औरंगाबाद (Aurangabad) : देशातील प्रत्येक खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत इमारतीवर आणि स्वतःच्या घरावर ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत, असे केंद्राचे आदेश आल्याने औरंगाबादकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्तात तिरंगा झेंडा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ई-टेंडर काढण्यात आले. यात पैठणच्या एका कंपनीला पाच लाख तिरंगी झेंडे बनवण्याचा ठेका देण्यात आल्याचे मुख्याधिकारी डाॅ. निलेश गटाने यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले. (Azadi ka amrut mahotsav)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान (Campaign) देशभरात राबविण्यात येणार आहे. याबाबत राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. निलेश गटणे यांनी सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा घेतला. त्यात औरंगाबादसह जिल्ह्याभरातील नागरिकांना स्वस्तात तिरंगी झेंडा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २० जुलै रोजी ई - टेंडर काढून तिरंगा झेंडे बनवण्यासाठी इच्छूक कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यात सहा कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. २६ जुलै रोजी टेंडर उघडण्यात आले होते. त्यात पैठणच्या अंकित इंडस्ट्रीजने सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी २९ रुपये हा सर्वांत कमी दर भरल्याने त्याला तब्बल पाच लाख तिरंगी झेंडे बनवण्याचा ठेका देण्यात आला.
यासंदर्भात गटणे म्हणाले की, शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने ‘हर घर झेंडा’ अमृत अभियानांतर्गत शहरात जास्तीत जास्त ध्वज लावण्याचे नियोजन आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तसेच सामुहिक व नागरिकांच्या स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातूनच महापालिकेला एक लाख झेंडे देणार असल्याचे ते म्हणाले.