोदय स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर स्मार्ट हेल्थ उपक्रमांतर्गत सातारा, देवळाई, विटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी मिसारवाडी, राजनगर, मुकुंदवाडी, गरमपाणी, आंबिकानगर, जयभवानीनगर, पुंडलिकनगर या भागात जागांचा शोध घेण्यात येत आहे. महापालिकेचे आरोग्य केंद्राच्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरूस्ती देखील करण्यात येणार आहे. त्यात सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-८, राजनगर, चिकलठाणा, जवाहर कॉलनी, नेहरूनगर, पदमपुरा, औरंगपुरा, जुना बाजार, मुकुंदवाडी, औषधी भांडारसाठी नवीन इमारत उभारण्यात येईल.
आता १२ आरोग्य केंद्राची भर
त्यात आता शहरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) महापालिकेच्या माध्यमातून शहरात येत्या दोन महिन्यांत बारा नवीन आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, यंत्रसामग्रीच्या खरेदीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.
मनुष्यबळाचे काय
एकीकडे केंद्र, राज्य व महापालिका निधीतून कोट्यावधीच्या इमारती उभ्या केल्या जातात. यंत्रसामुग्री आणि औषधांची खरेदी देखील केली जाते. यात अधिकारी, पुरवठादार आणि ठेकेदारांची कोट्यावधीची उलाढाल होते. पण दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मजबूत करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागते याचा मात्र व्यवस्थेला विसर पडतो. परिणामी कोट्यावधी खर्च करून इमारतीतील यंत्रसामुग्री आणि औषधी धुळखात पडतात. यासाठी आधी महापालिका प्रशासकांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत नवीन आरोग्य केंद्रांचा लेखाजोगा तयार करून मनुष्यबळ पुरविण्याचा प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. आधी मनुष्यबळाचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदभरती झाल्यानंतरच नवीन आरोग्य केंद्राच्या उभारणीचे काम सुरू करायला हवे
तर अशी व्यवस्था होईल?
शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या १५० कोटी रूपयांच्या निधीतून घाटी रूग्णालय परिसरात स्पेशालिटी इमारत उभी करण्यात आली आहे. त्यात कोट्यावधीची यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे.मात्र मनुष्यबळाचे कारण पुढे करत अद्याप येथील आरोग्य सेवा सुरू झाली नाही. सन २०१६ मध्ये सुरू झालेल्या या पाच मजली इमारतीचे बांधकाम २०१९ मध्ये पुर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर रूग्नसेवेसाठी येथे शासनाने मंजुर केलेली २१९ पदे अद्याप रिक्त आहेत. मात्र घाटी प्रशासनाने इमारत तयार केल्यानंतर एमपीएससीकडे पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. नाही म्हणायला घाटी प्रशासनाने नामुष्की वाचवण्यासाठी या भव्य इमारतीत केवळ एमआरआय, डायलेसिस आणि न्यूरोलाॅजी, कार्डीओलाॅजीची केवळ ओपीडी सुरू असल्याचा दिखावा केला आहे.हीच स्थिती चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयाची आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे येथे रूग्णांचे हाल होत आहेत.
सद्यःस्थितीत अशी आहे आरोग्य सेवा
सद्यःस्थितीत शहरात महापालिकेची ३९ आरोग्य केंद्रे, ५ रुग्णालये महापालिकेकडून चालविण्यात येतात; परंतु दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत नाही. रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. त्यात आहे, त्या रूग्णालयात प्रचंड प्रमाणात कर्मचार्यांची अपुरी संख्या असल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये घाटी रुग्णालयावरील ताण प्रचंड वाढला आहे.
कधी सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय
राज्यातील काही मोठ्या महापालिकांनी यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालय सुरु केले आहेत. औरंगाबाद महापालिकेचेदेखील अशाच प्रकारे एक स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असायला हवे, त्या दृष्टीनेही प्रशासनाकडून चाचपणी करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या नियमानुसार वैद्यकीय महालिद्यालयांसाठी किमान ८०० खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने गावभर पसारा पांगवण्यापेक्षा सुरूवातीला आलेल्या निधीतून अट पुर्ण केल्यास निश्चित त्याचा औरंगाबादकरांना फायदा होईल.