छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर लोहमार्गावरील भुयारी मार्गाच्या कामासाठी तेलंगानातील आदिलाबादहून लोखंडी गर्डर आणण्यात आले. त्याची लांबी १.७ मीटर आहे. ६ जून रोजी रेल्वे ट्रक काढुन त्यावर तात्पुरता गर्डर टाकून त्यावर ट्रॅक टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ११ जुन पुन्हा गर्डर काढुन ट्रॅक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भुयारी मार्गासाठी येत्या ६ जुन रोजी दुपारी २ ते ६ असा चार तासाचा 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे, त्यानंतर याचप्रमाणे ११ जुन रोजी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. या आंदोलनानंतर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ३८ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने टेंडर मागविले होते. होते. टेंडरमधील अटी-शर्तीनुसार ऑक्टोबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ८ महिन्यांपूर्वी शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आणि ते पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. अखेर रेल्वे विभागानेच मलनिःसारण वाहिनीचे काम केले. यानंतर रेल्वेगेट ते शिवाजीनगर जोड रस्ते करताना महापालिकेची मलनिःसारण वाहिनी आणि महावितरणची ३३ केव्हीची ३०० स्क्वेअर एम.एम.ची भुमिगत केबलचा अडथळा आला. महापालिकेने मलनिःसारण वाहिनीचे निकृष्ट काम केल्याने कंत्राटदाराला मोठा त्रास सहन करावा लागला. संबंधित कंत्राटदारालाच फुटलेली मलनिःसारण वाहिनी बदलावी लागली. त्यात जलवाहिनीसाठी मजीप्रा आणि जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने वरातीमागून घोडे दामटले.
रेल्वेने भुयारी मार्गाचे ७५ टक्के काम केले आहे. भुयारी मार्गासाठी ३.५ मीटर उंच, दोन्ही बाजूंना ५.५ व ५.५ चे बोगदे आणि १५ मीटर रूंदीचा बाॅक्स तयार झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे अभियंता जी. सी. निमजे, चंद्रमोहन हे गत चार दिवसांपासून भुयारी मार्गाच्या कामासाठी तळ ठोकून बसले आहेत. दिवसरात्र २४ तास काम चालू आहे. आता गर्डर टाकण्याची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाचे हे काम लवकर संपनार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेचे काम संपणार आहे. त्यानंतर बांधकाम विभागामार्फत रेल्वे गेट ते देवळाई चौक जोड रस्त्याचे काम सुरू होणार आहे. रेल्वेगेट ते शिवाजीनगर जोड रस्त्याचे ७० टक्के काम झाले आहे. जोड रस्त्यांसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे कंत्राटदारांनी सांगितले.