छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात विविध खेळ खेळणाऱ्या सामान्य परिवारातील खेळाडूंसाठी एकही अद्यावत मैदान नाही. तत्कालीन सिडको प्रशासनाने सिडको एन-पाच गुलमोहर काॅलनीत दर्शनी भागात गाळे आणि पाठीमागे मैदान, यात गाळेधारकांकडून मिळालेल्या पैशातून मैदानाचा विकास या धर्तीवर व्यापारी गाळे बांधले. ९९ वर्षाच्या कराराने गाळेधारकांकडून करारनामे करत मोठे उत्पन्न देखील मिळवले. मात्र, गेल्या चाळीस वर्षांपासून मैदानाचा खेळखंडोबा तसाच आहे. सिडकोच्या धर्तीवर टीव्ही सेंटर चौकातील मैदानाच्या दर्शनी भागात मनपाने शेकडो गाळे बांधत गाळेधारकांकडून कोट्यावधींची माया जमवली, परंतु मैदानाचा विकास झालाच नाही. मैदानांच्या जागेवर व्यापारी भुखंड पाडुन केवळ दुकानदारीचा घाट घाटला जात आहे. मग खेळाडुंनी खेळायचे कुठे, हा खरा प्रश्न आहे.
सिडको एन-२ तील क्रीडा मैदान नाममात्र दरात धनदांडग्यांच्या घशात घातले आहे, तिथे केवळ मक्तेदारी सुरु असल्याने सामान्य खेळाडू शुल्क भरू शकत नाहीत, तेच धोरण मनपाने गरवारे स्टेडियमवर बाळगलेले आहे. सिडको एन-२ शिवाजी क्रीडा मैदानात थेट जलकुंभाचे काम सुरू केले, उर्वरित जागेत लग्नसराईच्या दिवसात विवाह समारंभ केले जातात. तत्कालीन सिडको प्रशासनाच्या काळात मैदानी खेळांसाठी आरक्षित असलेले मैदान सिडकोने बड्या शिक्षण संस्थांच्या हवाली केले आहेत. अटीशर्तीनुसार तेथे मैदान सर्वसामान्यांना दिलेल्या वेळेत खेळण्यासाठी निःशुल्क उपलब्ध राहील, मैदान परिसरात स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा भिंत, खेळाडूंसाठी पायाभुत सुविधा देण्याची संबंधितांना अट असताना ही मैदाने बंदिस्त केली गेली. त्यावर संस्थाचालकांनी कब्जा केला आहे.पुढे सिडकोचे मनपात हस्तांतर झाले. मनपाने एकही मैदान ताब्यात घेतले नाही. अशा पद्धतीने शहरातील मैदानांची वाट लावली. दरम्यान आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम होणार, हे आश्वासन आशेचा किरण दाखवणारे होते.ते देखील फोल ठरले.मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, त्यांनी विविध खेळात प्राविन्य मिळवून देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याचे नाव उंच करावे, याचा विचार करणारे आणि त्यासाठी पायाभुत सुविधा निर्माण करून देणारे नेतृत्व या शहरासाठी नसल्यानेच खेळाडूंचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावर भव्य आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बांधकामाचा निर्णय राज्याच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने घेतल्याचे सांगत डिसेंबर २०२३ मध्ये स्टेडियम निर्मितीच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला जाईल, आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमच्या बांधकामासाठी १०० ते १५० कोटी रूपये खर्च होतील, २७ ऑक्टोबर २०३३ च्या दरम्यान त्तकालीन जिल्हाधिकारी स्टेडियमचा बांधकामाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाला पाठवतील, अशी घोषणा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र टेंडरनामाने मैदानाची वस्तुस्थिती पाहिली असता आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम कागदावरच असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
१५ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय व राज्य वक्फ बोर्डच्या अधिकार्यांसमवेत आमखास मैदानावर एक बैठक घेतली होती. त्यात त्यांनी आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बांधकामाचा निर्णय घेतला होता. याच बैठकीत माजी खासदार इम्तियाज जलील, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा देखील समावेश होता. या बैठकीत सत्तार यांनी आमखास मैदान हे राज्याच्या क्रिडा व युवक सेना संचालनालयाच्या धोरणानुसार क्रीडांगणासाठीच आरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शहर भूमापन क्रमांक - २१० येथील तब्बल २९ हेक्टर ९ आर. जमीनीवर भव्य आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम केले जाईल, यासाठी डिसेंबर २०२३ दरम्यान नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव सादर करून राज्य सरकारकडून निधी मागितला जाईल, असे सत्तार यांनी सांगितले होते.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही सत्तार म्हणाले होते.यात खासदार जलील यांच्या प्रश्नाला उत्तर देत सत्तार यांनी स्टेडियमच्या बांधकामासाठी शंभर टक्के केन्द्र व राज्य सरकारकडून निधी खेचून आणेल, असे छातीठोकपणे सांगत मोठे आश्वासन दिले होते. तब्बल १५० कोटीतून होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमसाठी एक क्रीडा समिति स्थापन केली जाईल. ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय राहतील तसेच मनपा आयुक्त, अल्प संख्यक विभागाचे आयुक्त, वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य राहतील, असे म्हणत सत्तार यांनी जमीनीच्या नोंदीबाबत काही चुका दुरूस्त करून २७ डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देत टाळ्या मिळवल्या होत्या. दरम्यान आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम बांधण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय सिरसाट यांना सगळ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम साकार झाल्यानंतर देशभरातील फुटबॉल खेळाडू पोहोचतील, असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला होता. याच स्टेडियमच्या बाजुला स्टेडियम मिनी क्रिकेट क्रिकेट तयार करण्यात येईल असेही ते म्हणाले होते. शहरात होणाऱ्या या भव्य प्रकल्पाला कुणाचाही विरोध राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी दाखवला होता. डिसेंबर महिन्यात हज हाऊसच्या लोकार्पणासोबतच आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम चे भूमि पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन त्यांनी केले होते.मात्र पुढे हे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बैठकीपुरतेच कागदावर मर्यादीत राहिले.