छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : २०१२ मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात पैठण गेट व औरंगपुरा भागात बीओटी (BOT) तत्त्वावर बहुमजली पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. पण दहा वर्षांत अमलात आला नाही.
त्यानंतर तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी २०२१ मध्ये पैठण गेट येथे पहिली 'मल्टी स्टोअरेज पार्किंग' उभारण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय देखील थंडबस्त्यात राहीला. त्यानंतर दोन वर्षांपुर्वी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करत जी श्रीकांत यांनी शहरात प्रयोगिक तत्वावर ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी टेंडर काढले पुण्यातील एका एजन्सीला काम देण्यात आले. मात्र या पेड पार्किंगला नागरिकांनी विरोध केल्याने या ही पार्किंग धोरणावर पाणी फिरले.
आता जी. श्रीकांत यांनी पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जुन्याच निर्णयांचा शोध घेत चांगले पाऊल उचलले आहे. ते म्हणजे पैठण गेट येथे शंभर कार पार्किंग होतील यासाठी साडेबारा कोटी रुपये खर्चून स्वयंचलित बहुमजली इमारत उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र मागील निर्णयाप्रमाणे हा निर्णय थंडबस्त्यात अडकून मागे पडू नये यासाठी 'टेंडरनामा'चा हा खास रिपोर्ट.
यापुर्वी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात पैठणगेट व औरंगपुरा भागात बीओटी तत्त्वावर बहुमजली पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय माजी महापौर अनिता घोडेले यांच्या काळात झाला होता. दरम्यान ११ एप्रिल २०१२ रोजी महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत पे अँड पार्क या पद्धतीची ही सुविधा पैठणगेट व औरंगपुरा येथे उपलब्ध करून देण्यात येणार होती. औरंगपुरा, पैठणगेट हे शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेचा मुख्य भाग आहे. शहर व जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागातील लोकांचा ओढा येथे कापड खरेदीसाठी येतो.
शहराच्या मध्यवर्ती भागात या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे दूचाकी, चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांनी मोठी गैरसोय होते. वाहने उभी करता येत नाहीत. वाहने उभी केली तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मध्यवस्तीतील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी ११ एप्रिल २०१२ रोजी माजी महापौर अनिता घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात झालेल्या बैठकीत माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, माजी सभागृहनेते त्र्यंबक तुपे, माजी स्थायी समितीचे सभापती राजू शिंदे, माजी नगरसेवक अनिल मकरिये, तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.
पैठणगेट येथे मीर सलामी मार्केट समोरील महानगरपालिकेच्या मोकळी जागेवरच बीओटी पद्धतीने बहुमजली पाकिर्ंग उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय औरंगपुरा भाजी मंडईजवळील नाल्यावरदेखील बहुमजली पार्किंग संकूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्हीही कामांसाठी लवकरात लवकर टेंडर काढून काम सुरू होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र १३ वर्षांत टेंडर निघालेच नाही.
आस्तीककुमार पाण्डेय यांच्या काळातही तेच...
त्यानंतर ७ जुलै २०२१ मध्ये तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी जुन्या शहरातील पैठणगेट ते गुलमंडी ते सिटीचौक हा रस्ता नो व्हिकल झोन म्हणून विकसित केला जाणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान येथे लागणाऱ्या वाहनांसाठी पैठणगेटवरील मोकळ्या जागेवर पाच मजली मल्टी स्टोअरेज पार्किंग बांधली जाणार असल्याचेही सांगितले. त्यासाठी इमारतीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महानगरपालिका शहर अभियंता कार्यालयाच्या वतीने प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा, या तत्वानुसार इमारत विकसित केली जाणार होती. मात्र ना विकास आराखडा तयार झाला, ना इमारत उभी राहिली.
महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या प्रयोगाला ब्रेक
यानंतर स्मार्ट सिटी प्रशासन आणि महानगरपालिकेने शहरात प्रयोगिक तत्वावर ७ ठिकाणी पेड पार्किंग सुरू केली. मात्र हे करताना मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पिवळे पट्टे मारले व वसुली सुरू केली. या धोरणामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कार्पोरेशन ने कुठेही मोकळ्या जागेवर पार्किंग झोन निश्चित केले नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराला पावतीही फाडता येत नव्हती. रस्त्यांवरच पेड पार्किंगचे बोर्ड लावत सरू केलेल्या वसुलीला नागरिकांनी विरोध करताच कंत्राटदाराने हे काम सोडले.
पुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला हे काम देण्यात आले होते. त्याची २४ महिन्यांसाठी निवड करण्यात आली होती. काम चांगले असेल तर त्याला करार वाढवून दिला जाणार होता.
आता औरंगपुरा नाला वगळता महानगरपालिकेने पैठण गेट येथे स्वयंचलित बहुमजली कार पार्किंग उभारण्यासाठी गत आठवड्यात टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जवळपास साडेबारा कोटी रुपये खर्च करून एका वेळी किमान १०० कार पार्क होतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
हे स्वप्न साक्षात खरे ठरले तर यामुळे वाहने सुरक्षित राहतील. त्याचबरोबर जुन्या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची सोय होईल. मात्र गत १३ वर्षांचा अनुभव पाहता बहुमजली इमारतीसाठी आधी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर काढले जाते. पण बांधकामाचे टेंडर काही काढले जात नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाऊस आणि नियोजनाचा दुष्काळ यामुळे शहरवासीयांची गैरसोय होते, ते यावेळी व्हायला नको.