छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने शहरातील खड्डेमय रस्त्यांवरुन मनपा, बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, जिल्हा प्रशासनासह विभागीय आयुक्त तसेच राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचीवांसह अनेकांवर संताप व्यक्त केला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या संरक्षक भिंतीपासून सुरू होणाऱ्या सिडको एन-३ ते हाॅटेल दिपाली ते भवानी पेट्रोलपंप ते सोहम मोटर्स ते संजयनगर ते म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर या रस्त्याची प्रंचंड चाळणी झालेली आहे. चिकलठाणा विमानतळ ते हाॅटेल रामा इंटर नॅशनलकडे येणाऱ्या व्हीआयपी रस्ता जालनारोड याला समांतर शेजारीच असलेला हा महत्वाचा सर्व्हिस रस्ता आहे. व्हीआयपी जालनारोड फक्त व्हिआयपींसाठी सुसाट आणि मोकळा केला जातो.मात्र त्याला लागुनच असलेल्या या सर्व्हिस रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही. करदात्यांसाठी अंगठे फोडच का?, असा प्रश्न टेंडरनामाच्या पाहणीत उपस्थित झाला आहे.
या रस्त्याची दुरूस्तीतर दुरच, पण कर भरणाऱ्या नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात मोकळे फुटपाथ देखील नाहीत. त्याचेही फोटो छापा म्हणत खड्ड्यांनी त्रस्त नागरिकांनी कडक शब्दात मनपावर संताप व्यक्त केला. तसेच या खड्डेमय रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी , यासाठी सातत्याने संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असा सल्लाही वाहनधारकांनी केला. यासंदर्भात माजी नगरसेवक दामोधर शिंदे यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क केला असता भवानी पेट्रोलपंप ते चिंतामणी अपार्टमेंट पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी ३० लाख रूपये पूर्व मतदार संघाचे आमदार तथा राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नाने नगर विकास विभागाने मंजुर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची एजंन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. रस्त्याचे काम देखील कंन्स्ट्रक्शन कंपनीने सुरु केले होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव शहर वाहतूक शाखेने ना - हरकत प्रमाणपत्र नाकारल्याने काम असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे हाॅटेल दिपाली ते भवानी पेट्रोलपंपापर्यंत देखील सावे यांनी सिमेंट रस्त्यासाठी निधी देणार असल्याचे सांगितले आहे,असे ते म्हणाले. शिंदे यांच्या पाठपुराव्याने उर्वरित अर्धवट रस्त्याचे काम होईल. मात्र तुकड्या - तुकड्यात रस्त्याचे काम न करता मनपाने शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून उच्च न्यायालयापासून तर चिकलठाणा विमानतळ हद्दीलगत एकदाच एकाच कंत्राटदारामार्फत सदर सर्व्हिस रस्त्याचे काम करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
उच्च न्यायालय ते म्हाडा कॉलनी या सर्व्हिस रस्त्यावर आधीच खड्ड्यांची बजबजपुरी त्यात हरितपट्ट्यात अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले आणि स्टॉल यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथवर चालणे देखील कठीण होत आहे. यामुळे मनपा आयुक्तांनी आता स्वतःहून लक्ष घालून रस्ता दुरस्ती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने नागरिकांशी संवाद साधला असता जेव्हा जेव्हा शहरात पीएम आणि सीएमसह कोणताही व्हिआयपी येतो तेव्हा व्हिआयपी जालनारोड सुसाट केला जातो. अनेक तास रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ चकाचक होतात. जर एका दिवस हे होऊ शकते, तर करदात्यांसाठी जालनारोडलाच जोडणारा या सर्व्हिस रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही. सिडको उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर उच्च न्यायालय ते सोहम मोटर्स पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडे सहा कोटी एमएसआरडीसीने खर्च केले होते. मागील वीस वर्षात मनपाने या रस्त्यासाठी मोठा निधी खर्च केला नाही. केवळ गणेश विसर्जनापुरते वाटीभर डांबर आणि टोपलेभर खडी टाकली जाते.नागरिकांकडून सरकार कर घेते मग खड्डेमुक्त रस्त्यांवर चालण्याचा त्यांना अधिकार नाही का ? , असा सवाल देखील प्रवाशांनी व्यक्त केला आहे. परंतु शहरात इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे देखील नागरिक म्हणाले.