छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्यानंतर एका बाजूने रिटेरींग वाॅल आणि बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर स्लॅब देखील टाकण्यात येत आहे. यानंतर १८ दिवस क्युरींग पिरेड राहणार आहे. रेल्वेच्या माणकानुसार काम देखील मजबुत करण्यात आले आहे. दुसर्याबाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बॅंक प्रकल्प शाखेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चरकडून भुयारी मार्गासाठी खोदकाम देखील केले आहे. रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी आणि रिटेरिंग वाॅलसाठी स्टिल बांधणी देखील सुरू केली आहे. मात्र हे सगळे होत असताना देवळाई चौक ते शिवाजीनगर शंभर मीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे मजीप्रा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचल्याने आता जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू केले आहे.
या कामामुळे रेल्वेने नुकत्याच केलेल्या बोगद्याला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी या भागात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारामार्फत युद्धपातळीवर काम सुरू केले असताना यापूर्वी कधी ड्रेनेज, तर कधी महावितरण कंपनीची केबल याचा अडथळा होता. त्यात आता मजीप्रा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भुयारी मार्गाच्या कामात खोळंबा होत आहे. अधिकाऱ्यांना बीड बायपासच्या कोंडीचा विचारच नाही. अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे भुयारी मार्गाचे काम रखडत असल्यामूळे बीड बायपास, संग्रामनगर उड्डाणपूलावर वाहतूक खोळंबण्याचा प्रश्न कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले; मात्र या भुयारी मार्गाच्या कामात महापालिकेची ड्रेनेजलाइन आणि महावितरण कंपनीची हायटेंशन केबल यामुळे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाची चांगलीच कोंडी केली. यात महावितरण कंपनीने केबल काढण्यास तर दुसरीकडे मलनिःसारण वाहिनी हटविण्यात महापालिकेने विलंब केला. सुरूवातीलाच शिवाजीनगर रेल्वे फाटकाच्या लगत रस्त्याच्या मधोमध खोदकाम करताना भाग्योदय कासलीवाल वसाहतीच्या बिल्डरने ड्रेनेजलाईन टाकली. त्यात बोगद्यासाठी खोदकाम करताना फुटलेली ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हात वर केले.ड्रेनेजलाईन रेल्वेला स्थलांतरित करावी लागली. याकामात दोन महिने गेले. आता काम प्रगतीपथावर असताना मजीप्राने भुयारी मार्गाच्या कामात जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू करून कोंडी केली आहे.
परिणामी भुयारी मार्गाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता असल्याने भुयारी मार्गाच्या कामात विलंब होत आहे. त्यातून पावसाळा लागला तर भविष्यात भुयारी मार्गाच्या कामात अडचणच ठरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे आधीच भुयारी मार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी मजीप्राने विचार करून जलवाहिनी टाकण्याचे काम करायला हवे होते. यासर्व अडचणी कमी म्हणून की, काय येथील व्यापार्यांनी चौकाचे कारण पुढे करत काम बंद पाडल्याने रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कोंडी केली. शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली. या भुयारी मार्गाच्या कामाला वर्षभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्याचे कामही युध्दपातळीवर सुरू झाले आहे. सातारा-देवळाई, सिंदोन-भिंदोन, बाळापूरसह लगतच्या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे; परंतु हा भुयारी मार्ग येथील मजीप्रा, महावितरण, महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे विलंब होत असल्याने भविष्यात तो किती दिवसात बांधला जाईल ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम खोळंबल्यास पावसाळ्यात काम कसे होणार? वाहनांचा भार बीड बायपास व संग्रामनगर उड्डाणपुलावर किती दिवस राहील ? वाहतूक कोंडी अशीच राहणार काय ? असे अनेक प्रश्न सातारा - देवळाई व बीड बायपाससह आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पडत आहेत.