औरंगाबाद (Aurangabad) : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) वाहतूक सुरू करण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत या महामार्गाचा प्रवासासाठी वापर करण्यात येऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) करण्यात आले. MSRDCचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांच्या आदेशाने अखेर या महामार्गावर ठिकठिकाणी काॅंक्रिटचे अडथळे उभारण्यात आले आहेत. औरंगाबाद, जालना व बुलडाणा या तीन जिल्ह्यांतून जाणारा समृद्धी महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाची किरकोळ कामे वगळता मुख्य कामे पूर्ण झालेली असल्यामुळे महामार्गावरून अनधिकृत व विना परवानगी वाहतूक सुरू आहे. अद्याप महामार्गावरून अधिकृतपणे वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. वाहतूक सुरक्षिततेची काही कामे करणे प्रगती पथावर आहे.
अनधिकृत वाहतुकीमुळे काही ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी साळुंके यांनी अधिकृत घोषणा होईपर्यंत वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा प्रवासासाठी वापर करू नये, असा आदेश काढला होता. मात्र सुसाट वाहनांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर रस्त्याच्या मधोमध मोठमोठे कॉंक्रिटचे अडथळे लावण्यात आलेले आहेत.