छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अखेर शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक - ५५ येथील रस्त्याच्या मधोमध महानगरपालिकेची ड्रेनेजलाईन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बॅंक प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला आखून दिलेली चुकीची सेंट्रललाईन यावर सामंजसपणे तोडगा काढण्यात आल्याने आजपासून (ता. ३१) ऑक्टोबरपासून भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे.
मार्च अखेर रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होईल, अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर जागतिक बॅंक प्रकल्पाकडे वाणी मंगल कार्यालय ते देवळाईचौकापर्यंत जोड रस्त्यांची जबाबदारी आहे. रेल्वेच्या हद्दीतील काम हैद्राबादच्या नृरसिंहा कन्सट्रक्शन कंपनीला दिले आहे रेल्वे हद्दीतील भुयारी मार्गासाठी दहा कोटीचा बजेट असून उर्वरीत ३० कोटीतून जोड रस्त्यांसाठी जीएनआय कन्सट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांना कार्यारंभ आदेश दिला नसल्याचे एका विश्वसनीय सुत्राकडून कळाले.
गेल्या दोन दशकापासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या बांधकामाला मंगळवारी (ता. ३१) ऑक्टोबरपासून मुहूर्त लागला आहे. दरम्यान शिवाजीनगर ते देवळाईचौक पूर्वेला असलेल्या कासलीवाल भाग्योद्य या गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाने आठ इंच व्यासाची ड्रेनेजलाईन पूर्वेकडून पश्चिमेकडे शिवाजीनगर रेल्वे रूळाच्या पुला खालून जोडल्याने रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाईनचा अडथळा येत होता. त्यातच रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमध्ये भुयारी मार्गासाठी सेंट्रललाईन बाबत संभ्रम निर्माण झाला होता.
अखेर रेल्वे, जागतिक बॅंक प्रकल्प शाखा आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी सामंजस्यपणे तोडगा काढला. ड्रेनेजलाईन स्थलांतरीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने होकार दिला. महानगरपालिकेने आवश्यक असलेले पाईप तातडीने उपलब्ध करून दिले. तसेच रेल्वेच्या नियमानुसार भुयारी मार्ग आणि जोड रस्त्यासाठी सेंट्रललाईन काढण्याबाबत जागतिक बॅंक प्रकल्प शाखा आणि रेल्वे प्रशासनात सामंजसपणे तोडगा निघाल्याने मंगळवारीच रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू केले असून, येत्या मार्च अखेर रेल्वेच्या हद्दीतील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करणार, अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम व्हावे यासाठी सातारा - देवळाई भागातील नागरिकांचा लढा सुरू होता. सातारा - देवळाई आणि बीडबायपास हा परिसर पैठण जंक्शन ते झाल्टाफाटा बाळापुर, गांधेली, सुंदरवाडी ते विटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी पर्यंत गतीने वाढला. गत तीन दशकात याभागाची लोकसंख्या दोन ते अडीच लाखापर्यंत पोहोचली. याशिवाय आसपासच्या शेकडो पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, भाजीपाला व दूध विक्रेते तसेच याभागातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी रेल्वेस्टेशन उड्डाणपूल, संग्रामनगर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
बीडबायपास ते एमआयटी ते फुलेनगर या छत्रपती संभाजीनगर ते सातारारोड दरम्यान रेल्वे गेट क्रमांक - ५३ येथील मिलिंदनगर रेल्वेफाटक व खड्डेमय रस्ता, बीड बायबायपास ते बाळापूर ते मुकुंदवाडी दरम्यानही रेल्वेगेट क्रमांक ५६ येथील बाळापूर रेल्वे फाटक व कच्चा मातीचा खड्डेमय रस्ता त्याचप्रमाणे शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक -५५ येथेही रेल्वे फाटक असल्याने या ठिकाणी रेल्वे गेट ओलांडून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
रेल्वे आल्यानंतर गेट बंद झाल्यावर येथे तास तास वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. दरम्यान नोकरदार वर्ग, विद्यार्थी, कामगार व रुग्णांचे मोठे हाल होत असत. अनेकांचे बळी घेतलेल्या शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक - ५५ येथे उल्लेखीत संघटनांनी गत दोन दशकापासून भुयारी मार्गाची वारंवार मागणी केली होती. यासंदर्भात रस्त्यांची याचिका दाखल करणारे ॲड. रुपेश जैस्वाल यांनी देखील राज्य शासन, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पार्टीकरत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर गत पाच वर्षांपासून सुनावण्या सुरू होत्या.
अखेर न्यायालयाचे ताशेरे व नागरिकांचा रोष पाहून शेवटी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वितरीत केला. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भूसंपादन विभागाला शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले. जागेचे मुल्यांकन करून जागामालकांना मोबदला देऊन जागाही रिकाम्या केल्या. जागेचा ताबा रेल्वे प्रशासनाला दिला. राज्य सरकारने भुयारी मार्गातील रस्ते कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे टाकली. रेल्वे ट्रॅक अंतर्गत कामाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली. दरम्यान मंगळवारी भुयारी मार्गातील अनेक अडथळे पार करत अखेर हे काम सुरू करण्यात आले.