औरंगाबाद (Aurangabad) : ग्राम विकास विभागाला एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने अर्थसहाय्य केले. कंत्राटदार नेमला, वर्क ऑर्डर दिली,आता हिरापूर ते वरुडकाझी रस्त्याचे काम मार्गी लागणार म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरीभाऊ बागडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झाले. मात्र कधी गौणखनिज मिळत नसल्याचे, तर कधी निधी मिळत नसल्याचे, तर कधी शेतकरी काम करू देत नसल्याचे कारण पुढे करत कंत्राटदाराने अर्धवट काम केले.
असा होत आहे परिणाम
अर्धवट कामामुळे हिरापूर ते वरुडकाझी या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही भयंकर झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, खडी आणि धूळ ही साडेसाती या रस्त्याच्या मागे कायम आहे. हे ग्रहण सुटावे म्हणून आसपासच्या ५० गावांचे ग्रामस्थ जंगजंग पछाडत आहेत. विशेष म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेले आमदार बागडे यांनी स्वतः गावकऱ्यांच्या आंदोलनाच्या आंदोलनात सहभाग घेत अधिकाऱ्यांना तंबी दिली, तरीही हे काम काही होईना. अधिकारी कंत्राटदाराच्या ताटाखालचे मांजर असल्याचे म्हणत आता बागडे देखील वैतागल्याचे दिसत आहेत.
औरंगाबाद शहराच्या पूर्वेला शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत ऑरिकसिटी आल्याने हिरापूरवाडी, वरूडकाझी व या गावाला लागून असणाऱ्या अनेक ग्रामस्थांना नौकरीची चांगली संधी चालून आली. येथील शेतकऱ्यांची मुले देखील कामगार, अधिकारी आणि काही उद्योजक बनले आणि येथील सर्व वाहनधारकांना पर्याय पर्याय म्हणून शासनाने हिरापूर ते वरूडकाझी हा ४१०० मी. लांबीचा थेट जालना रस्त्याला जोडणारा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला.
देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास मंडळांतर्गत मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यावर टाकण्यात आली. ग्राम विकास विभागाला एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने २ कोटी १२ लाखाची तरतूद केली. १९ मे २०२१ रोजी मे. मनिषा इन्फ्राकाॅन प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. १८ डिसेंबर २०२२ पर्यंत रस्ता बांधकामाची मुदत असताना अद्याप कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. याउलट गत आठवड्यात कंत्राटदाराने खडी आणून रस्त्यात डोंगर उभे केल्याने वाहनधारकांची कोंडी केली. यामुळे हिरापूरवाडी आणि वरूडकाझी येथील ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्याचे समजते.