छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरांतर्गत जाणाऱ्या जालना राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची बनवेगिरी G-20 च्या काळात संबंधित बांधकाम विभागाने केली. पण कालच्या मुसळधार पावसात 'पुन्हा येरे माझ्या मागल्या' ही गेल्या अनेक वर्षाची अनुभूती काही चुकणार नाही. कालच्या पहिल्याच पावसात या मार्गावर जीवघेणे खड्डे पडल्याने पावसाने संबंधित विभागाची खाबुगिरी उघड केली आहे.
अशातच शहरांतर्गत जाणाऱ्या जालनारोड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ (अ) वरील सुखना नदीवरील पुलाच्या मुख्य ३० मीटरच्या धावपट्टीशेजारी दोन्ही बाजुला पादचाऱ्यांसाठी दीड मीटरचे फुटपाथ तयार करण्यात आले होते. यावर थोडा जरी पाऊस पडला की पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडतात. यामुळे पादचाऱ्यांना अत्यंत वर्दळीच्या मुख्य धावपट्टीवरून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे अपघाताचा धोका देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील दोन्ही बाजुच्या पुलाचे कठडे मजबुत आहेत.
जी-२० च्या काळात पुलाची रंगरंगोटी देखील करण्यात आली होती. मात्र पादचारी पुलाच्या पृष्ठभागाची स्वच्छता करून नदीच्या बाजुला असलेल्या कठड्यांच्या स्पाॅट होलची स्वच्छता केल्यास पाण्याचा निचरा होणे सहज शक्य आहे. जेणेकरून पादचाऱ्यांचा मार्ग सुकर होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल. जी-२०च्या काळात हा रस्ता चकचकीत करण्यात आला होता. मात्र धावपट्टीच्या शेजारी पादचारीपुलाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.