लातूर (Latur) : शहरातील बहुतांश रिंगरोडची कामे हे नॅशनल हायवेकडून (NHAI) करण्यात आली असून, यात बॉक्स कलव्हर्टला बगल दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शहराचे घाण पाणी बाहेर जाण्यास मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे तेथेचे साचून त्याची दुर्गंधीमुळे नागरीकाना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या गरुड चौक ते राजीव गांधी चौक या रिंगरोडचे काम सुरु आहे. किमान या रस्त्यात तर बॉक्स कलव्हर्ट उभारण्याची गरज आहे. तर त्या भागातील नाल्याचे घाण पाणी जाण्यास मार्ग मिळणार आहे. अन्यथा इतर रिंगरोड सारखीच परिस्थिती तेथेही पहायला मिळणार असून त्याचा त्रास नागरीकांनाच सहन करावा लागणार आहे.
शहर व परिसरात नॅशनल हायवेकडून मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. त्यात शहराचे बहुतांश रिंगरोड नॅशनल हायवेने केले आहे. त्यातील पीव्हीआर चौक ते राजीव गांधी चौक हा एक महत्वाचा रिंगरोड आहे. कोट्यावधी रुपये या रस्त्यावर खर्च झाले आहेत. भविष्यातील तीस चाळीस वर्षाचा विचार करुन हा रस्ता तयार करण्यात आला आहे. पण हा रस्ता तयार करताना या रस्त्याच्या कडेला असलेले नाल्यातील पाणी कसे इकडून तिकडे जाईल याचा विचारच करण्यात आलेला नाही. नाल्यात केवळ सांडपाणीच येते असे नाही, तर त्यात बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या असे अनेक वस्तू येतात. नाले ओव्हरफ्लो होतात. अशा वेळी रस्ता तयार करताना बॉक्स कलव्हर्ट बांधणे गरजेचे असते. त्यातून हे पाणी वाहून जावू शकते. पण त्याला नॅशनल हायवेने बगल दिली आहे. त्याचा परिणाम या रस्त्यावर ठिकठिकाणी घाण पाणी साचले जात आहे. त्याची दुर्गंधी सुटून नागरीकांना त्रास सहन करावा लगात आहे.
सध्या गरुड चौक ते राजीव गांधी चौक या रिंगरोडचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम सुरु आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी नाले आहेत. त्या नाल्यातील घाण पाण्याला मार्ग काढून देण्यासाठी बॉक्स कलव्हर्ट बांधण्याची गरज आहे. पण तेथेही त्याला बगल देवून नॅशनल हायवे काम करताना दिसत आहे. नॅशनल हायवेने या रस्त्यात बॉक्स कलव्हर्ट तयार करुनच रस्त्याचे काम केले तर भविष्यात नागरीकाना होणारा त्रास वाचणार आहे.
आयुक्तांचे `नॅशनल हायवे`ला पत्र
शहरात नॅशनल हायवेच्या वतीने गरुड चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यावर शहरातील नाल्यांचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गंगाधाम, इस्लामपूरा, कातपूर रोड, सिध्देश्वरनगर या ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट रस्त्याचे कामामध्ये अंतर्भुत करुन बांधणेसाठी ई-मेल केला होता. तसेच या कामाचे ठेकेदार गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीलाही वारंवार सांगूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. वरील ठिकाणी शहरातून येणारे नाले पावसाळ्यात ओव्हर फ्लो होऊन रिंगरोडला पाण्यासोबत प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, चिंध्या, पालापाचोळा इत्यादीमुळे या रस्त्याचे पाणी पुढे जात नाही. सर्व नाले ब्लॉक होऊन त्या-त्या ठिकाणी परिसरातील घरामध्ये पाणी व कचरा जाऊन नागरिकांना त्रास होतो. हे लक्षात घेवून वरील ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट बांधल्याशिवाय रस्त्याचे काम पुर्ण करु नये, असे पत्र आयुक्त अमन मित्तल यांनी नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांना दिले आहे. त्यावर नॅशनल हायवे काय कार्यवाही करते याकडे लक्ष लागले आहे.