छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक - ५६ ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीडबायपास बाळापूर फाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी २०२२ - २३ मध्ये माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे व मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते येथील कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांसोबत वाजत गाजत रस्ता कामाचे उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्याचा निधी गेला कुणीकडे असा सवाल करत तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या भागातील असंख्य तक्रारींची दखल घेत 'टेंडरनामा' प्रतिनिधीने या भागातील नागरिकांसह शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास पाहणी केली. दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक - ५६ ते जुना बीडबायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ हा रस्ता नावालाच झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो वसाहती असून, शहराशी संपर्क करण्यासाठी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. या भागात वसाहती स्थापन झाल्यापासून रस्त्याचे काम झालेच नाही. हाच रस्ता पुढे बीडबायपासच्या दक्षिणेकडे वसलेल्या अनेक वसाहतींसाठी दळणवळणाची सोय म्हणून महत्वाचा मार्ग आहे.
रस्त्याचे खंडहर झाल्याने सातत्याने लहानमोठे अपघात होत असतात. विशेषत: पावसाळ्यात बाळापूर फाटा बीडबायपास ते मुकुंदवाडी रेल्वेगेट क्रमांक - ५६ या भागातील नागरिकांना कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने वाहने रेल्वेरूळाच्या अलीकडे रामभरोसे सोडून नागरिकांना तीन ते चार किलोमीटर चिखलात पायपीट करत घर गाठावे लागते. यात रात्री अपरात्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना नेतांना नातेवाईकांना दमछाक होते. विशेषत: खड्ड्यांमुळे वाहने चिखलात फसत असल्याने कित्येकदा गरोदर मातांची रस्त्यातच प्रसुती करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार येथील महिलांनी कथन केला.
या भागातील रेल्वे रुळाच्या विरुध्द बाजुला असणाऱ्या नागरिकांना मृतदेह देखील तीन ते चार किलोमीटर पायपीट करत बाजेवर आणून पुढील सोपस्कार पार पाडावे लागत आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयाला मुकावे लागते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाता येत नाही. रस्तेच नसल्यामुळे फेरीवाले येत नाहीत, असे असताना पालकमंत्री, महापालिका बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिकेसमोर अनेकदा आंदोलने केली. निवेदने दिली. मात्र अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. प्रत्यक्षात काम सुरू केले नाही. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार सत्तेत विराजमान होताच त्यांनी छत्रपती संभाजीनगरला भेट दिली होती. दरम्यान या भागातील नागरिकांनी थेट चिकलठाणा विमानतळावर मोर्चा वळवत शिंदे यांची भेट घेतली होती. चिमुकल्यांचा आकांत पाहून शिंदे यांनी तातडीने संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री संदीपान भुमरे यांना सुचनेनुसार रस्त्याची पाहणी केली.
दरम्यान २०२२ - २३ मध्ये या रस्त्याच्या कामाचे माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी तातडीने वादनाच्या गजरात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन होऊनही स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्पात मंजूर झालेला तीन कोटींच्या सिमेंट रस्ता तयार करण्यात आला नाही. या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या अस्लम राजस्थानी यांच्या ए. जी.कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात काहीच कळायला मार्ग नाही. तरीही ठेकेदाराकडून या रस्त्याच्या कामात लक्ष दिले जात नाही.