औरंगाबाद (Aurangabad) : गारखेडा परिसरातील शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील प्रस्तावित आणि प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गासाठी राज्य सरकारने निधी वितरीत करण्याचे काम सुरू केले आहे. यातील पहिल्या टप्प्यात १ कोटी ८४ लाख रूपये औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (Public Work Department) नुकतेच पाठवले आहेत. आता हा पैसा महापालिकेच्या नगर रचना विभागामार्फत उप अधीक्षक, भुमी अभिलेख यांना पुढील भुसंपादन प्रक्रियेसाठी वर्ग करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाई चौकादरम्यान दक्षिणेस भुयारी मार्गाच्या जोड रस्त्यासाठी आवश्यक १७८४ .९९ मीटर जागेची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत निवाडा घोषित करून सदर बाधित जागेचे भुसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार खाजगी वाटाघाटी अंतर्गत जागा मालकांना मावेजा देउन जागा रेल्वेच्या ताब्यात देणार असल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाने टेंडरनामाशी बोलताना स्पष्ट केले आहे. उर्वरित निधी देखील सरकार लवकरच पीडब्ल्यूडीकडे वर्ग करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केल्याने भुयारी मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेचा तिढा आता संपला आहे. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाचा ‘संग्राम’ आता लवकरच संपणार असल्याचे दिसत आहे.
ॲड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेद्वारे २ नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना व्हावी यासाठी मुद्दा उपस्थित केला होता. त्यात सरकार, रेल्वे, पीडब्ल्यूडी आणि महापालिकेला प्रतिवादी केले होते. न्यायालयाने संबंधितांची कानउघाडणी केल्यानंतर सरकारने मनपा, पीडब्ल्यूडी (जागतिक बँक प्रकल्प) आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले होते. त्यात एकमताने अधिकाऱ्यांनी भुयारी मार्ग योग्य असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर भुयारी मार्गासाठी रेल्वेने ३८ कोटी ६० लाखांचे अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार केला. त्यात रेल्वे आणि राज्य शासनाने भागीदारी तत्त्वावर भुयारी मार्गाचा प्रश्न सोडवावा असे न्यायालयाचे आदेश देखील मान्य केले. रेल्वेने हिश्शातील १६ कोटी ३० लाखांची तरतूद केली. शासनाने देखील २२.०५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, महापालिका, सार्वजनिक बांधकाम (जागतिक बॅंक प्रकल्प शाखा) उपविभागीय अधिकाऱ्याकडूनदेखील एनओसी मिळाली होती.
सा.बां. अन् मनपात वाद
शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा कायम सुटणार असे वाटत असताना पीडब्ल्यूडीने भूसंपादनापोटी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाच्या सहा कोटींच्या रकमेतील ३० टक्के म्हणजे १ कोटी ८४ लाख रुपयांचा हिस्सा महापालिकेला मागितला. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे म्हणत महापालिकेने सरकारला पत्र पाठवून भुयारी मार्गाचा खर्च आपणच उचलण्याची विनंती केली होती.
यात रखडले होते काम
भूसंपादनासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने टाळाटाळ केली होती. त्यात भुयारी मार्गाचे काम नियमानुसार रेल्वेच करेल असे दमरेने (दक्षिण मध्य रेल्वेने) सांगितल्यावर शिवाजीनगर वाणी मंगल कार्यालय ते रेल्वेगेट ते देवळाई चौक दोनशे मीटर लांबीच्या उतारावरील पोच मार्ग कोणी करावे असाही तिढा कायम होता. यासंदर्भात महारेलचे सहायक व्यवस्थापक टी. कुमार यांनी पोच मार्ग न करण्याचा लेखी खुलासा केल्याने . ती जबाबदारी पीडब्लुडीने घेतली आहे.
पीडब्ल्यूडीने घेतली 'टेंडरनामा'ची दखल
या प्रकरणी ‘टेंडरनामा ’ने वृत्तमालिका प्रकाशित केली. एवढेच नव्हे, तर सातारा- देवळाई, गांधेली, बीड बायपास, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, बाळापूर आदी भागांत जनजागृती केली. सातारा देवळाईतील जनसेवा नागरी कृती समितीच्या वतीने आदर्श शिक्षक बद्रिनाथ थोरात, समाजसेवक पद्मसिंह राजपुत, असद पटेल, सोमिनाथ शिराने, ॲड. शिवराज कडु पाटील व इतरांनी मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्याकडे पाठपुरावा केला.
मुख्य अभियंत्यांनी बोलावली होती बैठक
उकिर्डे यांनी पीडब्ल्यूडीच्या प्रादेशिक कार्यालयात ९ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली होती. तीत पीडब्ल्यूडीचे सहायक मुख्य अभियंता अ. सु. डाके, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, पीडब्ल्यूडीचे (जागतिक बॅंक प्रकल्प) शाखेचे कार्यकारी अभियंता नरसिंह भंडे, उपअभियंता गोपाल पातूनकर महापालिकेचे कार्यकारी अभियंता भागवत फड, सहायक संचालक नगररचनाचे ए.बी.देशमुख, शाखा अभियंता संजय चामले, उपअभियंता राजेंद्र वाघमारे, दमरेचे नांदेड विभागाचे विभागीय मुख्य अभियंता के. श्रीनिवास, विभागीय सहायक अभियंता जनार्दन बालमूच, वरिष्ठ शाखा अभियंता टी. हरिशकुमार, महारेलचे सहायक व्यवस्थापक टी. कुमार आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर भुयारी मार्गाला गती प्राप्त झाली.