Mahavitran
MahavitranTendernama

Sambhajinagar : तुम्ही शहर साफ करा आम्ही घाण करणारच; महावितरणचे कंत्राटदार सुधारणार कधी?

Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुळात भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण करणे आदींसह विविध देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणने पावसाळ्यापूर्वीच करणे अपेक्षित आहे. शहरातील महावितरणच्या विविध विभागांतर्गत या कामांना त्याच "त्या" कंत्राटदारांमार्फत वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली टेंडर काढून कामे केली जातात.पावसाळ्यापूर्वी जीवित व वित्तहानी होऊ नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महावितरण त्यासाठी मान्सूनपूर्व कामे करायला प्राधान्य देते. मात्र, या कामांवर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा कंत्रादरारावर कसलाही वचक नसल्याचे समोर येत आहे.एकीकडे मनपाचे संपुर्ण शहरात महास्वच्छता अभियान सुरू असताना दुसरीकडे महावितरणचे कंत्राटदार वीज तारांना स्पर्श करणार्या फांद्या तोडून रस्त्यांवरच पसारा ठेऊन कंत्राटदार यंत्रणा गायब करत आहे. महावितरणच्या या अस्वच्छ कारभाराबाबत भाजपचे माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. दुसरीकडे त्यांनी महावितरणच्या संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

Mahavitran
Sambhajinagar : वारंवार खोदकामावर सातारा-देवळाईकर का संतापले?; बघा मनपाला काय दिला इशारा

महावितरणच्‍या शहराअंतर्गत सिडको हडको या नवीन शहरासह जुन्या शहराचा व छावनी मंडळाचा समावेश होतो. या सर्व भागात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे कंत्राटदारांच्या मार्फत करण्यात येतात. मात्र पावसाळा लागू होऊन दोन महिने झालेत. अद्याप भरपावसाळ्यात महावितरणकडून कंत्राटदारांमार्फत ही कामे सुरूच आहेत. वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे कधीच पावसाळ्यात पूर्णत्वाकडे जात नाहीत. दरम्यान या कामात कंत्राटदारांमार्फत वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे, खांबांचे, उपकेंद्रातील उपकरणांचे पूर्ण अर्थिंग तपासणे व तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करण्याचे आहे. ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वाकलेले किंवा गंजलेले वीज खांब, उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्यांना आवश्यकतेनुसार गार्डस् पुरवणे, तारांमधील झोल काढण्याचे कामे केली जातात.

पावसाचे पाणी साठणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, लघुदाब वितरण पेटीची दुरुस्ती, दरवाजा नसल्यास लावणे, आदी कामे केली जातात. खराब झालेले डिस्क व पीन इन्सूलेटरमध्ये पाणी गेल्यास, खोदकाम करताना भूमिगत वाहिन्यांमध्ये दोष निर्माण होणे, पावसामुळे केबलमधील आर्द्रता येणे, वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो.यासाठी महावितरणकडून नेमलेले कंत्राटदार कामे करतात. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मात्र सदर कामात कंत्राटदारांकडुन कमालीचा हलगर्जीपणा केला जातो. महावितरणने टेंडरमध्ये दिलेल्या अटी - शर्ती धाब्यावर बसवत वीज तारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या व पाला पाचोळा रस्त्यांवर तसाच टाकून देत यंत्रणा पसार करतात. शहरातील सर्वच रस्त्यांवर या झाडांच्या फांंद्या रस्त्यावर आल्याने वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mahavitran
Sambhajinagar : कंत्राटदार, मनपाच्या वादात 1 लाख नागरिकांची प्रवासासाठी कसरत

सिडको एन-५ गुलमोहर काॅलनीत या फांद्या छाटणार्या महावितरणच्या कंत्राटदाराने संपुर्ण परिसरात पसारा पांगवल्याने या भागाचे माजी नगरसेवक शिवाजीराव दांडगे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारत तातडीने फांद्या उचलण्याची मागणी केली आहे. शहरातील मुख्य आणि खूपच वर्दळीच्या रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर तसेच व्यापारी प्रतिष्ठाणालगत, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बॅंका तसेच मंगल कार्यालये, नागरिकांच्या घरांसमोर रस्त्यांवर झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या आहेत. या फांद्या दुचाकी वाहन चालकांच्या चाकात अडकत असल्याने व या फांद्या चुकविताना दुचाकी चालकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या फांद्या तातडीने उचलण्याची मागणी दांडगे यांनी केली आहे.

काय म्हणतात नागरिक

एकीकडे महावितरण वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे म्हणत शहरवासीयांना आवाहन करते. मात्र शहरात अनेक भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फीडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी अर्थात डीप्यांजवळ अशा वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत देखील झाडांच्या फांद्या व पालापाचोळा व कचरा टाकण्यात येतो.

- डाॅ. अनिल शिवसुंदरे

वीजयंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा व झाडांच्या फांद्या पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना शहरात अनेकदा घडल्या आहेत. लोकांच्या चुकांमुळे पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित होतो. सध्या पावसाळा आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजपुरवठा खंडित होताच डासांचा चावा सुरू होतो. कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकार दिवसें दिवस वाढत  आहेत.अशा आगींमुळे यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक वाढतो. .  शहरातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. कंत्राटदारामार्फत देखील वीज तारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या तोडल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावायला हवी.

- शिवाजीराव दांडगे

तज्ज्ञ काय म्हणतात

पालापाचोळा व फांद्यांच्या प्रक्रियेतून मनपाला चांगले उत्पन्न मिळू शकते. मनपाची शहरात उद्याने , मैदाने आहेत, या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत. शहरातील झाडांचा पडणारा पाला पाचोळा , झाडांच्या लहान फांद्या आदी पासून मनपाच्या माध्यमातून जळाऊ विटा तयार केल्या जावू शकतात.‌ यासाठी ग्रीन वेस्ट प्रकल्प मनपाने राबविने गरजेचे आहे . शिवाय शहरातील सार्वजनिक रस्त्यावर झाडे आहेत . ह्या झाडांच्या छाटणी दरम्यान लहान मोठ्या फांद्या व पाला निघतो . सार्वजनिक ठिकाणी वा खाजगी ठिकाणी असलेली झाडे पावसाळ्यात पडण्याच्या घटना घडतात . तसेच  विकासकामात बाधा ठरतात म्हणून , घोकादायक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात झाडे  तोडली जातात त्यावेळी त्यातून मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला पाचोळा , फांद्या निघतात . नारळाच्या झावळ्या पडत असतात.

मनपाकडे ओला व सुका कचर्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी शहराच्या विविध भागात चार ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र ग्रीनवेस्ट प्रकल्प नसल्याने वर्षानुवर्षे ग्रीनवेस्ट रस्त्यांच्या कडेला साठलेले असते. मनपाच्या शहरात भरपूर मोकळ्या जागा आहेत. सदर झाडांचा पालापाचोळा , लहान फांद्या ह्या एखाद्या मोकळ्या भूखंडावर जमा करावा. झाडांचा हा पाला - फांद्या डम्पिंगच्या ठिकाणी सुद्धा टाकला जावू शकतो. या झाडांच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत त्यावर प्रक्रिया करण्या बाबत विचार करणे आवश्यक आहे. या झाडांच्या पाला पाचोळा व लहान फांद्यां पासून खत तसेच जळाऊ विटा बनवण्यासाठी मनपाच्या मोठ्या भूखंडावर प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. शहरात  दररोज सुमारे १० ते १२ टन इतका झाडांचा कचरा निघत असतो . त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प चालवून रोज सुमारे १० टन पाला पाचोळा व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून त्या पासून जळाऊ विटा तयार होऊ शकतात.सुक्या फांद्या , पाला हे क्रश केले जाते व नंतर साच्यात त्याच्या विटा तयार केल्या जावू शकतात.  तर हिरव्या पानां पासून कंपोस्ट खत तयार केले जावू शकते.जळाऊ विटा तयार करून त्या विविध कंपन्या आदींच्या बॉयलर साठी पुरवल्या जावू शकतात.‌

- डाॅ. वर्षा नाशिककर, पर्यावरण तज्ज्ञ

Tendernama
www.tendernama.com