छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा (Garkheda) भागातील कारगील मैदान ते मयूर टेरेस हा भाग टूमदार बंगले अन् गगनचुंबी इमारतींनी गजबजलेला आहे. मात्र गत ३० वर्षांपासून या वसाहतींना जोडणाऱ्या कालिका माता मंदीर ते कारगील मैदान ते मयूर टेरेसकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. या भागात मोठे सरकारी अधिकारी, नामांकित विधीज्ञ, उद्योगपती, व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र अद्याप या भागात रस्ते, पाणी, वीज आणि पथदिव्यांच्या पुरेशा सोयी नाहीत.
दुसरीकडे, भारतनगर ते दुर्गा हाउसिंग सोसायटी ते शिवाजीनगर जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम देखील रखडले असल्याने त्रासात मोठी भर पडली आहे. या वसाहतींसाठी कालिकामाता मंदिर ते कारगील मैदान या तीनशे मीटर रस्त्यासाठी दोन वर्षांपूर्वी सव्वाकोटीचा निधी स्मार्ट सिटी प्रकल्पातून मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही रस्ता झालेला नाही. या रस्त्याचे टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाली पण एकाच ठेकेदाराला अनेक रस्त्यांचे काम दिल्याने त्याची तोकडी यंत्रणा कमी पडत असल्याची चर्चा आहे.
मयूर टेरेस ते कारगील मैदान ते कालिकामाता मंदिर या रस्त्याचे काम यापूर्वी कधीच झाले नाही. पावसाळ्यात रस्त्याचा चिखलदरा झालेला आहे. रस्त्याच्या शेजारीच मोठे कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. आधीच खड्डेमय आणि चिखलातून वाहन काढताना नागरिक नाकीनऊ आलेले आहेत. त्यात येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील उष्टावळीवर ताव मारणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या वेगळ्याच समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनही मार्ग काढत दिवसा लोक कशीबशी वाटचाल करतात. मात्र यामार्गावर एकही पथदिवा नसल्याने रात्रीच्या वेळी कामकाजानिमित्त बाहेर पडणाऱ्या व रात्री अपरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडते.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ३१७ कोटीतून १११ रस्ते तयार होत आहेत. १५ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या ए.जी. कंन्सट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. रस्ते कामाची मुदत ९ महिन्याची असताना दोन वर्ष उलटली. मात्र ५० टक्केही रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली नाहीत. या रस्त्यासह शहरातील बहुतांश भागातील रस्ते रखडलेले आहेत. काही रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत. त्यात आता निकृष्ट रस्त्यांची दुरूस्ती सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना पून्हा मनस्ताप सोसावा लागत आहेत. तेथे दळणवळणासाठी पर्यायी रस्तेच नसल्याने नागरिक आगीतून फुफाट्यात पडली आहेत.