औरंगाबाद (Aurangabad) : दोन हजार कोटींच्या सीएनजी प्रकल्पाला झाल्टाफाटा बीड बायपास रोडलगत एका व्यक्तीने पाईप लाईन टाकण्यास विरोध केल्याने गेल्या दोन महिन्यांपासून काम थांबले आहे. सदर शेतकऱ्यांविरूद्ध सीएनजीचे प्रकल्प व्यवस्थापक तसेच पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा पोलिसात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात याप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा असताना सदर व्यक्तीच्या त्रासाने सीएनजीच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काय आहे नेमके प्रकरण
देशातील इतर शहरांप्रमाणे औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध व्हावा तसेच नैसर्गिक गॅस हा लिक्विफाईड गॅसपेक्षा स्वस्त व सुरक्षित आहे. या गॅसची किंमत इतर गॅस कंपन्यांपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी आहे. सर्वसामान्यांचा या प्रकल्पामुळे आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने केंद्रीय अर्थमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या प्रयत्नाने भारत गॅस रिसोर्सेस कंपनीमार्फत सीएनजी प्रकल्पांतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम ९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान सुरू करण्यात आले. अहमदनगर ते वाळुज-गोलवाडी-औरंगाबाद बाहेरील बाह्य वळण रस्ता अर्थात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत १३.१५० कि.मी. तसेच झाल्टा वळण मार्गावर २.८५० कि.मी तसेच राष्ट्रीय महामार्ग ७५३ (आय) १२.२०० मीटर अशा एकुण २२ किमी लांबीत रस्त्याच्या मध्यापासून राष्ट्रीय महामार्गालगत व राज्यमार्गालगत १५ मीटर अंतरावरून व १.२० मीटर खोलीत अहमदनगरच्या मे. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड कंपनीला सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत मुख्य अभियंत्यांच्या आदेशाने एका सहाय्यक मुख्य अभियंत्याने परवानगी दिली. यासाठी रस्ता दुरूस्ती शुल्क म्हणून संबंधित कंपनीने दिनांक १६ जुन २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत तब्बल एक कोटी ७८ हजार ६३ रूपये भरले. नियमानुसार काम सुरू केले.
विशेष म्हणजे कंपनीने पाईप लाईन टाकण्यापूर्वी डी. पी. असोसिएट कन्सल्टंट या संस्थेची नियुक्ती करत ही औरंगाबाद मनपा, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास व औद्योगिक महामंडळ यासह इतर सर्व विभागांचे परवाने या पाईपलाईनच्या कामासाठी मिळवले त्यानंतर कंपनीने अहमदनगर ते वाळूजमार्गे औरंगाबाद शहरासह शेंद्रा डीएमआयसीपर्यंत दोन हजार कोटींतून सीएनजी वाहिनी टाकण्यासाठी भारत पेट्रोलियम नैसर्गिक वायू रिसोर्स कंपनीमार्फत काम सुरू केले. संबंधित कंत्राटदाराने हा संपूर्म १७५ किमी अंतरावरून २४ इंची स्टील पाईपद्वारे औरंगाबादेत गॅस पाईपलाईन उपलब्ध करून दिली आहे. याबरोबर सीएनजी १०६ इंधन पंप्सचे देखील काम अंतिम टप्प्यात आले आहे, कंपनीमुळे औरंगाबादेतील सात लाखांच्या आसपास घरगुती गॅस जोडण्या देण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात १२५ ते २० मिमी व्यास जाडीच्या पाईपलाईन टाकण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. काही भागातील घरापर्यंत गॅस पुरवठा करून मीटर रीडिंगनुसार बिल आकारण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
कुणाचाही आक्षेप नाही...
कंपनीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परवानगीने रितसर काम सुरू केले. कोट्यावधी रूपये शुल्क देखील भरले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांसमवेत रस्त्याच्या कडेला जिथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीहक्कातील जमीन आहे. तिथेच कंपनीने पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू केले. या कायदेशीर कामात वाळुज ते शेंद्रा एकुण २२ कि.मी. लांबीत कुठल्याही शेतकर्याने अथवा व्यावसायिक तसेच निवासी मालमत्ताधारकाने भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित केला नाही. भूसंपादनाची कार्यवाही आधीच झालेली आहे.
एका व्यक्तीचा कायम अडथळा
मात्र, बीड बायपास वळण मार्गावर एक व्यक्ति झाल्टाफाटा दरम्यान पाईप लाईन टाकण्यास सतत अडथळा आणत आहे. संबंधित काम सुरू असताना चारआठ दिवस हाॅटेल व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगत या व्यक्तिने कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई म्हणून तंब्बल एक लाख ६५ हजार रूपये वसुल केले. असे असताना अधीक लालचेपोटी सदर व्यक्ती कामात वारंवार अडथळा आणत आहे. यासंदर्भात औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांकडे देखील मागील दोन महिन्यापूर्वी कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर स्वतः पोलिस अधिक्षकांनी पोलीसांचा फौजफाटा देत बंदोबस्तात काम सुरू केले होते.
लालसेचे फळ सुटेना
मात्र आज सोमवारी ता. (२८ नोव्हेंबर ) रोजी कंपनीच्या मजुरांसह अधिकारी काम करण्यास आले असता सदर व्यक्तीने सरकारी कामात अडथळा आणत दोन हजार कोटीच्या या प्रकल्पालाच ग्रहण लावण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच जागा माझी असल्याचा दावा करत काम बंद पाडले. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत जागतिक बॅक प्रकल्पाच्या अधिकार्यांना झालेला प्रकार कथन केला. अधिकार्यांनी रस्त्याच्या नकाशासह इतर महसुली पुरावे आणत त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने चिकलठाणा पोलिसस्टेशन गाठले व रितसर तक्रार दाखल केली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.