औरंगाबाद: कोट्यावधीचे गुळगुळीत रस्ते पण अनधिकृत वाहनतळांनी व्यापले

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील नवीन आणि जुन्या शहरासह गारखेडा टिव्हीसेंटर व अन्य वसाहतींना जोडणाऱ्या तसेच शहराची लाईफ लाइन असलेल्या जालना रस्त्याला समांतर असणाऱ्या चिस्तिया कॉलनी-सेंट्रल नाका-एमजीएम-सेव्हनहील या अत्यंत वर्दळीच्या रस्ता शोल्डरमध्येच वाहनांची पार्किंग केली जात असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. परिणामी या अरूंद रस्त्यातून मार्ग काढताना वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. तास् न तास कोंडी होत असल्याने औरंगाबादकरांचा श्वास गुदमरला आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी सिडको वाहतूक शाखेला येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Aurangabad
सरकारी वसाहतीत अवैध भाडेकरुमुळे PWDत खळबळ; भाडे घेते कोण?

खड्डेमय रस्ते ही ओळख पुसण्यासाठी रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने महापालिकेला भरघोस निधी दिला आहे. २०१४-१५ यावर्षी २४ कोटींचा निधी सरकारने महापालिकेला दिला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये १५२ कोटींचा निधी दिला आहे. त्यातून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली गेली आहेत. आत्तापर्यंत जवळपास शंभर ते दिडशे रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत, त्यात स्मार्ट सिटी प्रकल्पातून पुन्हा २० रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात पुन्हा महापालिकेने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात पालिका फंडातून दोनशे कोटींची रस्त्यांची कामे करण्याचे ठरवले आहे. रस्त्यांसाठीची टेंडर प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.

Aurangabad
नवी मुंबई मेट्रो टप्प्यात; 'या' बॅंकेमार्फत ५०० कोटींचा पतपुरवठा

गेल्या आठ वर्षांत शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. रस्तेदेखील गुळगुळीत झाले आहेत. मात्र, हे रस्ते अतिक्रमणमुक्त असावेत असा असा प्रयत्न पालिकेकडून कधी केला जात नाही. परिणिमी या गुळगुळीत रस्त्यांवरून वाहतूक सुसाट होण्याऐवजी रस्त्याच्या कडेला चारचाकी- दुचाकी वाहने पार्क करून ठेवण्यात येतात. यामुळे मोठे असलेले रस्ते निमूळते झाले आहेत. कोट्यावधी रूपये खर्च करून वाहतूकीची गती सुधारण्याऐवजी  मंदावली आहे. शहरातील चिश्तिया कॉलनी ते सेंट्रल नाका मार्गे सेव्हन हील या परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग करण्यात येते. एमजीएम विश्वविद्यालय चिश्तिया कॉलनी रोडच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेलाच वाहनांची पार्किंग करण्यात येते. या ठिकाणी शिक्षणाचे धडे घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्याची अनेक वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करण्यात येतात. तसेच एमजीएम प्रशासनाने मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लाऊन रस्ता हा पूर्ण गीळ॔कृत केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवाय चिस्तिया कॉलनी रोड ते सेंट्रल नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरही एका बाजूने चारचाकी वाहनांची लांब रांग असते. यामुळेही वाहनधारकांची मोठी अडचण होते.

Aurangabad
अखेर अदानींनी जिंकलं!; मुंबईतील 'ते' ५ हजार कोटींचे टेंडर खिशात

शहरातील गणेश कॉलनी, रोशनगेट, जाफरगेट भागात नव्यानेच रस्ता तयार करण्यात आला. या ठिकाणी रस्त्याच्या शेजारी जड वाहनांचे अनधिकृतरित्या वाहनतळच तयार करण्यात आले आहे. या शिवाय रोशनगेट, किराडपुरा, बायजीपुरा, प्रोझोन माॅल, भारतबाजार हा शहरातील दाटवस्ती तसेच व्यस्त वाहतुकीचा भाग असलेल्या या ठिकाणीही रस्त्याच्या कडेला चारचाकी तसेच दुचाकी वाहने उभी करण्यात येतात. अमरप्रीत ते शहानुरवाडी चौक, औरंगपुरा टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिडको-हडको, सेव्हनहील ते गजानन मंदिर ते जयभवानीचौक, कामगार चौक ते जळगाव टी पाॅईंट, जकात नाका ते हडको, मदानी चौक ते रोशनगेट, चंपाचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, सेव्हनहील ते जकातनाका, शरद टी पाॅईंट ते टिव्हीसेंटर लक्ष्मण चावडी ते सिल्लेखाना या रस्त्यावर मोठ्या संख्येने गॅरेज तसेच जुने फर्निचर विक्री करण्याची दुकाने आहेत, यांची वाहनेही सर्रास रस्त्यांवरच पार्क करण्यात येतात.शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने, लोडिंग रिक्षा, छोटा हत्ती आदी लोडिंगची वाहने उभी करण्यात येतात. वाहने पार्क करण्याच्या या पद्धतीमुळे या रस्त्यावर येणारे-जाणारे त्रस्त झाले आहेत. गुळगुळीत रस्त्यांच्या कडेला फुटपाथच्या जागी शहरभर अनधिकृत वाहनतळांनी जागा व्यापल्याने  दररोज लहान मोठे अपघात होत असतात. रस्त्यावर होत असलेल्या या बेकायदा पार्किंगला लगाम कोण घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिका तसेच वाहतूक विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे ही समस्या लवकर सोडवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी नरवडे यांनी केली आहे..

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com