छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरास मोठा इतिहास आहे. कधी काळी शहराच्या संरक्षणासाठी चहुबाजूने भक्कम तटबंदी आणि प्रवेशासाठी ५२ दरवाजे होते. या भक्कम दरवाजांवरूनच शहराची विशेष ओळख होती. आज तटबंदी नामशेष झाली असून, काही दरवाजे शिल्लक आहेत. त्यातील काही दरवाजांच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल साडेतीन कोटीचा चुना लावल्याचे टेंडरनामाच्या तपासात उघड झाले आहे. इतके कोटी खर्च करूनही येथील दरवाजाची मोठ्या प्रमाणावर पडझड होताना दिसत आहे.
मोगल शासन काळात शहराभोवती असणारी तटबंदी आणि दरवाजांची देखभाल ठेवली जायची. यामुळेच सुमारे ४०० वर्षांनंतरही दिल्ली गेट, रंगीन दरवाजा, भडकल गेट, रोशन गेट, कटकट गेट, पैठण गेट, बारापुल्ला गेट, काला दरवाजा, नौबत दरवाजा, जाफरगेट, खिलजी दरवाजा असे काही मोजके दरवाजे आजही सुस्थितीत आहेत. मकई गेट, दिल्ली गेट व भडकल गेटच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. इतर दरवाजांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र महापालिकेने निधी नसल्याचे कारण पुढे करत . काही वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे दरवाजांची पडझड झाली आहे. ऐतिहासिक दरवाजांचा हा वारसा जपण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. मोडकळीस आलेल्या दरवाजांची तत्काळ दुरुस्ती करावी, दरवर्षी पावसाळ्यात या दरवाजांची पडझड होते. दरवाजातील दगड कोसळत असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका होऊ शकतो म्हणून यासंदर्भात शहरातील काही इतिहासप्रेमींनी महानगरपालिकेकडे गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत सर्वच गेटच्या दुरुस्तीची मागणी केली होती.परंतु निधीअभावी दरवाजांचे काम करण्याकडे महापालिकेच्या कारभार-यांचे दुर्लक्ष होत गेले.त्यामुळे तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सध्या अस्तित्वात असलेल्यांपैकी नऊ दरवाजांचे सुशोभीकरण स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय घेतला होता.
एप्रिल २०२१ पर्यंत या दरवाजांना झळाळी मिळणार, पर्यटकांसाठी हे दरवाजे आकर्षणाचे केंद्र ठरणार, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक शहरात येतात. यातील काहीजण वेरूळ लेण्यांसह शहरातील बिबी-का मकबरा, पाणचक्की पाहून परतात. त्यांना ऐतिहासिक दरवाजांसह शहरातील इतर पर्यटनस्थळांपर्यंत कसे नेता येईल, यासाठी पाण्डेय यांनी प्रयत्न सुरू केले होते.यात त्यांनी पडझड झालेल्या काही ऐतिहासिक दरवाजांपैकी ९ दरवाजांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार ९ दरवाजांच्या दुरूस्तीसह सौंदर्यीकरणासाठी टेंडर काढण्यात आले होते.पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या टेंडरकडे कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. कंत्राटदारांनी पाठ फिरवली म्हणून ही कामे स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय पांण्डेय यांनी घेतला. दरम्यान नव्याने काढण्यात आलेल्या टेंडरलाही लॉकडाउनचा फटका बसला. अखेर लाॅकडाउन संपल्यावर काही दिवसांनी या विकासकामांना सुरुवात करण्यात आली होती.यासाठी शहरातील एका प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. आणि एप्रिल २०२१ पर्यंत ही कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना ताकीद देण्यात आली होती.
यात दरवाजांवर वाढलेले गवत, झाडे-झुडपे काढणे, परिसरातील अतिक्रमणे हटविणे, पडझड झालेल्या भागाचे बांधकाम करणे, जुन्या पद्धतीचे रूप देणे, रंगरंगोटी, प्रकाशयोजना अशी कामे यात केली गेली, असा दावा स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, ही कामे पूर्ण झाल्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने शहरातील या ऐतिहासिक दरवाजांची पाहणी केली असता बारापुल्ला गेट परिसरातील सुशोभीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. दोन वर्षांपूर्वीच दुरुस्ती केलेल्या सर्वच दरवाजावर वड, पिंपळ, औदुंबरची झाडे तसेच गवत उगवल्याने दरवाजांची पड़झड होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे पावसा्चे प्रमाण कमी असताना जुन्या पद्धतीचा लुक देणारा चुणा आणि रंगरंगोटी दिसेनाशी झाली असून दरवाजे रंगहिन झालेले आहेत. गतवर्षीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याले महेमुद दरवाज्या लिपापोतीवर अवकाळी पावसाचे पाणी झिरपत असून दरवाज्याच्या छतावर झाडे उगवलेली दिसत आहेत. नव्यानेच केलेली लिपापोती उखडल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सर्वच दरवाजांभोवती चहा-नाश्ता विक्रेते व वाहनांचे अतिक्रमणे जैसे थे दिसून येत आहेत. एकीकडे असा अनुभव असताना दोन वर्षांपूर्वी ज्या कटकटगेटसाठी ५० लाखाचा चुना लावला गेला.त्याचेही सुशोभीकरणाचे काम अर्धवट असताना विद्यमान प्रशासक जी.श्रीकांत यांनी पुन्हा याच गेटचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृत महोत्सवानिमित सरकारी अनुदानातून मिळालेल्या निधीतून जाहीर कसा केलाय, हा संशोधनाचा विषय आहे.
यापूर्वी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. विनायक निपुण यांच्या काळात महापालिकेच्या निधीतून रंगीन दरवाजा, रोशनगेट, हत्ती दरवाजा, पैठणगेट या दरवाजांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. त्यांची देखील हीच अवस्था झाल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे.एकूणच जनतेच्या पैशातून झालेल्या कोट्यवधी रूपयांचे पार वाटोळे झाल्याचे दिसून येत आहे.
कामांवर एकुण झालेला खर्च
- तीन कोटी २० लाख ५४ हजार
सविस्तर तपशिल असा
- बारापुल्ला गेट - ७३ लाख ५० हजार,
- रोषणगेट- ३१ लाख ४१ हजार
- कटकटगेट ४९ लाख २२ हजार
- पैठणगेट २४ लाख ८५ हजार
- नौबत गेट १७ लाख १९ हजार
- महेमूद गेट ५६ लाख ३१ हजार
- जाफरगेट १७ लाख
- काळा दरवाजा ३५ लाख ५४ हजार
- खिलजी दरवाजा १५ लाख ४८ हजार