Sambhajinagar : सिडको टी पाॅईंट ते बसस्थानक सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे; मजीप्राचा 'प्रताप'

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या कामांवरून आधीच त्रस्त असलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांना मजीप्राकडून पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. सिडको टी पाॅईंट चौक बसस्थानक या मार्गावरील नवाकोरा सिमेंट रस्ता खोदण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता. आता तो खोदण्यात आल्याने या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनीही संताप व्यक्त केला आहे.याबरोबच जी-२० च्या काळात चकाचक झालेला सिडको उड्डाणपुलाखाली जालनारोड देखील क्राॅस कनेक्शनसाठी खोदला जाणार असल्याने जालनारोडवर वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडणार आहे.

Sambhajinagar
Mumbai : कंत्राटदारांसाठी गुड न्यूज! न्यायालयाच्या दणक्यानंतर 'तो' निर्णय रद्द; 15 लाखांपर्यंतची कामे...

आधीच सिमेंट रस्त्यांच्या रखडत चाललेल्या कामांमुळे छत्रपती संभाजीनगरकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडत आहे. त्यातच तयार झालेले व वाहतुकीची चांगली गर्दी असलेले रस्ते खोदल्याने संतापात भर पडणे साहजिक आहे. आजही शहरातील अनेक सिमेंटच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तयार झालेले रस्ते वर्षभरात तडकले आहेत. खड्डे पडलेले आहेत. आमदार,खासदार यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची त्रयस्थ संस्थांकडून तपासणी करण्याची मनपा आयुक्तांची घोषणा देखील हवेत विरली आहे. अशात रस्ते तयार करून ते वर्षभरात फोडून टाकणे यामुळे मनपा प्रशासन,मजीप्रा व जीव्हीपीआरच्या कंत्राटदारावर छत्रपती संभाजीनगरकर संताप व्यक्त करीत आहेत. सोमवारी भल्या पहाटेपासूनच सिडको टी पाॅईंट ते सिडको बसस्थानक हा गुळगुळीत  सिमेंट रस्ता जलवाहिनीच्या कामासाठी खोदल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. रस्ते तयार करायचे व ते फोडून टाकायचे हे शहरासाठी नवी बाब नाही. डांबरी व सिमेंट रस्त्यांची अशी अनेक उदाहरणे छत्रपती संभाजीनगरकरांना चांगलीच ठाऊक आहेत. वर्षभर रस्त्यांवर कुठलेही काम करायचे नाही.दोष निवारण कालावधीत देखील कंत्राटदारांना रस्ते दुरूस्तीसाठी जागे करायचे नाही. मात्र डांबरीकरण आणि सिमेंट रस्ते तयार झाले की आठवडाभरातच ते कुठल्या न कुठल्या कामासाठी खोदून टाकायचे, अशी जणू परंपराच तयार झाली आहे. त्यातून आता सिमेंट रस्ते ही सुटलेले नाहीत. 

Sambhajinagar
Sambhajinagar : नॅशनल हायवेवर 'या' पुलाचे काम निकृष्ट दिसले अन् बघा प्रकल्प संचालकांनी काय केले?

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे मनपातर्फे शहर पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी ३ सप्टेंबर २०१९ रोजी १६८०.५० कोटी रकमेस तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर सदर प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत सरकारच्या नगरविकास विभागाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर शहर पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकण्यात आली. प्राधिकरणाच्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या हैद्राबादच्या मे.जी.व्ही.पी.आर.इंजिनिअर्स लि. कंपनीला ४ फेब्रुवारी रोजी २०२१ कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. सदर योजनेचे प्रशासकीय कामकाज व टेंडर प्रक्रियेत विलंब झाला. दुसरीकडे मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला शहरात नवीन पाणी पुरवठा योजना राबवितांना शहरातील रस्ते मधोमध फोडले जातील, हे माहित असताना देखील टेंडर प्रक्रिया सुरूच ठेवत रस्त्यांची बांधकामे केली गेली.दुसरीकडे मजीप्राने जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराला दिलेल्या कार्यरंभ आदेशात कंपनीने ३६ महिन्यात काम पुर्ण केल्यानंतर पुढील १६ महिने देखभाल दुरूस्तीचा काळ ठरलेला होता. मात्र दिलेला कालावधी उलटुन कंपनीने अद्याप ५० टक्के देखील काम पुर्ण केले नाही. हे रस्ते बनविताना मजीप्रा , बांधकाम विभाग आणि मनपा यांचा असमन्वय आणि नियोजन शुन्य कारभारामुळे रस्ते फोडावे लागत आहे. सन २०१९ ते २०२४ मध्ये तयार झालेले डांबरीकरणाप्रमाणेच सिमेंट रस्तेही खोदण्याचे प्रकार वाढले. शहरात सर्वच भागात  अशा चांगल्या नव्याकोऱ्या डांबरी व सिमेंटच्या रस्त्यांची खोदाखादी झाली. मात्र, त्यातच आता अत्यंत वर्दळीच्या व कायम वाहतुकीची गर्दी असलेल्या सिडको टी पाॅईंट ते सिडको बसस्थानक हा सर्व्हिस रोड जलवाहिनीच्या कामासाठी खोदल्याने प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त होत आहे. 

Sambhajinagar
Sambhajinagar : हरितपट्टा पार्किंगसाठी कोणाला कोणी केला आंदण?

यासंदर्भात जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराला विचारले असता यापूर्वी आम्ही सर्व्हिस रोड वाचविण्यासाठी हरीत पट्ट्यात जलवाहिनी टाकली. मात्र नेमक्या या पाॅंइटवर पुतळ्याचे काम सुरू असल्याने १४० मीटर लांबीपर्यंत व २ मीटर रूंदी व ६ मीटर खोलीत खोदकाम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे २८९ कोटी खर्च करून तयार होत असलेल्या पैठण रस्त्याची देखील वाट लावली जात आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश सन - २०२३ मध्ये देण्यात आला होता. तर जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश २०२१ मध्ये देण्यात आला होता. मागील दोन वर्षात संबंधित कंत्राटदाराकडून मजीप्राने पैठणरोडवर जलवाहिन्यांचे काम आधी पूर्ण केले असते, तर आज हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असता.ऐन सणासुदीच्या काळात शहरातील बाजारपेठांचे रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने व्यापारी प्रतिष्ठांनावर उपासमारीची वेळ आल्याचे म्हणत व्यापारी देखील संताप व्यक्त करत आहेत. 

काय म्हणतात नागरिक 

शहराची तहान भागवण्यासाठी पाइपलाइन गरजेची आहे. याकामाला आमचा विरोध नाही. मात्र नुक्तीच करण्यात आलेली व वर्षदोन वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे वाटोळे करण्यात आले आहे.गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटदाराकडून खोदकाम होत असताना, मात्र यापूर्वी खोदून जलवाहिनी टाकण्यात आलेल्या रस्त्यांची अद्याप कंत्राटदाराकडून दुरूस्ती केली जात नाही. यामुळे शहराच्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला, हे सामान्य नागरिकांच्या लक्षात येते. मात्र अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही.

- प्रा. अजयकुमार राउत

आमच्या महाजन काॅलनीसह विवेक हाउसिंग सोसायटीला जुळणारे कामगार चौक ते महालक्ष्मी चौक ते एस.टी.काॅलनी येथील कोट्यावधी रुपयांचे नवे सिमेंट रस्ते, फुटपाथ फोडून टाकले. यासंदर्भात आम्ही सहा महिन्यांपासून मनपा प्रशासनाकडे व मजीप्राकडे पाठपुरावा करत आहोत. निवेदनही दिले. पण कुणाचेही लक्ष नाही. जेष्ठनागरिक घराबाहेर पडूच शकत नाहीत.अपघाताचे प्रमाण वाढले. याला जबाबदार कोण ?

- रामदास फड, रहिवासी महाजन काॅलनी, एन - २

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com