छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील सातारा भागातील शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराचे जतन, संवर्धन, पुनर्वसन व परिसर विकासाची कामे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारकडून ५६ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, ५६ कोटी मिळाल्याच्या गावभर बाता आणि पोस्टरबाजी करण्यात आली होती. प्रत्यक्षात शिंदे सरकारच्या काळात केवळ सात कोटीचे टेंडर काढण्यात आले. सदर काम हे अंदाजपत्रकीय रकमेनुसारच साऊथच्या गायत्री आर्किटेक्ट कंपनीचे व्यंकटेशराव यांना देण्यात आले आहे. त्यांनी कामगार आणि बांधकाम साहित्यासाठी पत्र्याचे शेड उभारणीचे काम केले. मात्र, मंदिराच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करायचे म्हणून काम बंद करण्यात आले. परिणामी मंदिर जिर्णोद्धाराचे काम लांबणीवर पडले. आता अधिवेशन काळातून शिंदे मुक्त झाल्याने येत्या आठ ते दहा दिवसात त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा नारळ फुटल्यावर प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. मात्र त्यांनी निश्चित तारीख दिली नसल्याने किती दिवस काम लांबणीवर पडेल, असा संभ्रम कायम आहे.
सातारा येथील पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिरासाठी सात वर्षांपूर्वी मंदिराला एक कोटी पंधरा लाखांचा निधी आला होता. परंतु दीपमाळ, सभामंडप व मंदिराची इतर कामे न करताच तो परत गेल्याने मंदिराची कामे रखडली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाने १५ व्या वित्त आयोगातून सहा कोटींचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविला होता. तत्कालीन ठेकेदाराने कोटीत काम परवडत नसल्याने त्याने काम करण्यास नकार दिला होता. त्या आधारावर पुरातत्व विभागाने सदरील संस्थेला काळ्या यादीत टाकल्याची गावभर चर्चा झाली होती. त्यानंतर टेंडर रिकॉल करूनही कुणीच पुढे आले नसल्याने निधी सरकारकडे परत गेला होता.
अखेर राज्य पुरातत्व विभागाने वाढीव दराबाबत आणि कामाचा नवीन प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता. मात्र, केंद्राने देखील निधी देण्यास नकार दिला होता. अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हे खंडोबा मंदिर आहे. हेमांडपंती मंदिरावर वातावरणाचा परिणाम होत असून, देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. पूर्वीचा निधी परत गेल्यामुळे नव्याने मिळणाऱ्या निधीला मंजुरी देऊन त्यातून मंदिराची शान वाढवावी, अशी मागणी प्रत्येक यात्रा उत्सवाच्या काळात विश्वस्त लावून धरत असत. वातावरणातील बदलामुळे मंदिराच्या दीपमाळीचा खण निखळून पडला आहे, तसेच चबुतऱ्याच्या दगडाचीही झीज होत असून, मंदिराच्या विटांचा मुलामा पाऊस, ऊन, वाऱ्यामुळे निघाला आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या खंडोबा देवस्थानाची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. मंदिराची देखभाल राज्य पुरातत्व विभागाकडे आहे. एकीकडे होत असलेली पडझड दुसरीकडे निधीची कमतरता. त्यात मध्यंतरी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोध्दार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र येथील कोणतेही कार्य करण्याची परवानगी देवस्थानाला नाही. त्यामुळे मंदिर परिसरात बांधकामास मदत करण्याची इच्छा असताना ते करू शकले नाहीत. निदान दीपमाळ व सभामंडपासह मंदिराची इतर कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी जुनीच मागणी होती.
पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या या मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. मंदिर परिसरातील दीपमाळ, सभामंडप, भक्तनिवास, मंदिर परिसरातील व्यापारी स्थापना, दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे, लँडस्केप विकास, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाहनतळ विकास, पथदिवे, हायमास्ट व इतर विकास कामे, विद्युतीकरण करणे आदी कामांचा प्रस्तावात उल्लेख करण्यात आला होता. येथील विकास कामे झाल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होणार, त्याचबरोबर खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांनाही सोयीसुविधांचा लाभ मिळणार असा देखील प्रस्तावाय मुद्दा उपस्थित केला गेला होता. अखेर आमदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला ठाकरेंनी ग्रीन सिग्नल दाखवला होता. राज्य सरकारने खंडोबा मंदिर व परिसराच्या विकासासाठी ५६ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर शिरसाट यांनी गावभर पोस्टरबाजी करत ठाकरे सरकारचे आभार मानले होते. ५६ कोटीची मंजुरी मिळताच माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने नाशिक येथील राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वास्तुविशारद कासार पाटील यांच्यासह खंडोबा मंदिराची बारकाईने पाहणी केली होती. त्यात गाभाऱ्यातील दगडी रेखीव कामाचे निरीक्षण करून दगडाची लांबी, रुंदीचे मोजमाप केले होते. तसेच खांबावरील नक्षीकाम, दगडाचा प्रकार, बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दीपमाळ, विटा व चुना याची अत्यंत बारकाईने पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता.
आता या कामांना कात्री?
सुरूवातीला ५६ कोटीच्या बाता मारल्याने मंदिराच्या आत-बाहेरची दगड रसायनांनी साफ करून त्यावर संरक्षणात्मक रसायनांचा थर देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यामुळे दगडांची झीज कमी होण्यास मदत होणार होती. दगडांना असणारे तडे हे चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या सह्याने भरून काढण्यात येणार होती. गर्भगृहाच्या जेत्याच्या दगडांवरील नक्षीकामातील दगड ठिसूळ झाल्याने नष्ट झालेले आहे. ते चुना, दगडांची भुकटी व रसायनांच्या साहाय्याने पुन्हा बांधण्यात येणार होते. मंदिर शिखराच्या पडलेल्या विटांचे संवर्धन, खराब झालेला दर्जा काढून टाकून पुन्हा भरणे, खराब झालेला गिराला पुन्हा करणे इत्यादी कामे प्रस्तावित होती.
याशिवाय मंदिराच्या सभामंडपाची इतर समकालीन मंदीरानुसार पुर्नबांधणी बांधणी करणे, मंदिरासमोरील दीपमाळेचा जीर्णोद्धार व संवर्धन करणे, मंदिरासमोरील नगारखान्याचा जीर्णोद्धार व संवर्धन करणे, मंदिर शेजारील जागेचा विकास व संवर्धन करणे, भक्तनिवासाची सोय करणे, मंदिर परिसरातील दुकाने, पर्यटक व भाविकांसाठी स्वच्छतागृहे उभारणे, लँडस्केप विकास, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाहनतळ विकसित करणे, पथदीप, हायमास्ट व इतर विकास कामे विद्युतीकरण करणे, तसेच मंदिरापर्यंतच्या २ किमी रस्त्याचे अपग्रेडेशन, मंदिराजवळील नाल्यावरील कल्व्हर्ट बांधणे, मंदिर परिसरात विस्थापनातून रिकाम्या झालेल्या जागेचा विकास करणे आदी कामांची घोषणा करण्यात आली होती. मात्र निधी कमी केल्याने केवळ दिपमाळ, सभामंडप आणि मंदिराच्या चबुतरा व आसपासच्या परिसरात फरशी काम व मंदिराच्या पायथ्यापासून तर शिखरापर्यंत जे दगड आणि विटकाम खराब झाले त्याचीच डागडुजी केली जाणार आहे.