गडकरी साहेब, छत्रपती संभाजीनगर रेल्वेफाटक मुक्त कधी होणार?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांचे ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

मात्र मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरातील बीड बायपास आणि जालना रस्त्याला समांतर असलेल्या छत्रपती संभाजीनगर मुख्य रेल्वेस्थानक ते शरणापूर ते साजापूर, रेल्वे स्टेशन एमआयडीसी अंतर्गत निर्लेप ते महाराष्ट्र वखार महामंडळ आणि जय भवानीनगर चौक ते राजनगर ते बीड बायपास अखंड रेल्वे उड्डाणपूल शिवाजीनगर, चिकलठाणा, बाळापूर, फुलेनगर दरम्यान रेल्वे भूयारी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर फाटकमुक्त कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Bullet Train: 21 किमीच्या आव्हानात्मक बोगद्याचे टेंडर 'या' कंपनीला

छत्रपती संभाजीनगरात चिकलठाणा, वाळुज - पंढरपूर  रेल्वेस्टेशन, नंतर शेंद्रा व बिडकीन पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रानंतर ऑरीक सिटीसाठी हजारो एकर जमीनीचे भूसंपादन केले. मात्र येथे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील जुनेच उद्योजकांनी उद्योग उभे केले आहेत. पायाभूत सुविधा रस्ते, पाणी आणि वीजेअभावी चांगले उद्योग अंद्याप या शहरात यायला तयार नाहीत. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील दाट वसाहतीतून जाणारा रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी अद्यापही मनुष्यरहित फाटक असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका कायम आहे. रेल्वेफाटक कायमस्वरूपी हटवून तेथे भुयारी मार्ग आणि रेल्वे उड्डाणपूल सारखे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न करण्याचे येथील दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यमंत्री करताना दिसत नाहीत.

छत्रपती संभाजीनगरकरांची अनेक वर्षांपासूनची रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून ओरड कायम आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने कोट्यवधी रुपयांचा धुळे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले. मात्र कन्नड - चाळीसगाव मार्गातील औट्रम घाटाचे रूंदीकरण की बोगदा हा प्रश्न मागील दहा वर्षांपासून सुटला नाही. परिणामी मराठवाडा आणि खांन्देशसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशची कनेक्टीव्ही जुळत नाही. अरूंद असलेल्या या घाटात २४ तास वाहतुकीचा चक्काजाम असल्याने प्रवाशांना घरातून बाहेर पडण्यापूर्वीच घाट जाम आहे का, अशी विचारणा करावी लागते.

छत्रपती संभाजीनगरातील जालनारोडकडून बीड बायपासच्या दिशेने जातांना चिकलठाणा ,  बाळापुर , शिवाजीनगर फुलेनगर  येथे भुयारी मार्ग आणि जयभवानीनगर चौक ते बीडबायपास व शरणापूर -  साजापूर मार्गावर  महारेलच्या माध्यमातून अखंड उड्डाणपुलांची महारेलतर्फे वेगाने कामे करण्याची गरज आहे.

राज्यातील  १९ उड्डाणपूलांच्या आणि भूयारी मार्गाच्या यादीत कुठेही छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे जनतेचा वेळ कसा वाचणार अपघात कसे रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पायाभुत सुविधांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असले, तरी छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेला रखडलेल्या सावंगी ते मिटमिटा या नवीन रिंगरुट बायपाससाठी निधी मंजूर केला , मात्र अद्याप या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. शेंद्रा आणि वाळुज औद्योगीक क्षेत्राला खेटून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला कनेक्टीव्ही मिळण्यासाठी अद्याप पोच मार्ग तयार केले नाहीत. परिणामी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे देशी - विदेशी मोठे उद्योजक या शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत.

Sambhajinagar
Pune: दोन सदनिका असलेल्या पुणेकरांसाठी गुड न्यूज...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात कुठल्याही औद्योगीक क्षेत्रात  पायाभूत सुविधांची कमतरता आहे. देशातील इतर प्रांतापेक्षा इकडील  कुशल मनुष्यबळ क्षमता आहे. मात्र  दळवळण सुविधा नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात  नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येथील लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत.  मराठवाड्यात चांगले  प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गडकरी यांनी वेगाने पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

जालना रस्त्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कधी देणार या रस्त्यांच्या कामाला चालना-

छत्रपती संभाजीनगर शहरात केंद्र सरकारच्या सहकार्याने समृध्दी महामार्ग, धुळे - सोलापुर , छत्रपती संभाजीनगर ते पैठण आदी राष्ट्रीय महामार्ग विकसित होत आहेत. छत्रपती संभाजीनगर ते पुणे अद्याप गुलदस्त्यात आहे. गडकरी साहेब शहरात उद्या आपले आगमण होत आहे. त्यापूर्वी केंद्रात आतल्या दरवाजातून खासदारकीचे पद मिळवून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेले डाॅ. भागवत कराड यांनी शेंद्रा ते वाळुज महानगर डीपीआर तयार, ही नेहमीचीच घोषणा केली. शहरातील या लोकप्रतिनिधींचा आश्वासनांचा पाऊस, अन् अंमलबजावनीचा दुष्काळ असतो.  छत्रपती संभाजीनगरकरांच्या नशीबी सहा हजार कोटीचा मेट्रो आणि अखंड उड्डाणपुल होईल तेव्हा होईल. तूर्तास छत्रपती संभाजीनगर शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्याची कोंडी टाळण्यासाठी लक्ष्मण चावडी ते एमजीएम तसेच झेंडा चौक ते विश्रांतीनगर रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे.

गडकरी साहेब छत्रपती संभाजीनगराचे काय?

राज्यात सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ उड्डाणपूलांसाठी १०० टक्के निधी भारत सरकारने मंजूर केल्याचा गडकरींचा दावा आहे. मात्र केंद्र असो की राज्य सरकार विकासाच्या मुद्यांवर छत्रपती संभाजीनगर शहराला मागे खेचले जाते. परिणामी कायमस्वरूपी मागासलेपणाचा शिक्का मारला जातो. याही शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या राज्यातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण  करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या ८ पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. मात्र कोट्यवधीच्या या यादीत छत्रपती संभाजीनगर शहराचा कुठेही उल्लेख नाही, हे येथील लोकप्रतिधींचे अपयश म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातील मतदारांचे अपयश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com