छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नव्या आयटी धोरणानुसार आयटी कंपन्यांसाठी आरक्षित असलेले भूखंड दुसऱ्या उद्योगांसाठी वापरता येत नाहीत. मात्र या धोरणाची अंमलबजावणी न करता आयटी पार्कसाठी (IT Park) आरक्षित भूखंडांवर इतर उद्योगांची घुसखोरी झाल्याची बाब निदर्शनास येऊनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) संबंधितांकडून भूखंड जप्त करत नाही.
परिणामी आयटी पार्कसाठी वाटप केलेल्या भूखंडाचा गैरवापर सुरूच आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांना पायबंद करण्यासाठी सरकारचे नवे आयटी धोरण केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तेथील आयटी पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांच्या आरक्षणात बदल केल्याचा खुलासा केला आहे.
मराठवाड्यातील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील टी सेक्टरमधील एकमेव आयटी पार्कमध्ये आयटी पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर दुसऱ्या उद्योगांची घुसखोरी झाल्याचे चित्र दिसत आहे. येथील आयटी पार्कच्या आरक्षित भूखंडांवर सध्या शाळा, मंगल कार्यालये, हाॅटेल्स व महापालिकेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविणाऱ्या अन्न अमृतची खिचडी शिजवली जात आहे. आयटी पार्कच्या नावाखाली बड्या राजकीय मंडळीने सरकारी सबसिडीत भूखंड गिळंकृत करून इतर उद्योग स्थापन केले आहेत. मुळात या क्षेत्राचा वापर हा ‘नॉन आयटी पार्क’ म्हणूनच जास्त होत आहे. परिणामी मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार मुला - मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा, या ऐतिहासिक शहराला एक ग्लोबल व्हिजन मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील टी सेक्टर मध्ये मोठ्या आयटी पार्क प्रकल्पाची उभारणी केली गेली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने येथील ४५ वर्ष जुन्या इमारतीला चेहरा बदलला. सुमारे २ कोटी रुपये खर्च करून तीन मजली इमारतीचा बाह्यभाग ग्लॅस पॅनल उभारून आधुनिक करण्यात आला होता. .
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ४५ वर्षे जुन्या याच इमारतीमध्ये २००० साली सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कला सुरुवात झाली होती. या पार्कचे उद्घाटन १ फेब्रुवारी २००० रोजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या काळात अवघ्या दोन कंपन्यांपासून या पार्कमधील कामकाजाला सुरुवात झाली होती. मागील अनेक वर्षांपासून येथील इमारतीचे बाह्यरूप खराब झाले होते. इमारतीचे बाहेरील स्ट्रक्चर जुने वाटू लागले होते. कामाच्या निमित्ताने येथे देश-विदेशातून विविध कंपन्यांचे संचालक, पदाधिकारी, अधिकार्यांची नेहमी वर्दळ राहत असे. जेव्हा विदेशी उद्योजक आणि ग्राहक आयटी पार्कच्या या इमारतीत आणले जात होते तेव्हा बहुतांश जण या जुन्या इमारतीकडे पाहून नाक मुरडत असत. एवढेच नव्हे तर येथे वाहन पार्किंगसाठी जागाही नव्हती. अंतर्गत रस्त्यावरच फोर व्हीलर, टू व्हीलर पार्किंग करण्यात येत होते.
मुख्य इमारतीसमोरील व्हरांड्यातच टू व्हीलरची पार्किंग असल्याने पायी चालणेही कठीण झाले होते. यासंदर्भात २०१० मध्ये सीएमआयच्या शिष्टमंडळाने तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन बैठक घेऊन आयटी पार्कच्या इमारतीचा चेहरामोहरा बदलण्याची विनंती केली होती. या कामास त्वरित मान्यता देऊन उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीला इमारतीचे काम करण्याचे आदेश दिले होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली.
या तीन मजली इमारतीच्या समोरील बाजूस ग्लास पॅनल व अॅल्युमिनिअम पॅनल उभारले गेले. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. येथील तीन मजली इमारतीला नवीन चकचकीत चेहरा प्राप्त झाला. आयटी पार्कमध्ये वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले. मुख्य इमारतीच्या समोरील बाजूस असलेल्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. तेथे फोर व्हीलर व टू-व्हीलरसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. सावलीसाठी शेड उभारण्यात आले.
२०१५ ते १६ दरम्यान येथील आयटी हबमधून १४ देशांना सॉफ्टेवअरची निर्यात होत होती. सुरूवातीला आयटी पार्कमध्ये अवघ्या २ आयटी कंपन्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. २००४ मध्ये येथे ८ कंपन्या या क्षेत्रात होत्या. पंतर आयटी पार्कमध्ये ३० कंपन्या कार्यरत होत्या. यात काही कंपन्या बीपीओचे काम करत होत्या, तर काही कंपन्या ‘हाय एंड’ तंत्रज्ञानावर काम करत होत्या.
अमेरिका, कॅनडा, जर्मनी, हॉलंड आदी १४ देशांत सॉफ्टवेअरची निर्यात केली जात असे. मेकॅनिकल, स्ट्रक्चरल, आर्किटेक्चरल डिझाईनसारखे उच्चदर्जाचे काम येथे केले जात असे. या क्षेत्रात आयटी पार्कमध्ये २००४ मध्ये ८ कंपन्या होत्या. ७० कर्मचारी काम करीत होते. त्यानंतर आयटी पार्कमध्ये ३० कंपन्यांमध्ये ५ हजार कर्मचारी कार्यरत होते. यात बीपीओसाठी काम करणारे ४ हजार, तर सॉप्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करणारे १ हजार कर्मचारी कार्यरत होते.
आयटी पार्कच्या या भव्य वास्तुत वार्षिक १०० कोटींची उलाढाल होत असे. त्यापैकी २० कोटींची उलाढाल फक्त निर्यातीतून होत असे. आयटी पार्कमध्ये २८ गाळे असून, येथे १३ कंपन्या तर आसपासच्या क्षेत्रात सुमारे १७ कंपन्या आयटी क्षेत्रात काम करीत होत्या. मात्र आता येथे केवळ दोन कंपन्या सुरू असून गाळ्यांना टाळे ठोकले आहे.
याच इमारतीच्या शेजारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी पार्क ऑफ इंडीया ही भव्य इमारत उभारली यात २०१७ दरम्यान १७ ते २० कंपन्या सुरू होत्या. सद्य:स्थितीत सदर इमारत केंद्र सरकारच्या इलेक्ट्राॅनिक एवं सुचना प्रोद्योगिकी मंत्रालयाच्या ताब्यात असून येथे आयटीच्या केवळ तीन कंपन्या कार्यरत आहेत.