छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना रोडवरील कॅम्ब्रीज चौकात राजमाता जिजाऊ स्मारक आणि वाहतूक बेटांच्या सौंदर्यीकरणासाठी पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकारातून तब्बल पाच कोटी रूपयांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पान्डेय यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यान्वित करण्यात आले आहे. या कामाचे ई-टेंडर काढण्यात आले असून, छत्रपती संभाजीनगरातील एस. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन टक्के कमी दराने हे काम देण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर शहराचे नाक समजल्या जाणाऱ्या कॅम्ब्रीज चौकाचा कायापालट होऊन चौकाचा लुक कसा बदलेल याचे संकल्पचिंत्रच टेंडरनामाच्या हाती लागले आहे.
सांस्कृतिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या तीस किलोमीटर अंतरावरील वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची या गावात मोठी गढी आहे.आजही शहाजीराजे भोसले शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष या गावात पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गाकडूनच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे दोन्ही मार्गाचा केंद्रबिंदू कॅम्ब्रीज चौक आहे. सिंदखेडराजा गावात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे बघण्यासाठी पर्यटकांना याच मार्गाने जावे लागते.त्यामुळे छत्रपती संभाजीनगरालगत वेरूळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या दोन्ही ऐतिहासिक गावाकडे जाताना लागणारा कॅम्ब्रीज चौक हे छत्रपती संभाजीनगर शहराचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते.
सावंगी बायपास ते झाल्टा फाटा व छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्ग या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले वाहतूक बेट गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होते. मुळात टोलनाक्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची माया जमावणार्या कंत्राटदाराने गत सतरा वर्षांच्या काळात वाहतूक बेटांची निगा ठेवली नाही. सुशोभीकरण केले नाही. चौकात सिग्नल आणि दिवे देखील लावले नाहीत. अपघातासाठी कुख्यात आणि ब्लॅकस्पाॅट समजल्या जाणाऱ्या कॅम्ब्रीज चौकाचा कायापालट व्हावा यासाठी फुलंब्री मतदार संघाचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील म्हणावे तितके लक्ष घातले नाही. यासंदर्भात चिकलठाणा येथील नागरिकांनी पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे याच मार्गावरील वेरूळ हे जिजाऊचे सासर आणि सिंदखेडराजा हे माहेर अशा या ऐतिहासिक गावांचे दाखले देत कॅम्ब्रीज चौकात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक व वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर हा संपूर्ण परिसर सुशोभिकरण करण्यासाठी व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनामार्फत प्रस्ताव तयार केला. त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सोयीसुविधांचा विकासासाठी विशेष तरतूद (लेखाशिर्ष 4217 0541सन 2022-23) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत या भव्यदिव्य स्मारकासाठी पाच कोटींचा निधी मंजुर केला. यात शंभर टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांन्डेय यांनी 15 जुन 2023 रोजी या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर विकासकामांकरिता कार्यान्वित यंत्रणा म्हणून शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपवली आहे.
पाच वर्षांपासून सुरू होता आमदारांचा पाठपुरावा
कॅम्ब्रीज चौकातील राजमाता जिजाऊ स्मारक आणि वाहतूक बेटांचे सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाईसाठी आमदार संजय शिरसाट यांचा पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यांनी याकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार कोटी 99 लाख 99 हजार 951 रूपयांचा प्रस्ताव सर्वसाधारण तांत्रिक मान्यतेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनामार्फत नगर विकास विभागाकडे पाठवला होता. जिल्हास्तरीय समितीने देखील 12 डिसेंबर 2017 रोजी प्रस्तावाची छाननी करून प्रस्तावास जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय मान्यता मंजूर करणेस्तव शिफारस केली होती. मात्र मधल्या काळात कोरोनासारखी महामारी त्यात राज्यात अस्थीर सरकार यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. अखेर शिरसाट यांच्या प्रयत्नांना यश आले असून या कामास निधी दिल्याबद्दल चिकलठाणा येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान चौकात तिन्ही वाहतुक बेटांचे सौंदर्यीकरण. चारही बाजूंनी हायमास्ट. राजमाता जिजाऊ या नावाने भव्यदिव्य कमान, कमानीखाली राजमाता जिजाऊ यांचे स्मारक चिकलठाणा ते कॅम्ब्रीज चौक दुभाजकाची उंची वाढविणे त्यात रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करणे व विद्युत रोषणाई आदी कामांनी कॅम्ब्रीज चौकातील नुर पालटणार आहे. हे काम गत आठवड्यापासून सुरू झाले आहे. ते पूर्ण होताच या भागाचे राजमाता जिजाऊ स्मारकात रूपांतर होणार आहे.