मुंबई (Mumbai) : भारत - इंडोनेशिया (India - Indonesia) दरम्यान द्विपक्षीय व्यापार वृध्दीसाठी इंडोनेशिया वाणिज्य व पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संयुक्क्त उपक्रम राबवतील अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे (MACCIA) अध्यक्ष ललित गांधी व इंडोनेशियाचे (Indonesia) भारतातील महावाणिज्य दूत जनरल एड्डी वर्दोयो यांनी दिली.
इंडोनेशियाचे भारतातील नवनियुक्त काउन्सील जनरल एड्डी वर्दोयो यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
एड्डी वर्दोयो यांनी भारत व इंडोनेशिया यांचे वाणिज्य, पर्यटन व सांस्कृतिक संबंध अतिशय चांगले असून उभय देशांमधील व्यापार व पर्यटन वाढीबरोबरच सांस्कृतिक संबंध वृध्दिंगत करण्यासाठी आपले कार्यालय प्रभावीपणे कार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच व्यापार व पर्यटनासंबंधी संयुक्त कार्यक्रमाच्या कार्यकक्षा निश्चितीसाठी ‘महाराष्ट्र चेंबर’च्या पदाधिकार्यांना इंडोनेशिया भेटीचे निमंत्रण दिले.
ललित गांधी यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर तर्फे महाराष्ट्रातील उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी ‘मायटेक्स’ या नावाने आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांची श्रृंखला सुरू केल्याचे सांगून 6 ऑक्टोबर पासून नाशिक येथे व 20 ऑक्टोबर पासून पुणे येथे सुरू होणार्या प्रदर्शनासाठी इंडोनेशियाच्या उद्योजकांचे शिष्टमंडळास आमंत्रित केले. काउन्सील जनरल एड्डी वर्दोयो यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला.
महाराष्ट्रातून कृषी उत्पादने, स्टील, ऑटोकंपोनंटस्, प्लास्टिक उत्पादने इंडोनेशियात निर्यात करण्यासाठी तसेच इंडोनेशियामधून खाद्यतेल, कॉफी, चॉकलेट, बांधकाम साहीत्य यांच्या आयातीच्या संभावना निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत इंडोनेशियाला भेट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा - नासिक, तनसुख झांबड - छ. संभाजीनगर, सरव्यवस्थापक सागर नागरे, कार्यकारी अधिकारी नितिन भट आदि उपस्थित होते.