औरंगाबाद (Aurangabad) : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या सिडको एन - २ मौजे मुकूंदवाडी भागातील जयभवानीनगरच्या अर्धवट नाल्याच्या बांधकामाबाबत नागरिकांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली. 'टेंडरनामा' प्रतिनिधीने सवाल करताच आता याकामासाठी दुसरी टेंडर काढून काम पूर्ण करण्याचा निर्णय महापालिका घेत असल्याचे समोर आले आहे.
८० लाखांचा चुराडा...
आधीच्या ठेकेदाराने टेंडरमधील नियम व अटी धाब्यावर बसवत अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे काम करून ८० लाखाचा चुराडा केला. तसेच संबंधित ठेकेदार नाल्याचे अर्धवट काम सोडून चार वर्षांपासून पसार झालेला आहे. त्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न 'टेंडरनामा'ने उपस्थित केल्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे अधिकारी म्हणत आहेत.
अधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका
आता या नाल्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला झालेल्या दरवाढीनुसार दोन ते अडीच कोटी रुपये लागतील. तितका बजेट महापालिकेकडे देखील नाही. शिवाय ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुसऱ्यांदा टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळणार का, असे प्रश्न उपस्थित केल्यावर आधीच्याच ठेकेदाराला नोटीस बजावणार आहोत. त्याने नकार दिला तरच टेंडर काढू अशी दुटप्पी भूमिका अधिकारी घेत आहेत.
अर्धवट कामाचे मोजमाप न करता दिले ८० लाख
एक कोटी ६० लाख रूपयाचा निधी या कामासाठी मंजूर होता. आधीच निकृष्ट आणि अर्धवट काम केल्यानंतर देखील महापालिका अधिकाऱ्यांनी त्याला कामाचे कुठलेही मोजमाप न करता ८० लाख रुपये दिले.
दरवाढीला जबाबदार कोण?
आता संबंधित ठेकेदाराने या कामास नकार दिला तर उर्वरीत ८० लाखात हे काम होणार नाही. संबंधित ठेकेदाराची सुरक्षा अनामत रक्कम देखील पुरेशी नाही. चार वर्षांपूर्वी संबंधित ठेकेदाराने हे काम दिलेल्या बजेटमध्ये पूर्ण केले असते तर आज महापालिकेला भाववाढीचा फटका बसला नसता. शिवाय नागरिकांचा त्रास देखील मिटला असता. आता हे काम नव्याने टेंडर काढून केल्यास दोन ते अडीच कोटी रुपये लागतील. या दरवाढीला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
'टेंडरनामा'ने अनेक प्रश्न उपस्थित करत गुगली टाकल्यावर पायचित झालेल्या अधिकाऱ्यांनी चक्क पलटवार करत या कामासाठी त्याच ठेकेदारावर जबाबदारी कायम ठेवणार असल्याचे सांगत आहेत.
एकूणच जयभवानीनगरच्या नाल्यात उप अभियंता अनिल तनपूरे आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी हात धुतल्याचा संशय बळावत आहे. आता झालेल्या पापावर पांघरूण घालण्याचे काम नवनियुक्त अधिकारी बी.डी.फड. आणि राजीव संधा करत असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील मौजे मुकूंदवाडी भागातील सिडको एन - २ शिवाजी पुतळा ते जयभवानीनगर मार्गे तिरुपतीनगर ते जिजामाता काॅलनी या एक किलोमीटर नाल्याच्या बांधकामासाठी २०१७ - १८ मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी आणि उप अभियंता अनिल तनपूरे यांनी एक कोटी ६० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यालाच गृहीत धरून टेंडर काढण्यात आले होते. त्यात यशस्वी झालेल्या बीडच्या शेख माजीद कन्सट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते.
यात शिवाजी पुतळा - जयभवानीनगर - जिजामाता काॅलनी - तिरुपती काॅलनीपर्यंत नाल्याच्या दोन्ही बाजुने आरसीसी सूरक्षा भिंत बांधणे, ९ ठिकाणी सुरक्षा कठड्यासह नाल्यावर काॅक्रिटचा स्लॅब टाकून रहदारी पूल तयार करणे आणि नाल्याच्या भूपृष्ठाखाली एक ते दीडफूट खोदकाम करून त्यात खडीकरण आणि मजबुतीकरण करून काॅक्रिटीकरण करणे आदी कामांचा त्यात समावेश होता.
'टेंडरनामा'कडून पाठपुरावा
या कामासाठी महापालिकेच्या फंडातून १ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले होते. पण ठेकेदाराने जयभवानीनगर शिवाजी पुतळा चौकापासून श्रीराम अभ्यासिका बबनराव मैंद गल्लीनंबर ७ ते गल्ली नंबर ८ नारायन मुने यांचे घर ते गल्ली नंबर ९ व्ही. एस. कुबेर यांचे घर ते गल्ली नंबर १० आनंदा जाधव यांच्या घरापर्यंत नाल्याचे काम केलेच नाही. नाल्याचे काम पश्चिमेकडून पूर्वेकडे करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने जिथे जिथे मोकळी जागा असेल, तिथेच काम करून नंतर हातवर केले.
गल्ली नंबर ११ ते तिरुपतीनगर आणि जिजामाता काॅलनीच्या मधोमध नाल्याचे काम केलेच नाही. याठिकाणी नाल्याच्या काठोकाठ गाळ साचला आहे. शिवाय रहदारी पुलांचे काम देखील अर्धवट आहे. ज्या ठिकाणी पुलांचे काम केले तेथे सुरक्षाकठडे देखील बांधले नाहीत. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ते कोलमडून पडलेले आहे. शिवाय नाल्याच्या पृष्ठभागात केलेले काॅंक्रिटीकरण देखील उखडून त्याची माती झालेली आहे. नाल्यात सर्वत्र कचरा आणि घाण साचली आहे. विशेष म्हणजे नाल्याचे बांधकाम करताना काढलेला गाळ नाल्याच्या काठावर चार वर्षांपासून तसाच पडलेला आहे.
पाठपुराव्याला यश नाही
अनेक ठिकाणी नाल्यात पोकलॅन, जेसीबी जाऊ शकत नसल्याने ठेकेदाराला मनुष्यबळाचा वापर करून काम करावे लागेल, असे गृहीत धरून २० टक्के ज्यादा दराने या कामाचा ठेका दिला होता. त्याच दराने आजही त्यांच्याकडूनच हे काम करणे अपेक्षित आहे. चार वर्ष महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. पण प्रत्येक वेळी नवा ठेकेदार मिळाल्यावर काम करू असे उत्तर दिले जात आहे असा आरोप माजी नगरसेवक बालाजी मुंढे यांनी केला.