छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाई या दोन वॉर्डांसाठी २३१ कोटी खर्चाच्या ड्रेनेज प्रकल्पासाठी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ई-टेंडर प्रसिद्ध केले. टेंडर भरण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना ८ जून ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अमृत २.० अंतर्गत योजना राबवली जाणार आहे. यात केंद्र सरकारचे २५ टक्के प्रमाणे ६९ कोटी ९२ लाख रूपये अनुदान मिळणार आहे. तसेच राज्य सरकारचे ४५ टक्के म्हणजेच १२४ कोटी ०६ लाख रूपये अनुदान मिळणार आहे. यासाठी महापालिकेला ३० टक्के प्रमाणे ८२.७० टक्के अनुदान मिळणार आहे. याप्रमाणे सातारा-देवळाईतील या प्रकल्पावर एकूण २३१ कोटी २५ लाख ५९ हजार ८११ रूपयाचे टेंडर काॅस्ट ठरविण्यात आली आहे.
गेल्या आठ वर्षापूर्वी सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाला. त्यानंतर या भागातील आमदार संजय सिरसाट यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून ड्रेनेजचा प्रकल्प केंद्र शासनाच्या अमृत-२ याेजनेतून मंजूर करून घेतला. त्यांच्या पाठपुराव्यानेच राज्य सरकारने या प्रकल्पाचा समावेश केंद्राच्या अमृत-२ याेजनेतून त्याला काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर नवीन पाणी पुरवठा योजना ही आधी सातारा देवळाईतून सुरू होईल. त्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द देखील पाळला. या योजनेत एकुन ९ जलकुंभ असून त्यापैकी ७ टाक्यांचे काम प्रगतीपथावर आहे. सातारा-देवळाई या दोन वॉर्डात नवीन पाणीपुरवठा योजनेतून अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश होण्याआधी हा भाग सिडकोच्या झालर क्षेत्राच्या अखत्यारित होता. सिडकोने याभागातून कोट्यावधीचा महसुल जमा केला होता. हा महसुल महापालिकेला इतरत्र वळवू न देता त्यांनी साडेआठ कोटीच्या निधीतून नाईकनगर, छत्रपतीनगर, कमलनयन बजाज रूग्णालय ते सुधाकरनगर, बीड बायपास ते प्रविण कुलकर्णी यांचे घर व अन्य रस्त्यांची कामे उरकुन घेतली होती. त्यातुन चिखलातून वाट काढणाऱ्या सातारा-देवळाईकरांना दिलासा दिला होता. याशिवाय तब्बल ५० कोटी खर्च करून आ. संजय सिरसाट यांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून सातारा-देवळाई भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे जाळे निर्माण केले आहे.
जवळपास ३०० कोटीतून राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग समजल्या जाणाऱ्या बीड बायपासचा देखील कायापालट होत आहे. यातील 'टेंडरनामा'ने काढलेल्या चुकांची दुरूस्तीचे आदेश देखील त्यांनी जागतिक बँक प्रकल्प शाखेला दिले आहेत. तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या भागात काही मुख्य रस्त्यांचे काम स्मार्ट सिटी योजनेतून केले जात आहे. आता ड्रेनेजलाइन आणि पाइप लाइनचे काम झाल्यावर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नगरविकास विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ७५ कोटी निधीतून रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या भागात ड्रेनेजलाइन नसल्यामुळे नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडले आहे, तर काही जणांनी शोषखड्डे खोदले आहेत. या भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी आ. संजय सिरसाट यांच्या प्रयत्नाने निधी मंजुर होताच शहरातील प्रसिद्ध प्रकल्प सल्लागार समीर देशपांडे यांच्या यश इनोव्हेशन सोल्युशन या समितीमार्फत महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला. त्यांनी सातारा-देवळाईसाठी २५४ कोटींचा ड्रेनेजचा प्रकल्प आराखडा तयार करून महापालिकेला सादर केला होता. तद्नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता त्यावर घेण्यात आली होती.
महापालिकेने आ. संजय सिरसाट यांच्या पाठपुराव्याने ड्रेनेज प्रकल्पाचे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीसमोर सादरीकरण केले. मात्र निधी अभावी प्रकल्प रखडला होता. यादरम्यान सिरसाट यांनी शिंदे सरकारकडे पाठपुरावा करत हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत-२ या योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले. केंद्र सरकारमार्फत त्याला २५ टक्के अनुदान देखील मिळवले. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचे देखील ४५ टक्के अनुदान मिळवले. त्याच बरोबर महापालिकेकडे देखील उर्वरीत ३० टक्के अनुदानाचीश चालु बजेट मध्ये तरतुद करून घेतली. त्यानुसार आता हे काम केंद्र व राज्य सरकार व महालिकेच्या जाॅईंट निधीतून अमृत-२ योजनेतून मार्गी लागत आहे.
● २०२२-२३ ते २०२३-२४च्या बजेटमध्ये संजय सिरसाट यांनी खंडोबा मंदिरासाठी ५६ कोटीचा निधी मंजुर केला आहे. त्यापैकी साडेआठ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे टेंडर निघुन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम देखील सुरू केले आहे.
● बीड बायपास ते देवळाई छत्रपती संभाजीनगर ते फैठण या दोन तालुक्यांना जोडणार्या देवळाई ते कचनेर रस्त्याच्या काॅक्रीट व डांबरी रस्त्यासाठी आ. संजय सिरसाट यांनी राज्य सरकारकडून १७ कोटी रूपये मंजुर केले आहेत. गेल्याच महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यात चार मोठे ठेकेदार इच्छुक आहेत. पुढील महिन्यात येरेकर पॅटर्नने या रस्त्याचे भाग्य देखील उजळणार आहे.
● देवळाईतील स्मशानभुमी आणि कब्रस्तानचा देखील कायापालट सुरू आहे.
● 'टेंडरनामा'च्या वृत्ताची दखल घेत आ.शिरसाट यांनी साताऱ्यातील अहिल्याबाई होळकर स्मषानभुमीतील आरसीसी सुरक्षाभिंत आणि रस्त्याचे बांधकाम केले. नागरिकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली आहे. आता या भागातील मुले स्मशानात अभ्यासाला येतील अशा पध्दतीने सुशोभिकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आणि भारतीय वंशाची झाडे लाऊन तेथे ऑक्सीजन हब तयार केले जाणार आहेत. सदर कामासाठी राज्य सरकारकडून त्यांनी एक कोटीचा निधी देखील मंजुर केला आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
ही कामे सुरू आहेत
● संभाजीचौकात २५ लाखाचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा येथील नागरिक आनंद घेत आहेत.
● हायकोर्ट काॅलनीत तब्बल दहा हजार चौरस फुट जागेत अहिल्राबाई होळकर स्मारक आणि उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे.यासाठी जवळपास २० लाख रूपये खर्च होत आहेत.
● दिपनगर भागात २५ हजार चौरस फुट जागेवर हिंदु ह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाची टेंडर प्रक्रीया सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून यासाठी वीस लाखाचे बजेट ठेवण्यात आले आहे.
● मीनाताई ठाकरेनगरातील १५ हजार चौरस फुट जागेवर धर्मवीर आनंद दिघे स्मारक आणि उद्यानाचे काम प्रस्तावित आहे.
● देवळाई म्हाडा काॅलनी येथील हनुमान मंदिर परिसरात आरसीसी सुरक्षा भिंत आणि आणि सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
● नारायननगरात राजमाता जिजाउ उद्यान प्रस्तावित आहे.
● छत्रपती क्रीडा संकुल छत्रपतीनगरात जाॅगिंग ट्रॅक आणि सुशोभिकरणाचे काम प्रस्तावित आहे.
● रेणूकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक, सातारा गावठाण ते भारत बटालियन, बजाज रूग्णालय ते आमेरनगर ते शनीमंदिर, बेंबडे हाॅस्पीटल ते विद्यानगर आदी भागात स्मार्ट सिटी प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून एलईडी दिवे लावल्याने परिसर उजळला आहे.
● महापालिकेला यंत्रणेला जागे करत पावसाळ्यापंलूवीच त्यांनी सातारा - देवळाई भागातील नालेसफाईला सुरूवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
काय म्हणाले संजय सिरसाट
मी एकाच ओळीत सांगतो सातारा - देवळाई भागात मी मागील दोन वर्षात जो विकास केला आहे. तो माझ्यामते असमाधानकारक आहे. हे काहीच नाही, अजुन खुप काही कायापालट मी करणार आहे. परिसरात पर्यटकांची गर्दी वाढेल, इतका सुंदर भाग मी करणार आहे. आज आपल्याशी बोलताना काही गोष्टी खुल्या करणार नाही..येत्या दोन वर्षात साताऱ्यातील कठेपठार आणि देवळाईतील साई टेकडी परिसर आणि या मार्गावरील वनोद्यानासाठी ५० कोटी रूपयाचा प्रस्ताव मी राज्य सरकारकडे सादर केलेला आहे. याशिवाय भारत बटालियन तसेच सिंदोन - भिंदोन, वाल्मी, गांधेलीतील निजामकालीन बाग तलाव आणि बाळापुर तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि पर्यटकांसाठी खास चौपाटीचे नियोजन आहे. येत्या दोन वर्षात भारतातील कानाकोपर्यातील पर्यटक याभागात येतील इतके सुंदर शहर मी इकडे करणार आहे.