छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : आधीच जलवाहिनी अन् ड्रेनेज दुरुस्तीसाठी कोट्यवधीचे नवे रस्ते अन् फूटपाथ खोदले जात आहेत. त्यात आता महावितरणकडून (Mahadiscom) होणाऱ्या त्रासात भर पडली आहे. महावितरणतर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठ्यास अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी महावितरणने तोडलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून असल्याने त्याचा नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता टेंडरमधील अटीशर्तीनुसार तोडलेल्या फांद्या महापालिकेने नव्हे, आम्ही नियुक्त केलेल्या ठेकेदारांनीच उचलून त्याची विल्हेवाट लावने बंधनकारक असल्याचा खुलासा त्यांनी केला. जर ठेकेदार झाडाच्या फांद्या उचलून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावली नसेल, तर अशा बेफिकीर ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची टेंडरमध्ये तरतूद असल्याचेही अधिकारी सांगतात. मात्र तोडलेल्या फांद्या उचलायचे काम महापालिकेचे असल्याचे म्हणत ठेकेदार हात वर करत आहेत. ठेकेदारांच्या या मनमानी कारभाराकडे महावितरण आणि महापालिकेतील कारभाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने ठेकेदारांचा 'फांद्या तोडो, रास्ते पे छोडो' अशा हलगर्जीपणामुळे अनेक वर्षांपासून स्मार्ट शहर विद्रूप होत आहे. दुसरीकडे रस्ते आणि फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी फांद्या विखुरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शहरात अपघाताचे सावट पसरलेले आहे.
वादळी वाऱ्याने प्रत्येकवर्षी होणारे नुकसान आणि नागरिकांची विद्युत गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजनांवर विशेष भर दिला जात आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात.
यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहानमोठ्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढवणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश असतो.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या कामांना गती दिली जाते. मात्र यंदा मार्च - एप्रिल महिन्यापासूनच अवकाळी पावसाचा फटका आणि होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणने मान्सूनपूर्व कामांमध्ये लक्ष घातले आहे.
काही दिवसांपासून भर उन्हात ठेकेदारांकडून विविध ठिकाणी झाडांच्या छोट्यामोठ्या फांद्या तोडल्या जात आहेत. याशिवाय साफसफाई, झुकलेले विद्युत खांब सरळ करणे, लोंबकळलेल्या तारा ओढणे, तारेखालील झाडे तोडणे, रस्त्यावरील तारांवर सुरक्षा कवच करणे आदी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली जात आहेत. त्यांनतर डिस्क व पीन इन्सूलेटर बदलणे, फिडर पिलरची दुरुस्ती यासह देखभाल दुरूस्तीची सर्व कामे पुढील महिना संपायच्या आत पूर्ण केली जात आहेत.
येत्या पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित राहू नये, यासाठी 'महावितरण'ने काही खाजगी ठेकेदारांमार्फत वीजग्राहकांची काळजी घेत कामे सुरू केली आहेत. वादळी वारा, अतिवृष्टीत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू नयेत, याचा परिणाम वीज ग्राहकांना भोगावा लागू नये. त्यामुळे वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा ओढणे अशी कामे महावितरणने सुरू केली आहेत.
अखंडीत वीजपुरवठ्यासाठी नागरिकांची गैरसोय
मान्सूनपूर्व कामांमध्ये वीज वितरणला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर ठेकेदार उचलण्याची तसदी घेतांना दिसत नाहीत. मान्सूमपूर्व प्रतिबंधात्मक कामांचे टेंडर दरवर्षी काढले जाते. यासाठी एच. के. मगर इलेक्ट्रिकल कंपनी, रिलायबल, साई एजन्सी या ठेकेदार कंपनींना शहर एक व शभर दोन विभागातील कामाचा ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक ठेकेदाराला दहा लाखाचे अंदाजपत्रक तयार करून कामे वाटप केली जातात. यात मर्जीतल्याच ठेकेदारांना अनेक कामांचे टेंडर दिले जाते. सालाबाद प्रमाणे जवळपास दोन ते अडीच कोटी रूपयांपर्यत याकामांवर खर्च केला जातो. त्यानुसार शहरात झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या विविध भागातील ७० टक्के भागातील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. मात्र, ह्या झाडांच्या फांद्या अनेक भागात विखुरलेल्या पद्धतीने तशाच पडून आहेत. ह्या झाडांच्या फांद्या महावितरण कडून नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून उचलल्या जात नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर शहरभर पसारा पडलेला असताना महावितरणचे संबंधित वरिष्ठ व क्षेत्रीय अधिकारी तसेच महापालिका कारभाऱ्यांत टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर झाडांच्या फांद्या, पालापाचोळा पडलेला आहे. त्यातच अवकाळीचा पाणी पडून गेल्याने काही भागात यातून दुर्गंधीही सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या फांद्यांची त्वरित विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महापालिका प्रशासनाचे मौन
एकीकडे शहरात ओला व सुका कचऱ्याचे 'वर्गीकरण' न केल्यास छत्रपती संभाजीनगरकरांना मोजावा लागेल भरभंक्कम दंड अशी दमबाजी, दुसरीकडे थेट रस्त्यांवर सार्वजनिक पार्कींगच्या जागा निश्चित करून केवळ सामांन्यांच्या खिशातून वसुलीचे षडयंत्र रचणाऱ्या महापालिकेच्या कारभाऱ्यांचे शहर विद्रूप करणाऱ्या व मोठ्या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या महावितरणच्या ठेकेदारांच्या अस्वच्छ कारभाऱ्यांकडे का दुर्लक्ष आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे ठेकेदारांनी विद्युत तारांमध्ये अडकणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत; मात्र त्या तशाच रस्त्यावर पडून आहेत. तोडलेल्या फांद्या उचलून घेण्याची जबाबदारी ठेकेदारांची असताना दंडात्मक कारवाईचा नियम महावितरणकडून केवळ कागदावरच ठेवला जात आहे. यापुर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी फांद्या रस्त्यावरून उचलून घेण्याची जबाबदारी महावितरणचीच असल्याने पत्र देखील दिले होते. परंतु महावितरणचा 'हम नही सुधरेंगे' कारभार सुरूच आहे.
तोडलेल्या फांद्या उचलण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच
महावितरण कंपनीतर्फे नियुक्त केलेल्या ठेकेदारांनीच शहरात वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटल्यानंतर ती उचलून नेण्याची जबाबदारी आहे, असे अधिकारी सांगत आहेत; मात्र या फांद्या उचलण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची नसून ती महापालिका प्रशासनाची असल्याचे म्हणत ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करत आहेत.