संभाजीनगरातील 'या' रस्त्यावर 4 वर्षांत एकही खड्डा कसा नाही? काय आहे 'येरेकर पॅटर्न'चे रहस्य?

yerekar pattern
yerekar patternTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे नव्यानेच बांधलेल्या मुंबई - नागपूर या ७५० कोटीच्या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या, जागोजागी खड्डे पडलेत, तीच बाब पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक या रस्त्याची झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढावे लागले. पण, छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅम्ब्रीज ते सावंगी बायपास या रस्त्यावर मागील चार वर्षांत एकही खड्डा पडला नाही.  त्यामुळे शिंदे यांनी या खड्डेमुक्त रस्त्याचे हे खास रहस्य ठाऊक नसेल तर ठाऊक करून घ्यावे, ज्याने राज्यभरातील असे दर्जेदार रस्ते बांधकाम झाल्यास निश्चित राज्याच्या तिजोरीवर खड्डे दुरुस्तीचा ताण पडणार नाही!

yerekar pattern
Mumbai : सायन पुलावर लवकरच हातोडा! 50 कोटींचे बजेट; काय आहे कारण?

‘आज रस्ता तयार केल्यानंतर सायंकाळपर्यंत तो उखडला, महिन्याभरात, दोन महिन्यात, वर्षभरात उखडला, अशी टीकेची झोड उठवत बांधकाम विभाग व कंत्राटदाराला बदनाम केले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील केम्ब्रीज शाळा चिकलठाणा सावंगी वळण रस्त्याचे २५ सप्टेंबर २०२१ दरम्यान काम झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, तत्कालीन अधीक्षक अभियंता विवेक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी बांधलेल्या या डांबरी रस्त्यावर गत चार वर्षांत त्यावर एकही खड्डा पडला नाही.

सदर रस्त्याचा भूमिपूजन समारंभात उकिर्डे यांनी या रस्त्यावर दोष निवारण कालावधी आधी एकही खड्डा पडला तर आम्ही तो विनामूल्य दुरुस्त करून देऊ’, अशी गॅरंटीच माजी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिली होती. या गॅरंटी मागचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता रस्ता बांधणाऱ्या कंपनीला कुणाच्याही टक्केवारीच्या भानगडीत न पडण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम करताना कुठल्याही लोकप्रतिनिधी अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लूडबूड केली नाही. दुसरं म्हणजे, कोणत्याही कारणासाठी बांधकाम विभागाच्या परवानगी शिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी रस्ता खोदायचा नाही. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम निर्विघ्न पार पडले आणि शास्त्रीय पध्दतीने रस्त्याचे बांधकाम केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजवर या रस्त्याने अनेक पावसाळे खाल्ले पण रस्ता इतका मजबूत बांधला की त्यावर चार वर्षात खड्डेच पडले नाहीत. हाच तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका हद्दीतील केम्ब्रीज शाळा चिकलठाणा ते सावंगी बायपास रस्ता! अंतर सुमारे १३ किलोमीटर. या रस्त्यासाठी माजी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी १३ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता. या रस्त्यावरच महानगरपालिकेचा कचरा प्रकल्प असल्याने दररोज १५० टन कचऱ्याची वाहतूक याच रस्त्याने होते. शिवाय पूर्व मराठवाडा, विदर्भाकडून उत्तर व मध्यप्रदेशाकडे जाणारी अवजड वाहने अर्थात तीस ते चाळीस टन इतक्या वजणाची जड वाहने याच वळण रस्त्याने २४ तास धावतात. इतकी जड वाहतूक होत असताना देखील रस्ता कुठेही फुटला नाही.

सात वर्षांपूर्वी तीन वेळा शासनाने या रस्त्यासाठी निधी दिला. मात्र कधी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराचे बिल थकवले, तर कधी कंत्राटदाराने अर्धवट काम केले. त्यामुळे केंब्रिज ते सावंगी या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही भयंकर झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे, खडी आणि धूळ ही साडेसाती या रस्त्याच्या मागे कायम होती. खड्ड्याच्या ग्रहणातून रस्त्याची सुटका व्हावी म्हणून आसपासच्या ५० गावांचे ग्रामस्थ जंगजंग पछाडत होते. तरीही हे काम काही होत नव्हते. 

शहरात जड वाहतुकीला बंदी आल्यानंतर पर्याय म्हणून शासनाने सावंगी जंक्शन ते केंब्रिज चिकलठाणा नाका हा १३ किमी लांबीचा वळण रस्ता तयार केला.  देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे टाकली होती. काही वर्षांपूर्वी साबांच्या प्रादेशिक विभागाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली. १८ सप्टेंबर २००६ रोजी तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते रस्ता दुरुस्तीचा मुहूर्तही पार पडला होता.

यानंतर या कामाचा ठेका पुण्याचे प्रवीण कदम यांच्या इंडिकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आला होता.  त्यात जमिनीपासून रस्त्याची उंची वाढवणे, सुखना, सावंगी, नारेगाव नदीवर साखळी पूल उभारणे, रस्त्यांतील नाले, ओहळ यावर नळकांडी पूल तयार करणे आणि रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करणे इत्यादी कामांचा समावेश होता. मात्र, शासनाकडून वेळोवेळी निधीची पूर्तता न झाल्याने २००६ मध्ये सुरू झालेले हे काम तब्बल पाच वर्षे म्हणजे २०११ पर्यंत चालले. नाही म्हणायला कंत्राटदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे काही कामे पूर्ण केली. शासनाने पाऊण कोटी थकवल्याने केलेल्या कामाचा धूळखाना होऊ नये म्हणून ठेकेदाराने डांबराचा पहिला थातूरमातूर सडा शिंपून तो कायमचा पसार झाला. पुढे पाच वर्षे काम तसेच रखडले.

yerekar pattern
Toll Plaza : टोलनाक्यांवरील FASTag होणार हद्दपार; टोल वसुलीची नवी सिस्टीम कधीपासून?

५ कोटींची खैरात, काम अर्धवट

त्यानंतर पुढे पुन्हा या मार्गाच्या केंब्रिज ते पळशी पिसादेवी फाटा या पहिल्या टप्प्यातील  रस्ता सुधारण्याच्या कामासाठी ५ कोटी ९ लाख ३१ हजार १३३ रुपये निधी मंजूर झाला होता. २६ मे २०१५ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश छत्रपती संभाजीनगरातील ए. एस. कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला होता.

कामाची मुदत बारा महिन्यांची होती. खडीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरणासह साइड शोल्डरमध्ये मुरूम टाकणे आदी कामांचा त्यात समावेश होता. कंत्राटदाराने हा रस्ता गुळगुळीत केला, मात्र मार्गातील तीन साखळी पुलांवर थातूरमातूर काम करण्यात आले. त्यामुळे पुलावरील रस्ता काही दिवसांतच पूर्वीप्रमाणेच झाला आहे. नागरिकांनी ओरड करताच कंत्राटदाराने काम करायचे म्हणून दगडांचे ढिगारे उखडलेल्या पुलाच्या कठड्यालगतच ठेवले. मुदत संपून वर्ष उलटले तरीही कंत्राटदाराने दुतर्फा मुरूम टाकून साइड शोल्डर भरले नव्हते. दरम्यान ग्रामस्थांनी ओरड केल्यानंतर कंत्राटदाराला बांधकाम विभागाने विनंती करत काम करायला लावले होते. 

त्यानंतर दीड वर्षानेच रस्त्याच्या पळशी पिसादेवी चौक ते कोयठाणवाडी दरम्यान ३ कोटी ७४ लाख ४ हजार ६५१ रुपये निधी मंजूर केला होता. २९ नोव्हेंबर २०१६ रोजी हे काम मस्कट कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. मुदत १२ महिने असल्याने त्यांनी या रस्त्याचे खडीकरण आणि मजबूतीकरण केले, पण त्यावर डांबरीकरणाचे काम केलेच नाही. जे काम केले तेही अर्धवट आणि थातूरमातूर. पोखरी ते पिसादेवी, पळशी ते पिसादेवी या गावात जाणाऱ्या जोडरस्त्यांचे काम तसेच अर्धवट ठेवले, तर दुसरीकडे पोखरी ते सुखना नदी साखळी पूल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शोल्डरमध्ये मुरुमाचे ढिगारे आणून आणखी अडचण केली होती.

आधीच्या कंत्राटदाराने सावंगी ते केंब्रिज एकूण १३ किमीपैकी पहिल्या टप्प्यातील रस्ता गुळगुळीत केला होता. पळशीनाका ते पुढील दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे एका विशिष्ट लांबीपर्यंत मजबुतीकरण झाले होते.‌ यावर गावकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कंत्राटदाराने डांबरीकरण केले होते. आहे. त्यानंतर १ एप्रिल २०१६ दरम्यान पुढील २ किमी अंतराच्या रस्ता दुरुस्तीचे टेंडर काढुन एकंदरीत रखडलेल्या या रस्त्याचे संपूर्ण काम केले होते.

अशी या रस्त्याची एकत्रीत रखडकथा तर त्यानंतर कोरोना काळात  सर्वत्र प्रचंड पाऊस झाला. या पावसात या  रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. ५० पंचक्रोशीतील गावे आणि अनेक रांज्यांना जोडणारा हा प्रमुख वळण मार्गाची चाळण झाल्यावर बांधकाम विभागाकडे तक्रारी सुरू केल्या. अर्थात जागतीक बॅक प्रकल्पाने नेहमीप्रमाणे खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले. बऱ्याच चर्चेनंतर, रस्ते बनविणाऱ्या एका कंपनीला या १३  किलोमीटरचा रस्ता बनविण्याचे १३ कोटी ३० लाखांचे कंत्राट दिले गेले. तशी नोंद बांधकाम विभागाकडे आहे. २५ सप्टेंबर २१३१ ला रस्त्याचे रस्त्याचे काम, हस्तांतरण वगैरे पूर्ण झाले. २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीने या रस्त्याच्या मजबुतीची हमी घेतली होती. पण दोष निवारण कालावधीतील १२ महिने सोडाच, गेली ४ वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही! 

yerekar pattern
Tendernama IMPACT : अखेर 3 दशकांपासून साचलेल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

अर्थात, या मजबूत रस्त्याच्या बांधकामात सर्वसामान्य शेतकऱ्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची. त्यांनीही जबाबदारीचे भान ठेवले.‌ बांधकाम विभागाने देखील खोदकामासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळेच हा खड्डेमुक्त रस्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले. या संदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले की, याची कारणे रस्त्याच्या बांधणीत आहेत. रस्ता तयार करताना तो प्रथम खोदावा लागतो. तो किती खोलवर खोदायचा, त्यावर कोणत्या आकाराच्या खडीचे किती थर द्यायचे, कोणत्या क्रमाने द्यायचे याचे तंत्र आहे. त्या पद्धतीने काम केले तर रस्त्याची मजबुती कायम राहते. रस्ता, त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, वापर किती वेळ आणि कसा होतो यावर खोदाई, खडीकरण, त्यावर दबाव, मग डांबर, मग पुन्हा चर (अगदी बारीक खडी), मग खडीची जवळपास पांढरी पावडर याची गणिते केली जातात. टेंडरमध्ये तसे स्पष्ट नमूद केले जाते. या रस्त्याच्या संदर्भात या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन केले गेले. ठरवून ‘हॉटमिक्स’ पद्धत वापरून हा रस्ता तयार झाला, असे त्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com